भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांचे प्रतिपादन

चिपळूण : लोकशाही समाजवादी ही काही ठाशिव, अपरिवर्तनीय विचारधारा नाही तर, ती देश आणि काळानुरूप बदलणारी क्रांतिकारी विचारधारा आहे' असे उद्गार भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी पुणे येथे बोलतांना काढले. 

स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षा निमित्त देशभरातील समतावादी संस्था संघटनानी एकत्र येऊन गेले वर्षभर चालविलेल्या साने गुरुजी १२५ अभियानाच्या सांगता समारंभात त्यांनी हे विचार मांडले. २१, २२ डिसेंबर हे दोन दिवस राष्ट्र सेवा दलाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या आवारात हे दोन दिवसीय सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना योगेंद्र यादव यांनी 'येथील समाजवादी, साम्यवादी विचारधारासह शाहू, फुले, आंबेडकर, गांधी, साने गुरुजी या समतावादी  विचारपरंपरांना सोबत घेऊन नव्या संदर्भातील लोकशाही समाजवादाचे प्रारूप मांडून आपल्याला पुढे जायला हवे' अशा प्रकारे भारतीय लोकशाही समाजवादाचे विवेचन केले. 'बिहारमध्ये जेव्हा  साने गुरुजींवर डॉ. संजय मं. गो. यांनी भाषण केले तेव्हा हा असा माणूस खरंच या देशात होऊन गेला का? असा प्रश्न श्रोत्यांनी मला विचारला' अशा प्रकारे त्यांनी साने गुरुजींवर भाष्य केले.

गुरुजींचे वारसदार असल्याचा आम्हाला आनंद

जन आंदोलनाच्या राष्ट्रिय संयोजक मेधा पाटकर यांनी यावेळी, 'साने गुरुजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी, समतेच्या विचारासाठी साडेसात वर्षे तुरुंगवास भोगला, ऐंशी दिवस उपोषण केले. म्हणुनच राज्यकर्ते आम्हाला आंदोलनजिवी म्हणतात तेव्हा गुरुजींचे वारसदार असल्याचा आम्हाला आनंद होतो' अशा शब्दात आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगता समारंभाचे संयोजक प्रा. सुभाष वारे होते, तर प्रास्ताविक राजन इंदुलकर यांनी केले. 

८० संघटनांचे  आठशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी

दोन दिवस चाललेल्या या समारंभात युवा संवाद, 'मेरी बात सूनो' हा महिला मेळावा, साने गुरुजी विचार दर्शन परिसंवाद, लघुपट प्रदर्शन व गप्पा याशिवाय पथनाट्य, सांस्कृतीक कार्यक्रम पार पडले. यात डॉ . बाबा आढाव, गजानन खातू, विनोद शिरसाठ, डॉ. चैत्रा रेडकर, डॉ. संजय मंगला गोपाळ, प्रमोद निगुडकर, कलाम अझीम, सिने दिग्दर्शक शिल्पा बल्लाळ,  सुनिल सुखथनकर, चित्रकार राजू सुतार, राजेश कुलकर्णी, अन्वर राजन, हिना कौसर खान, इला कांबळी, सुनिती सु.र., कलाकार अक्षय शिंपी, राजू बहाळकर, उपेंद्र टणूं, संजय रेंदाळकर, ॲड. विजय दिवाणे, ॲड. सुरेखा दळवी, सिरत सातपुते यांचा समावेश होता. या कार्यक्रमात महाराष्ट्रासह बिहार, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, गोवा, केरळ या राज्यातील ऐंशी संघटनांचे  आठशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले.