मातृभूमी... हा एक हिंदी सिनेमा २००३ साली प्रदर्शित झाला होता. 

अनेक फिल्मोत्सव त्याने गाजवले होते. समीक्षकांनी सुद्धा त्याची वाहवा केली होती. त्याला कारण होतं त्याचा विषय आणि त्याची मांडणी. वर्षानुवर्षे स्त्री भ्रूणहत्या झाल्यामुळे बिहारच्या एका गावात स्त्री उरतच नाही. त्याच गावात नाही तर आजूबाजूला अनेक गावात स्त्री नसतेच किंवा ज्या एकदोन असतात त्या म्हाताऱ्या असतात. कारण काही वर्षांपूर्वी मुलगी झाली की जन्मत:च तिला दुधात बुडवून मारण्याची परंपरा त्या गावात असते. कालांतराने तिथे स्त्री उरतच नाही. त्यामुळे फक्त पुरूषच उरलेल्या त्या गावात आपापल्या वंशवृद्धीचा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी त्यांना निश्चितच एका स्त्रीची आवश्यकता असते. दूरच्या एका गावात एक विवाह योग्य मुलगी आहे असं “राय” नावाच्या जमीनदाराला कळतं. त्याची पाच मुलं असतात. त्या मुलीच्या बापाला ५०,००० रुपये आणि ५ गायी देऊन मुलीला विकत घेतलं जातं. आता पण प्रश्न येतो तो त्या कुटूंबातील मुलांपैकी नेमक्या कोणत्या मुलासोबत त्या मुलीची गाठ बांधायची याचा. निर्णय घेताना “ती आपल्यालाच हवी,” म्हणून तिथे हाणामारी होते. शेवटी पाचही जणांशी तिचं लग्न ठरवलं जातं. पण त्या आधी कुटूंब पमुख असलेला बाप त्या मुलीला `आजमावेल', `फिर वो सबके लिए परोसी जाएगी' असा आदेश देतो. पाचही मुलांची पांचाली बनवून तिला घरी आणलं जातं. सासरा आणि चार नवरे तिच्यावर अत्याचारच करतात. पण धाकटा सुरज तिच्याशी चांगला वागतो. तिला तो अधिक आवडतो. मग त्यांची जवळीक पाहून इतर भाऊ आपल्याच भावाला मारून टाकतात. अष्टौपहर ती या सर्व कोल्ह्यांचं खाद्य बनत राहते. तिला दिवस जातात मूल नेमकं कोणाचं? यावरूनही वाद होतात. आणि एवढं सगळं होऊनही ह्या बुरसट मेंदूना तिच्या पोटीही पुन्हा मुलगाच हवा असतो. आता तिला पश्न पडतो की, `मुलगाच झाला तर, चार नवरे, एक सासरा या पाच जणांच्या वर आणखी एकाची तर भर पडणार नाही ना?'

मन विषण्ण करणरी ही कथा चित्रपटात आहे तोपर्यंत ठीक आहे, प्रत्यक्षात घडली तर...? स्त्रीभृण हत्या ही समस्या आपल्या देशात निर्माण झाली हीच मुळात आश्चर्याची गोष्ट आहे. इतक्या देवी-देवता, मातृदेवता, गावदेवी, कुलदेवी असताना सुद्धा स्त्रियांच्या जन्मावर असं बंधन घातलं जाणं घडतंच कसं? तेही अण्वस्त्रांच्या धाकाने महासत्ता होऊ पाहणाऱ्या भारतासारख्या देशात. वंशवृद्धी ही कोणत्याही माणसाला हवीच असते. किंबहूना जन्माला यायचं तेच मुळी दुसऱ्या एका जीवाला जन्म देऊन निसर्गचक्र अविरत सुरू ठेवण्यासाठी, हा जन्माचा मूळ हेतू आहे. निसर्गानेही त्याचा समतोल अगदी व्यवस्थित सांभाळलेला आहे. पण त्याला ढासळवतोय आपण.

मुलगा होणार की मुलगी याची निवडही निसर्गाने पुरूषांतील गुणसुत्रांना दिली आहे. माणसाच्या शरीरातील पेशींमध्ये एकूण ४६ गुणसूत्रे म्हणजेच गुणसुत्रांच्या २३ जोड्या असतात. पहिल्या २२ जोड्यांना आपण इंग्रजीत ऑटोसम म्हणतो. तर २३ वी जोडी ही माणसाचे लिंग निश्चित करणारी असते. स्त्रीमध्ये XX ही २३ वी गुणसूत्रांची जोडी असते. तर पुरुषांमध्ये XY ही २३ वी जोडी असते. पुरुषातील काही शुक्राणू हे X गुणसूत्र तर काही शुक्राणू Y हे गुणसूत्र वाहतात. प्रत्येक माणसाला आपल्या आईवडिलांकडून या जोडीतील एक एक गुणसूत्र मिळतं. आईकडून X आणि वडिलांकडून X किंवा Y ही गुणसूत्रे मिळतात. वडिलांकडून X हे गुणसूत्र मिळालं तर त्या व्यक्तीच्या पेशीत XX ही गुणसूत्रांची २३ वी जोडी तयार होऊन ते बाळ स्त्री म्हणून जन्म घेते तर वडिलांकडून Y हे गुणसूत्र मिळालं तर XY अशी जोडी तयार होऊन ते बाळ पुरुष म्हणून जन्म घेते. म्हणजेच समागमाच्या वेळी स्त्री मधल्या एका X सोबत पुरूषांतील X जुळतोय की Y यावर मुलगा की मुलगी होणार हे ठरते. याचाच अर्थ पुरुषातील गुणसूत्रच मुलगा होणार की मुलगी हे ठरवतात.

हे वैज्ञानिक सत्य अनेक वर्षापासून लोकांना सांगितलं जातंय. या प्रबोधनामुळे खूप बुरसटलेल्या परिस्थितीतून समाजाने स्थित्यंतर करत स्वत:ला परिवर्तीत केलंय पण अजून त्याचा म्हणावा तसा परिणाम झालेला नाही. `मला मुलगाच होणार आणि मुली शेजाऱ्याला' ही मानसिकता अजूनही आहेच. किंबहूना त्या मानसिकतेने आता घृणास्पद रूप घेतलंय. अन्यथा आपल्या पोटच्या गोळ्याला कुत्र्यांसमोर टाकताना आई-वडील इतके निगरगट्ट कसे होऊ शकतात? त्यांच्यातल्या जनावराने स्वतला इतकं नरभक्षक कसं होऊ दिलं? यापाठीमागची मानसिकता नेमकी काय असेल याचा विचार करून मेंदूला ज्वर चढेल पण उत्तर सापडणार नाही. या प्रत्येक जोडप्याला दोन अपत्य हवी असतात. मग मुलगा आणि मुलगी झाली तर ती त्यांना का नको असते. मुलीला आज कायद्याचं सर्व प्रकारचं संरक्षण मिळालं आहे, तरीही मुलगी का नको? आई हवी, बहिण हवी, मैत्रिण हवी, बायको हवी पण मुलगी नको, का?

आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वत:ला खूप पुरोगामी, समजणाऱ्या श्रीमंत वर्गात याचं लोण फार आहे. हवा तेवढा पैसा ओतून कायद्याने बंदी असलेली गर्भलिंग चाचणी करून घेतली जाते. हे दुष्कृत्य करणारे डॉक्टर्स कोणाला कळणार नाही अशाप्रकारे रिपोर्ट देतात. सोनोग्राफीचा रिपोर्ट देताना ते 6 आणि 9 असं लिहितात. याचा अर्थ इतरांना कळत नाही. हे इंग्रजी 6 9 आकडे आहेत असं वाटतं. व्यवस्थित पाहिलंत तर ते b आणि g म्हणजे boy आणि girl असे उल्लेख आहेत. या रिपोर्टवरून डॉक्टर त्या जोडप्याला त्यांचं अपत्य काय आहे ते सांगतात आणि `पाच मिनिटात सुटका होईल' असा निर्वाळा देतात. निसर्गाने घडवलेल्या एका सर्वांग सुंदर सजीवाचा सहजरित्या अंत केला जातो. लोण श्रीमंतांमध्ये असू दे की, मध्यमवर्गीयांमध्ये की गरीबांमध्ये, ही सर्व प्रक्रिया अशीच केली जाते.

आज सर्व जगामध्ये पेट्रोलवरून युद्ध पेटलंय पेट्रोलचे दर वाढवले तर लोक गाड्या कमी चालवतील, प्रदूषण कमी होईल, अशी एक आशाही काही लोक व्यक्त करतात. कारण जगभरात पेट्रोलचा साठा केवळ ते दीड लाख लीटर एवढाच आहे आणि तो पुढील ४० - ५० वर्ष पुरेल इतकाच आहे. असं असूनही गाड्या चालवणं कमी झालेलं नाही की त्या विकत घेणं. आज ज्या गाडीतून आपण मुलांना फिरवतोय ती मुलं मोठी झाल्यावर त्यांना फिरण्यासाठी, कामाधंद्यासाठी पेट्रोल उरणार नाही हे त्यांच्या गावीही नसतं.

मुलींचंही तसंच आहे. आज भले मुलगाच हवा म्हणून पैसे टाकून मुलींना मारलं जातंय. उद्या तुमच्याच मुलांच्या वंशवृद्धीसाठी मुलगी कुठून आणाला? वंशवृद्धी जर करायची तर ती आपणच केली म्हणजे झाली असं तर नाहीये ना. मुलांकडूनही व्हायला हवी. ती कशी होणार? की आपण आता ऑक्सीजनच्या ठिकाणी कार्बनडायऑक्साईड श्वसनाद्वारे घेतोय म्हणजे निसर्गाचं चक्रही बदलून जननक्रियाही पुरूषांनाच करावी लागेल अशी परिस्थिती येणारेय का? नाही ना. सजीव, मग तो कोणताही असो हत्ती, वाघ, सिंह, गेंडा, कोल्हा, बकरा, बैल, घोडा आणि मानवासारख्या बाळ जन्माला घालणारे प्राणी असो की कोंबडी सारखे अंडी देणारे असोत, जननक्रिया ही स्त्री सजीवालाच करावी लागते. अगदी एकपेशीय असलेल्या अमिबाला जन्म देणाऱ्या पेशीला देखील मातृपेशीच म्हटलं जातं. त्यामुळे वंशाचं चक्र अखंडितपणे चालवायचं असेल तर स्त्री ही आवश्यकच आहे. तिला पर्याय नाही.

`स्त्री ही दुःखाचं द्वार आहे,' म्हणणाऱ्या मनूला आपण केव्हाच जाळलाय. त्याचा जन्म कसा झाला होता हे तोच जाणे. तो असेल मुखातून किंवा जांघेतून वगैरे जन्मलेला. अपौरूषेय वगैरे. आमच्या सारख्या सामान्य माणसांना जन्मण्यासाठी मात्र आईच हवी... आणि बाबासुद्धा.

निसर्ग हा जितका दयाळू, ममताळू आहे तितकाच तो एक माथेफिरूही आहे. त्याने आखून दिलेल्या मुलींच्या जन्माला आपण असं संपवून टाकत गेलो तर तो मुलांनाच जन्माला घालेल. आणि मग ‘मातृभूमी’ सिनेमातली परिस्थिती निर्माण होईल.

आज स्त्री भूण हत्या रोखण्यासाठी जसे कायदे केले गेले आहेत से पुरुषांची वाढणारी संख्या रोखण्यासाठी जर पुरूषभूण हत्या कायद्यानेच संमत करावी लागली तर? आज गर्भलिंग चाचणी आणि स्त्रीभृण हत्या करणाऱ्या डॉक्टर्सना पकडण्यासाठी भरारी पथके नेमली आहेत, तशीच गर्भात पुरूषभृण आहे असं कळूनही अबॉर्शन करणाऱ्या दाम्पंत्याला पकडण्यासाठी भरारी पथके उभारावी लागली तर...? पुरूष खूप आहेत आणि स्त्रियाच नाहीत अशी परिस्थिती येऊन पुरूष भृण हत्यासत्र कायद्याने सुरू केलं गेलं तर..?

भयंकर...! नाही, असं होणार नाही. कारण हत्या मग ती कोणाचीही असो, निंदनीयच ठरते. भृणाची हत्या तर पातकच. शिवाय निसर्गाचं चक्र मोडलं तर त्याला पूर्वपदावर आणायला निसर्गच समर्थ आहे. पण तो भडकणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. नाहीतर तो अभद्र दिवस यायला वेळ लागणार नाही जेव्हा पुरूषभृण हत्या होऊ लागतील....