कुर्ला पश्चिम येथील भाभा रुग्णालयामध्ये दुसऱ्या मजल्यावर असलेल्या डायलिसिस विभागामध्ये जाणारी लिफ्ट गेल्या एका महिन्यापासून बंद होती. त्यामुळे डायलिसिसवर येणाऱ्या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. वृद्ध, गंभीर आजारी आणि व्हीलचेअरवरील रुग्णांची विशेषतः मोठी गैरसोय होत होती.


सदर बाब आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांच्याकडे रुग्णांच्या नातेवाईकांनी मांडली. त्यानंतर अनिल गलगली यांनी लेखी तक्रार करून अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे याकडे लक्ष वेधले.


डॉ. विपिन शर्मा यांनी तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले. केवळ ३ दिवसांच्या आत लिफ्ट दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्यात आली.


यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या वेगवान प्रतिसादाचे स्वागत केले जात आहे.