सर्वोच्च  न्यायालयाची उच्च न्यायालयांसोबत सहकार्यपूर्ण भागीदारी

नवी दिल्‍ली, ३ एप्रिल २०२५

ई-सुप्रीम कोर्ट रिपोर्ट्स (e-SCR) अर्थात सर्वोच्च न्यायालयाच्या ई अहवाल निकालांचा  18 प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांसोबत सहकार्यपूर्ण भागिदारी केली आहे. यासाठी भारताच्या सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली कृत्रिम बुद्धिमत्ता-सहाय्यित कायदेशीर भाषांतर सल्लागार समिती स्थापन केली आहे. ही समिती कृत्रिम बुद्धिमत्ता-सहाय्यित साधनांचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाच्या (e-SCR) स्थानिक भाषांमधील भाषांतरावर देखरेख ठेवेल.  प्रत्येक उच्च न्यायालयातही त्या-त्या  उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वात अशीच समिती स्थापन करण्यात आली आहे.  

सर्वोच्च न्यायालयाची कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान सहाय्यित समिती उच्च न्यायालयांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता-सहाय्यित समित्यांसोबत सातत्याने बैठकाही घेत आहे, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांच्या मदतीने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या निर्णयांचे स्थानिक भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी दिशानिर्देश/सूचना देत आहे. उच्च न्यायालयांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता-सहाय्यित समिती, कायदा सचिव, महाधिवक्ता आणि राज्यातील भाषांतर विभागाच्या प्रभारी सचिवांना सर्वोच्च न्यायालयाच्या e-SCRचे तसेच उच्च न्यायालयांच्या निर्णयांचे त्या राज्याच्या स्थानिक/प्रादेशिक भाषेत भाषांतर करण्यासाठी प्रत्येक उच्च न्यायालयात भाषांतरकार नियुक्त करण्याच्या प्रक्रियेसाठी कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे.  

28.03.2025 पर्यंत, उच्च न्यायालयांच्या सहाय्याने 36344 सर्वोच्च न्यायालयीन निर्णय हिंदी भाषेत आणि 47439 निर्णय इतर स्थानिक भाषांमध्ये भाषांतरित करून e-SCR पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत (परिशिष्ट-1).