वाडा तालुक्यात १३९ योजना मंजूर असून यातील केवळ १३३ योजना अयशस्वी

वाडा : केंद्र सरकारने जलजीवन मिशन ही महत्वाकांक्षी योजना आणून वर्षांनुवर्षे पाण्यासाठी धडपड करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. राज्यात मात्र या योजनेची अंमलबजावणी फसल्याने टंचाईग्रस्त गावे संकटात सापडली असून वाडा तालुक्यात जलजीवन मिशन योजनांची अवस्था दयनीय आहे. वाडा तालुक्यात तब्बल १३९ योजना मंजूर असून यातील केवळ ६ योजना यशस्वी झाल्या आहेत तर १३३ योजना अयशस्वी ठरल्या आहेत. या १३३ योजना कधी लोकांची तहान भागवणार असा प्रश्न लोकांना पडला असून लोकप्रतिनिधींची उदासीनता याला जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

उज्जैनी, वरसाले व ओगदामध्ये दरवर्षी पाण्यासाठी संघर्ष 

वाडा तालुक्यात जलजीवन मिशन या योजनेतून १३९ योजना मंजूर झाल्या असून २०२२ मध्ये या योजनांचे काम हाती घेण्यात आले. खरेतर तालुक्यांतील ग्रामीण व डोंगराळ भागातील अनेक गावांमध्ये टंचाईची झळ अगदीच जानेवारी महिन्यापासून सोसावी लागत असून या गावांना पाणी प्राधान्याने मिळणे अपेक्षित होते. तालुक्यातील उज्जैनी, वरसाले व ओगदा या ग्रामपंचायतीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष दरवर्षीचा असून याच भागात योजनांचे तीनतेरा वाजले आहेत. केंद्र व राज्य सरकारने पाणी पुरवठ्याच्या या सर्व योजनांची गांभियनि दखल घेणे गरजेचे असून कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.



खोदकाम करून माती रस्त्यावरच टाकल्याने वाहनचालकांना मोठा त्रास

उज्जैनी ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या योजनेसाठी २ कोटी ३९ लाखांचा निधी मंजूर असून यात उज्जैनी, घातपातपाडा, साखरशेत, आंबेवाडी, भोकरपाडा अशा गावांचा समावेश आहे. योजनेतील ५५ लाखांचा निधी कंत्राटदाराला अदा होत आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे असून योजनेचे काम अपूर्ण आहे. कंत्राटदाराने मागील दोन वर्षांपासून मुख्य रस्त्याच्या कडेला खोदकाम करून माती रस्त्यावरच टाकली असून याचा वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उपकंत्राटदार बडा नेता असल्याने त्याला उघड विरोध करायला कुणीही तयार नाही, असे लोकं खासगीत बोलत असून जनता मात्र पाण्यासाठी त्रस्त आहे.

एका महिलेचा रिकाम्या विहिरीत पडून मृत्यू

वरसाले ही पाण्यासाठी सर्वात जास्त तहानलेली गावे असणारी दुर्गम ग्रामपंचायत असून या गावासाठी तब्बल ३ कोटी ९ लाख रुपयांची योजना मंजूर आहे. वरसाले, नवापाडा, काटीचापाडा, पाटीलपाडा, बोरशेती, चारणवाडी, कडूपाडा अशा गावांचा यात समावेश असून नवापाडा या गावात पाण्यासाठी धडपड करताना एका महिलेचा रिकाम्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना पडली होती. एकूण पाच जल कुंभ, दोन विहिरी व कित्येक जलवाहिन्या असे योजनेचे स्वरूप असून यातील बहुतांश काम अजूनही अपूर्णच आहे. दोन्ही उभारलेल्या विहिरी कुचकामी असून लोकांची तहान भागविण्यासाठी अकार्यक्षम असल्याने योजनेचे भविष्य टांगणीला लागले आहे, असे असूनही कंत्राटदाराला मात्र तब्बल १ कोटी २२ लाख २७ हजार रुपयांची देयके अदा करण्यात आली आहेत.

माणसांसह गुरांचीही पाण्यासाठी वणवण

ओगदा ग्रामपंचायत मधील अनेक गावे होळीपासूनच टँकरवर अवलंबून असून माणसांसह गुरांना देखील पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, अशी येथील अवस्था आहे. फणसगाव व तीळमाळ या योजनेसाठी १ कोटी ७५ लाख, खोडदे गावासाठी ४७ लाख ९७ हजार, ओगदा गावांसाठी ७६ लाख ९६ हजार तर पाचघर, मोहमाळ, ताडमाळ या योजनेसाठी तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. यासाठी नेमलेल्या एकाच कंत्राटदाराला यासाठी मोठी देयके अदा करण्यात आली असून कंत्राटदाराच्या बिसाळ कारभारामुळे तर काही ठिकाणी वनविभागाच्या मंजुरीत जखडल्याने अडकून पडल्या आहेत असे लोक सांगतात. किरकोळ कारणांमुळे सर्वच योजना लालफितीत अडकलेल्या असून ग्रामीण जनतेच्या नशिबी पाण्यासाठी फरफट कायम राहणार आहे.

१३९ योजना उभ्या करण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे पाणीपुरवठा विभागासमोर आव्हान

वाडा पाणीपुरवठा विभाग आधीच भोंगळ कारभारामुळे लोकांच्या समस्या सोडविण्यात अकार्यक्षम असताना अचानक कोट्यवधी निधी देऊन १३९ योजना उभ्या करण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे करण्यात आले. ठराविक बड्या कंत्राटदारांनी कामांवर डल्ला मारून यात बहुतांश बेरोजगार व अकुशल उप कंत्राटदारांनी कामांचा ठेका घेतल्याने योजनांचे तीनतेरा वाजले आहेत असा लोकांचा आरोप आहे. त्यात जवळपास ६० ते ७० योजनांमध्ये तांत्रिक बदल तर एकूण जवळपास ९० योजना विवीध समस्यांमुळे अडकून पडल्या आहेत. 

जनता अर्धवट योजनांमध्ये अडकलेली

योजनांचे खरे मारेकरी असणारे अधिकारी बदली करून मोकळा श्रास घेत असून जनता मात्र अर्धवट योजनांमध्ये अडकून पडल्या आहेत असा लोकांचा आरोप आहे. पाणी पुरवठा अधिकारीही हतबल असल्याचे पहायला मिळत असून जल जीवन योजना या अपयशी ठरलेल्या जल स्वराज योजनांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत असे चित्र वाडा तालुक्यात पहायला मिळत आहे.