काळी पोत म्हणजे धन्याची निशाणी

काळा दोरा असो की चार पदरी सोन्याची गातन

धन्याशिवाय शोभा नाही

जी सधवा गेली ती त्या काळ्या मण्यांची मालकीण

पण जी विधवापण जगली ती कुत्सित नजरांची अभागीण

सधवेच्या गळ्यात ताटीवर सुद्धा मंगळसुत्रांची बरसात

तेच हात विधवेच्या गळ्यातून काळा दोरा सुद्धा हिसकावून काढतात

कोणी दिला हा अधिकार?

ही कसली क्रूर संस्कृती?

हे कसले राक्षसी हात?

यांचे हात पाठीवर धीराचे म्हणून का घ्यावेत?

ह्या कोणत्या रुढीच्या पाठीराख्या?

पतीला सोडून गेलेली सवाष्ण

आणि पतीसाठी रक्त आटवून मागे राहिलेली अवाष्ण?

ह्या सरसावलेल्या प्रत्येक राक्षसी हातांवर येणार बांगड्या फोडण्याची वेळ

तरीही हात वर्षोनुवर्षे सरसावत कसे राहतात?

का आपलेच अत्याचार यांना दिसत नाहीत?

का बाईच बाईवर वैधव्य लादते?

का तिला वंचित ठेवते प्रत्येक आनंदातून?

का आपल्याच सारख्या एका प्राण्याला अशुभ मानते?

का शिक्षणाने सुधारणा आणणाऱ्यांना हिणवलं जातं?

कधी निखळणार हे एकाच रूढीचे मणी?

---- विनिशा धामणकर