रोजगार निर्मितीत जिल्ह्यात सर्वाधिक यश

डहाणू : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) डहाणू तालुक्याने जिल्ह्यातील इतर तालुक्यांना मागे टाकत सर्वोच्च स्थान मिळवले आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीसाठी डहाणू तालुक्याला १,४५,२०६ मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट दिले होते, परंतु तालुक्याने त्यापेक्षा अधिक म्हणजेच १,७३,१९२ मनुष्यदिन (११९.२७%) निर्मिती करत अव्वल कामगिरी बजावली आहे.  

पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांसाठी एकूण ३८,७२,१५६ मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, त्यापैकी ११ डिसेंबर २०२४ पर्यंत २७,२२,६९५ मनुष्यदिन निर्मिती (७०.३१%) साध्य झाली आहे. मागील वर्षी ५८ लाख मनुष्यदिन निर्मिती झाल्यामुळे १४५% उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते, तर यंदा देखील ५० लाख मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

तालुकानिहाय मनुष्यदिन निर्मितीमध्ये डहाणू आणि पालघर तालुके पुढे असून डहाणूने १,७३,१९२ तर पालघरने १,०७,०६३ मनुष्यदिन निर्मिती केली आहे. तलासरीने ७९.७४ टक्के, जव्हारने ८६.६९ टक्के, मोखाड्याने ९०.८८ टक्के, वाड्याने ८८.७८ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे, तर वसई तालुक्याने ८१.८३ टक्के साध्य केले आहे. विक्रमगड तालुका मात्र अपेक्षित उद्दिष्टांपासून मागे आहे.

डहाणू तालुक्यात रोजगार हमी योजनेतून आदिवासी कुटुंबांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेषतः फळबाग लागवडीमुळे ७९० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाल्याने १,३४७ शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. ही योजना स्थलांतरित कुटुंबांना काम उपलब्ध करून देत त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणत आहे. डहाणू तालुक्याच्या यशाबद्दल जिल्हा प्रशासनाने समाधान व्यक्त केले असून, उर्वरित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृतिशील उपाययोजना सुरू आहेत.