रोज मरे त्याला कोण रडे या उक्तीप्रमाणे रेल्वेच्या भोंगळ कारभाराला रोज तोंड देणाऱ्या, आपलं वेळापत्रक, नोकरी, परिक्षांच्या वेळा, डॉक्टरांची अपॉइंटमेंट, आजारी माणसाची देखभाल, लहान मुलांची काळजी अशा अनेक दैनिक अत्यावश्यक गोष्टींसाठी ठराविक जागेवर ठराविक वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वेदेवतेवर हवाला ठेऊन कसाबसा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची रेल्वेने दिलगिरी व्यक्त करू नये, असं माझं स्पष्ट मत आहे. मध्य काय, पश्चिम काय नी हार्बर काय, संपूर्ण  रेल्वे विभागाने त्यांचं जसं चाललंय तसं चालू ठेवावं... आम्ही बापडे प्रवासी काय, गाडी आली, योग्य वेगाने चालली आणि आमच्या ठिकाणी आम्हाला वन पीसमध्ये पोहोचवलं तरी आम्ही भरून पावतो आणि मग झालेला सगळा त्रास विसरून जातो. त्यामुळे दिलगिरी वगैरे व्यक्त करून उगीच आम्हाला तुमची किती काळजी आहे असा आपुलकीचा आव रेल्वेने आणण्याची काहीच गरज नाही. कारण आम्हाला रेल्वेचीही अवस्था समजते आहे. आधीच मुंबईमाता आ चर्चगेट विरार – डहाणू आणि आ सीएसटी कर्जत कसारा आपल्या या सर्व पोराटोरांचा भार वाहते आहे. त्यात रेल्वे देवतेने उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बाहेर गावाहून येणाऱ्या आणि बाहेरगावी जाणाऱ्या रोजच्या २० च्या वर गाड्या सुरू केल्या आहेत. म्हणजे 'आपलं झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं' असं चाललंय महाराजा!

 


आधीच रेल्वेने गाड्या वेळापत्रकाप्रमाणे न चालवण्याचा विडा उचलेला. त्यात गाडी व्यवस्थित चालली आहे असं वाटतं असतानाच नेमकी एखाद्या स्टेशनमध्ये नाही तर स्टेशनपासून लांब थबकून वीस वीस मिनिटे उभी राहते. यात ट्रेनच्या आतमधली उद्घोषणा यंत्रणा लोकांना स्वच्छतेचे आणि फुटबोर्डवर उभं न राहण्याचे कोणीही ऐकत नसलेले सल्ले देण्यासाठी फक्त वापरली जाते. ही गाडी का थांबली आहे आणि ती किती वेळात सुरू होणार आहे याची काहीही माहिती या यंत्रणेच्या माध्यमातून दिली जात नाही. स्टेशनमधला गोंधळ तर याही पलिकडचा. एखाद्या फलाटावर ट्रेन येणार हे जाहिर होणार आणि येणार भलत्याच फलाटावर. डिजिटल इंडियात आजही आधीच्या स्टेशनवरून येणारी ट्रेन किती वेळात येणार आहे हे सांगू शकत नसतील तर ट्रेनच्या ट्रॅकवरच ते संगणक फेकून का देऊ नयेत? बरं हा गोंधळ सुरु असतानाच मोठा गाजावाजा करून बाहेरगावच्या गाड्या सोडण्याची आणि त्यांना प्राधान्य देण्याची काय गरज आहे? कारण या मेल किंवा एक्स्प्रेस त्यांच्या ट्रॅकवरून पास होत नाहीत तोवर रोजच्या ठरलेल्या लोकल सोडल्या जात नाहीत असा गेल्या दोन महिन्यातला अनुभव आहे. ह्या लोकल मुंबईकरांच्या लाइफलाईन आहेत पण त्यातील रक्तात ह्या अशा अडथळ्यांच्या गुठळ्या झाल्या असतील तर या आजारावर रेल्वेकडे काही उपाय असेल तर तो करावा. नसेल तर उगीच दिलगिरी व्यक्त करण्याचं नाटक करू नये. रेल्वेच्या अशा राम भरोसे कारभारामुळे आमच्या आयुष्यावर किती विपरीत परिणाम होतो याची त्यांना कल्पनाही नसावी. त्यातूनही मुंबईचं स्पिरीट जपत आम्ही जगण्यातली कळ सोसतो आहोत. त्यात रेल्वेने दिलगिरी व्यक्त करण्याचा किटाळ करू नये, एवढीच माफक अपेक्षा.

--- विनिशा धामणकर, मीरा रोड