कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून मांडा पश्चिम भागातील मांडा मुख्य रस्ता ते वासुंद्री पुलापर्यंत नवीन रस्ता होणार आहे. या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहन चालकांना तसेच शाळेय विध्यार्थ्यांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, यासाठी पालिका आयुक्त यांची भेट घेणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते साईनाथ भोय यांनी दिली.
मांडा पश्चिम मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम आरई इन्फ्रा कंपनी कडून सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू असून, ते संथ गतीने सुरु आहे. मांडा पश्चिम मुख्य रस्ता हा रस्ता पुढे वासुंद्री, कोंढेरी, सांगोडा आदि गावांना जोडणारा रस्ता आहे. या भागातील नागरिकांना टिटवाळा रेल्वे स्टेशनकडे येणारा एकमेव रस्ता आहे. परंतु, रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे, तसेच पर्यायी व्यवस्था दुसऱ्या रस्त्याची नसतांना नागरिकांना तसेच वाहन चालकांना अडथळा होत आहे.
कार्यकर्त्यांकडून रस्त्यांच्या कामाची पाहणी
याबाबत सामाजिक कार्यकर्ते साईनाथ भोय, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रविश तांडेल, रिपाइंचे युवक अध्यक्ष सनी जाधव, लक्ष्मण भोईर, जयराम भोय, प्रतिक क्षीरसागर, प्रणय भोय, मोहन डमाले, अन्सर मन्यार, किरण पाटील, नरेंद्र पाटील आदी कार्यकर्त्यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली व संबंधित ठेकेदार यांनी जलद गतीने काम करावे अशा सुचना केल्या. याबाबत सामाजिक कार्यकर्ते साईनाथ भोय यांनी सांगितले की, मांडा पश्चिम मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे.
ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी
हे काम अगदी संथ गतीने सुरु असुन, या भागातील नागरिकांना तसेच वाहनचालकांना तासनतास थांबावे लागते. शाळेच्या बस यांनाही रस्त्याच्या कामाचा त्रास होतो. दुसऱ्या रस्त्याची पर्यायी व्यवस्था नाही, याची महापालिका प्रशासनाने दखल घेऊन या रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे, अन्यथा पालिका आयुक्त यांनी ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी, यासाठी आपण लवकरच पालिका आयुक्त यांची भेट घेणार आहेत, असे सांगितले.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.