शिलाँग वृत्तसंस्था 

मेघालय राज्यातील शिलाँग येथे खासी विद्यार्थी संघटनेने ‘वंदे मातरम्’ या गीताच्या संपूर्ण आवृत्तीच्या गायनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. शाळा आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये या गीताची सर्व कडवी गायली गेल्यास त्याला कडाडून विरोध करण्याचा निर्णय या संघटनेने घेतला आहे.

या संघटनेच्या मते, ‘वंदे मातरम्’ गीताच्या सुरुवातीच्या केवळ दोन कडव्यांमध्ये मातृभूमीचे वर्णन आहे, परंतु उर्वरित कडव्यांमध्ये हिंदू देवतांचा उल्लेख येतो. हे धार्मिक संदर्भ स्थानिक आदिवासींच्या परंपरा आणि त्यांच्या श्रद्धांशी विसंगत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे गीताचा उर्वरित भाग गाणे त्यांना अमान्य आहे.

संघटनेचे महासचिव डोनाल्ड व्ही थाबाह यांनी स्पष्ट केले की, स्थानिक संस्कृती आणि स्वतःची ओळख जपण्यासाठी हा पवित्रा घेण्यात आला आहे. अशा प्रकारे पूर्ण गीत गाण्याची सक्ती करणे म्हणजे सांस्कृतिक समरसता लादण्याचा प्रयत्न असून, त्याचे भविष्यात स्थानिक समाजावर विपरीत परिणाम होऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

या संदर्भात संघटनेने आपल्या सदस्यांना अशा ठिकाणांची माहिती गोळा करण्यास सांगितले आहे, जिथे पूर्ण गीत गायले जाते. अशा ठिकाणी निषेध आंदोलने उभारली जातील. विशेष म्हणजे, या मुद्द्याची सांगड हिंदी भाषेची जबरदस्ती, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि समान नागरी संहिता यांसारख्या विषयांशीही घालण्यात आली आहे.

शेवटी, संघटनेचे अध्यक्ष लॅम्बोकस्टारवेल मर्न्गनार यांनी खासी समाजाची ओळख आणि एकता जपण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी युवकांना बाह्य दबावांविरुद्ध एकजूट होऊन ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे.