गेल्या काही दिवसांपासून अपघात करून, माणसांना मारून तिथून पळ काढणाऱ्या उच्चभ्रू, मुजोर आणि तितक्याच भ्याड मुलांची एक जंत्री आपल्या समोर उभी राहिली आहे. ही मुलं एवढी कशी काय या अमानुषतेकडे वळली असतील हे प्रश्न समस्त महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांच्या मनात थैमान घालत असतानाच या मुजोरपणाची मुळाक्षरं आपल्या मुलांना कशी आंजारून गोंजारून गिरवून घेतली जातात याचं प्रात्यक्षिक पुण्याच्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या रूपाने पाहायला मिळत आहे.

मुलांच्या चुकांवर पांघरूण घालणारे आई बाप आपण पहिले असतील. किंबहुना आपल्या चुका लपवण्यासाठी सुद्धा आपल्या आई वडिलांनी कधीतरी आपली पाठराखण केली असेल. पण, ‘अशी एकदाच पाठराखण होईल; यापुढे असं काही झालं तर मी मध्ये पडणार नाही,’ अशी धमकी वजा समज सुद्धा आपल्या याच पालकांनी दिलेली तुम्हाला आठवत असेल. ‘तुला जे पाहिजे ते कर,’ असं निवडीचं स्वातंत्र्य देतानाच ‘जे काही करशील ते विचारपूर्वक कर,’ असा अत्यंत मोलाचा सल्ला द्यायला सुद्धा आपले पालक कधी विसरले नाहीत. कारण आपल्या पालकाचा उद्देश आपल्या मुलाने - मुलीने आयुष्यात काही कमवू दे अथवा न कमवू दे, पण त्यांनी माणुसकी सोडता कामा नये, त्यांनी एक चांगला माणूस व्हावं हा असायचा. त्याने किंवा तिने प्रत्येक परिस्थितीचा सामंजस्याने आणि विवेकाने विचार करावा, लोकांना सांभाळून घ्यावं आणि जिथे आपल्याकडून चूक झाली असेल तिथे क्षमा मागून त्याची शिक्षा सुद्धा भोगण्यासाठी तयार व्हावं; आपल्या कृत्याची फळं आपल्यालाच  भोगावी लागणार ही मानसिकता त्यांच्यात रुजावी यासाठी आपले पालक नेहमी सजग असतात. यासाठीच आपल्या मनात आईवडिलांविषयी आदरयुक्त दरारा असतो. सर्वसामान्य घरातील मुलं अशीच असतात. मात्र धनदांडग्यांच्या सर्वच घरात हे दृश्य असेल अशी शाश्वती देता येत नाही. याला कारण हे पूजा खेडकर प्रकरण.

प्रसार माध्यमांमध्ये पूजा खेडकरच्या ज्या काही कथा झळकत आहेत त्यातून तिचे कुटुंब अहमदनगरच्या पाथर्डीतील असून तिचे वडील दिलीप खेडकर हे माजी सनदी अधिकारी आहेत आणि तिची आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या सरपंच असल्याचं कळलं. याशिवाय दिलीप खेडकर हे सेवानिवृत्ती नंतर वंचित बहुजन आघाडीशी जोडले गेले आणि २०२४ च या लोकसभा निवडणुकीला ते उभे होते ज्यात त्यांचा पराभव होऊन त्यांचं डिपॉझिट सुद्धा जप्त झाल्याची माहिती मिळाली. खेडकरांच्या या दिवटीने नेमके काय काय अंबर दिवे लावले याच्या कथा आता सर्वदूर पसरल्या आहेत. त्यामुळे त्या विषयात जाणार नाही. इथे या मुलीच्या उपद् व्यापात तिच्या आईवडिलांचाच कसा आशीर्वाद होता हे पाहणं महत्त्वाचं आहे.

मुलीला येन केन प्रकारेण आयएएस पास करण्यापासून ते तिला खोटीनाटी सर्टिफिकेट्स लावून पोस्टिंग मिळवून देऊन, त्या पोस्टिंगमध्ये तिची बडदास्त ठेवण्यासाठी वरिष्ठ कनिष्ठ अशा सर्व अधिकाऱ्यांना आरडाओरडा करून, दम देऊन मुलीसाठी सर्व व्यवस्था करण्याचा हुकुम सोडण्याचा प्रयत्न दिलीप खेडकर यांच्याकडून केला गेला. प्रसार माध्यमांच्या म्हणण्यानुसार ६० एकर वन जमीन बळकावून त्यावर शेती करणाऱ्या खेडकरांच्या मुलीवर सुद्धा हेच संस्कार झालेत. या संदर्भातील पुजाची आई मनोरमा यांनी हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना कसं धमकावलं याचे व्हिडीओ आता वायरल होत आहेत.   पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनवर रुजू झालेल्या पूजाने अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे हे मुंबईला गेलेले असताना त्यांच्या केबिनवर ताबा मिळवला. जिल्हाधिकारी गवते यांच्या तक्रारीनंतर जेव्हा हे सर्व प्रकरण समोर आलं तेव्हा साहजिकच प्रसार माध्यमं खेडकरांच्या बंगल्यावर गेले त्यावेळी पुजाची आई मनोरमा यांनी आपल्या बंगल्याचा गेट न उघडता त्याच्या वरून चक्क कॅमेऱ्यावर हल्ला केला.

दृष्टीदोष आणि मनोरुग्ण असल्याचे शारीरिक व्यंगत्वाचं कारण सांगून शासकीय स्तरावरील तपासणीला वारंवार टांग देणाऱ्या या तथाकथित आयएएस प्रशिक्षणार्थीची बदली आता वाशीममध्ये करण्यात आली आहे. आपल्या वरिष्ठांपासून कानिष्ठांपर्यंत सर्वांना आपल्या धाकात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि स्वत: असत्यावर आधारित नोकरी मिळवणाऱ्या या प्रशिक्षणार्थीला ही नोकरीची संधी मिळवण्याचा अधिकार आहे का? आज जर अशा बेमुर्वतखोर लोकांना हवा मिळाली तर उद्या अशीच पिढीच्या पिढी तयार होईल याची दक्षता आपल्या प्रशासनातील जे काही प्रामाणिक वरिष्ठ असतील त्यांनी घ्यायला हवी. पूजाचे हे प्रकरण समोर आलं म्हणून ते कळलं. असे अनेक विद्यार्थी, पालक असतील ज्यांनी पैशाच्या जोरावर माणुसकीला पायदळी तुडवलं असेल याविषयी आता वैद्यकीय प्रवेश परीक्षा वादाच्या पार्श्वभूमीवर चर्चा रंगून लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीवर प्रश्नचिन्ह उमटू लागलं आहे. आपली विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा पणाला लावू द्यायची नसेल तर अधिकाराच्या पदावर अत्यंत प्रामाणिक आणि जबाबदार व्यक्तीच हवी एवढी किमान पात्रता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गृहीत धरलीच पाहिजे. नाहीतर आपल्या दिखाऊपणाचा सोस असणाऱ्यांच्या या दिवट्यांमुळे अंधाराचं राज्यच निर्माण होईल एवढं नक्की.   

 

 

विनिशा धामणकर