सध्या ‘धुरंधर’ मधल्या रहमान डकैतच्या भूमिकेसाठी अक्षय खन्नाचं खूप कौतुक होत आहे. मी हा चित्रपट पाहिला नाही आणि पाहीन असं आता तरी वाटत नाही.
अक्षय खन्ना मला पहिल्यांदा आवडला तो अर्थात ‘बोर्डर’मध्ये आणि नंतर आवडला तो एका गाण्यात, ते गाणं आहे ‘सावन बरसे तरसे दिल’ – चित्रपट दहेक. हे गाणं आणि त्याचं चित्रीकरण हे इवरग्रीन आहे. यातला मुंबईतला पाऊस आणि त्या पावसात मुंबईकरांची उडालेली तारांबळ; त्यातही प्रेमी युगुलांची एकमेकांना भेटण्यासाठी चाललेली तगमग आणि धडपड. यात अक्षय खन्नाचा प्रेमी खूप लाघवी वाटतो. त्याचं ते बुके आणि प्रेयसीसाठी घेतलेलं गिफ्ट घेऊन साचलेल्या पाण्यात घसरून पडणं खूपच मनमोहक आणि खरंखुरं. या अत्यंत प्रेमळ प्रियकर ते अत्यंत क्रूर शासक औरंगजेब (रहमान डकैतविषयी मला माहित नाही) इथपर्यंतचा अक्षय खन्नाचा प्रवास म्हणजे अभिनयातील उत्क्रांति आहे. याच प्रवासात एक चित्रपट येउन गेला २००७ साली आणि त्याचं नाव आहे, ‘माय फादर गांधी’. (चित्रपट YouTube वर पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.) अक्षय खन्नाच्या सुरुवातीच्या कारकिर्दीतील एक मास्तर पीस म्हणता येईल अशी ही कलाकृती.
हा चित्रपट ‘छोटे गांधी’ म्हणून
दक्षिण आफ्रिकेपासून राजकोट आणि कोलकोत्यात ओळखला गेलेल्या गांधीजींचा मुलगा हरीलाल
गांधी वर आधारित आहे आणि ही भूमिका केली आहे अर्थात अक्षय खन्नाने. हा चित्रपट ‘गांधी’
चित्रपट म्हणूनही त्यावेळी किती चर्चिला गेला हे काही मला माहित नाही. पण इतर ‘गांधी
चित्रपटां’च्या मांदियाळीत याचा उल्लेख झालेला मला कुठे सापडला नाही. एक
हरहुन्नरी, बॅरिस्टर होण्याची आस असलेला युवक, गांधी या नावाची जबाबदारी आणि वलय
या सगळ्याची जाण असलेला एक गांधी, कारावासाची शिक्षा झाल्यावर फुटबॉलचा सामना
जिंकल्याप्रमाणे आनंदित झालेला देशभक्त असा हा हरीलाल त्याची कोणतीच अपेक्षा पूर्ण
न झाल्याने कसा पतित होत गेला याचं अत्यंत हृदयद्रावक चित्रण म्हणजे हा ‘माय फादर
गांधी’ चित्रपट. यात हरीलालच्या आयुष्यातील सर्व टप्पे अक्षय खन्नाने अगदी नेमकेपणाने
पेलले आहेत. ‘गांधी’ असलेल्या वडिलांच्या विरोधात आवाजही उठवता येत नाही आणि
आपल्याला जे हवं आहे ते करताही येत नाही ही कोंडी अक्षय इतक्या सोशिकपणे दाखवतो की
काही वेळा गांधी व्हिलन भासू लागतात. त्याची होणारी कुचंबणा इतकी बोचरी असते की, इतिहासातील
सर्व आवश्यक तपशील येतात तेव्हा वाटत राहतं की जेव्हा आपण स्वतंत्र होत होतो
तेव्हा तिथेच आसपास कोणीतरी अंधाऱ्या गर्तेत ढकलला जात होता!
हरीलालचं पतन एवढं मोठ्या प्रमाणात होतं की गांधीजी स्वत: म्हणतात, ‘दोन अशी माणसं ज्यांना आयुष्यभर मी माझं म्हणणं पटवून देऊ शकलो नाही, त्यातला एक माझा काठियावाडी मित्र मोहम्मद आली जिन्ना आणि दुसरा माझा स्वत:चा मुलगा हरीलाल. हरीलाल गांधी’. हा काहीही न ऐकणारा, सगळे ‘महात्मा गांधी की जय’ बोलत असताना ‘माता कस्तुरबा की जय’ म्हणून घोषणा देणारा मुलगा आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात अक्षयने ताकदीने पेश केला. एकट्या अक्षय खन्नासाठी नाही तर शेफाली शहाने साकार केलेली मुलाच्या पतनाचा धसका घेतालेली कस्तुरबा आणि देशकार्य, मानवी आदर्श आणि पित्याचं हृदय या कैचीत अडकलेला ‘गांधी’ नावाचा बाप साकारलेले दर्शन जरीवाला यांच्यासाठीही ‘माय फादर गांधी’ पाहायला हवा.
हा चित्रपट चंदुलाल भागुभाई दलाल यांच्या ‘हिरालाल गांधी : अ लाईफ’ आणि नीलाबेन पारीख यांच्या ‘गांधीज लॉस्ट ज्युल्स’ या पुस्तकांवर आधारित आहे. Last but not the least याचे निर्माते आहेत अनिल कपूर प्रोडक्शन आणि याचे दिग्दर्शक आहेत फिरोज अब्बास खान.
यातील गांधीजींचा एक संवाद खास आजच्या परिस्थितीसाठी देत आहे.
“हिंदू और मुसलमान मेरी दो आंखे है बा. यह लोग हमारे विश्वास की परीक्षा ले रहे हैं. दोनों
समुदायों के मुठ्ठीभर कट्टरपंथी पूरी सभ्यता को नष्ट नहीं कर सकते. हरिलाल और
अब्दुल्ला दोनों का अर्थ एक ही है बा. इश्वर का सच्चा भक्त. और अगर हरिलाल को
इस्लाम के रस्ते चलकर शांति मिलती है तो वो चाहे अपना नाम हरिलाल रखे या अब्दुल्ला
रखे हमारे लिए तो उतनाही प्यारा होना चाहिए.”
--- एँजेला पवार



0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.