लडाखला राज्याचा दर्जा व सहाव्या अनुसूचीतील समावेशन या दोन महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ठाम पाठिंबा दर्शवला आहे. प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली लडाखमधील जनता गेल्या काही महिन्यांपासून या मागण्यांसाठी संघर्ष करत आहे.

 



अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “लडाखच्या जनतेचा संघर्ष न्याय्य असून तो केवळ एका प्रदेशापुरता मर्यादित नाही. हा देशाच्या लोकशाही मुल्यांचा, संवैधानिक अधिकारांचा आणि पर्यावरणीय समतोलाचा प्रश्न आहे. लडाखला आजवर प्रशासकीय दुर्लक्षाचा सामना करावा लागला आहे. तेथील लोकांच्या आवाजाकडे सतत दुर्लक्ष झाले आहे आणि या दुर्लक्षामुळे लडाखचे अद्वितीय व नाजूक वातावरण असुरक्षित राहिले आहे. अशा परिस्थितीत आम्ही सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला पाठिंबा देतो.”

लडाखला २०१९ साली केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर स्थानिक लोकांनी अनेकदा राज्याच्या दर्जाची मागणी केली आहे. याशिवाय सहाव्या अनुसूचीतील तरतुदी लडाखसाठी लागू झाल्यास तेथील स्थानिक जनतेच्या हक्कांचे व सांस्कृतिक ओळखीचे संरक्षण होईल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

पर्यावरणीय दृष्टीने लडाख हा हिमालयीन पट्ट्यातील अत्यंत संवेदनशील प्रदेश आहे. हवामान बदल आणि अनियंत्रित पर्यटनामुळे येथील परिसंस्था मोठ्या प्रमाणावर धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिकांना निर्णय प्रक्रियेत अधिक अधिकार मिळावेत, ही मागणी आणखी महत्त्वाची ठरते. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेले समर्थन हे लडाखच्या आंदोलनाला राष्ट्रीय स्तरावर बळकटी देणारे मानले जात आहे.