संमोहन हा शब्द साधारण ६० ते ७०च्या दशकात आपल्या मराठी पर्यावरणात संस्थापित व्हायला सुरूवात झाली. त्याआधी संमोहन हा शब्द केवळ एक शब्द होता. वरील दशकात संमोहनाचे प्रयोग सभागृहातून तिकिट लावून सुरू झाले आणि एकाच वेळी समूहाला संमोहित करण्यात येऊ लागले. परंतु त्या काळात हा प्रकार एक प्रकारचा जादूचा प्रयोग किंवा हातचलाखी, नजरबंदी असे समजून सामुदायिक संमोहनाला फारशी प्रसिद्धी, लोकप्रियता वा लोकमान्यता मिळाली नाही.
कालांतराने याच काळात
संमोहन करणारे वा संमोहित करून टाकणारे महाराष्ट्रात दोन फर्डे वक्ते
महाराष्ट्राने ऐकले. आचार्य अत्रे व बाळासाहेब ठाकरे. बाकी महाराष्ट्रभर
शिवाजीराव भोसले, बाबासाहेब पुरंदरे, राम शेवाळकर असे
सभा जिंकणारे व्याख्याते झाले. पुढे ही गाडी आफळे बुवा ते बाबामहाराज सातारकर इथपर्यंत
पोहचली.
९० च्या दशकात विविध
बाबा, बुवा यांचा वावर
वाढू लागला. त्याआधी स्थानिक पातळीवर मर्यादित भक्तांसह अनेक बुवा
जागोजागी आपआपले मठ स्थापून होते. अशा मठात जाणाऱ्या भक्तात षोडषा, तसेच मध्यमवयीन
स्त्रियांचा भरणा अधिक असे. तरूण मुलींना शाळा, कॉलेज, क्लास
व्यतिरिक्त आजच्यासारखे खुले समाज जीवन नव्हते. मठात जाणे हा खुला
श्वास घेण्याचा बहाणा होता. तर विवाहित स्त्रियांसाठी कौटुंबिक जबाबदारीपासून काही
प्रमाणात सुटकेचा हा एक मार्ग होता. पण बुवा मात्र किंचित संमोहनाच्या आधारे
नाना उद्योग करत. काहींची वाच्यता होई, बऱ्याच गोष्टी
दडपल्या जात.
यावरूनच ६० च्या दशकात
आचार्य अत्रेंनी ‘बुवा तिथे बाया’ हे नाटकही लिहिले होते.
बाबा, बुवा आणि बाया हे
समीकरण तसे जुने. आता स्त्री विषयक तसेच जादूटोणा कायदा झाल्याने व मागच्या
तीस - चाळीस वर्षात स्त्री मुक्ती चळवळीच्या प्रबोधनामुळे मुली, बाया
अन्यायाविरोधात आवाजही उठवू लागल्याने अशांचे प्रताप उघडकीस येऊ लागले. अर्थात हे
होईपर्यंत या मुली, स्त्रिया व पुरूषही आपली बुद्धी गहाण
ठेवतात ते एका संमोहनामुळेच. यासाठी सध्याचा प्रचलित शब्द अंधभक्त!
ताजे कॅप्टन प्रकरण आपण
२१ व्या शतकाची पंचवीशी ओलांडल्यावर घडतेय हे विशेष. आर्थिक उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण, माध्यम स्फोट, इंटरनेट, मोबाईलच्या
वाढत्या काळात खेड्यापाड्यातील बाबा, बुवा, माता, साध्वी
यांच्याबरोबरीने देशी परदेशी शिष्यगण असलेले हायटेक बाबा, बापू, माँ ही अवतरले व अशिक्षित
ते उच्चविद्याविभूषित, तालुकास्तरीय ते महानगरीय असे सर्व प्रकारचे (अंध) भक्त असलेले विविध परिवार उभे राहू लागले. ९२ नंतर सार्वजनिक
जीवनात व २०१४ नंतर केंद्रात व राज्यात हिंदुत्ववादी विचारांची सरकारे बहुमताने
सत्तेत आल्यावर या गोरखधंद्याना संविधानिक अथवा कायदेशीर संरक्षणाची प्रत्यक्ष
अप्रत्यक्ष साथ मिळाल्याने बहुसंख्य हिंदू बाबा, बुवा, माँ, साध्वी यांचा मुक्त संचार सुरू झाला.
याला समांतर
दूरचित्रवाहिन्या, केबल नेटवर्क व नंतर इंटरनेट
माध्यमातून जहाल मुस्लीम कट्टरपंथी व अंधश्रद्धेकडे नेणारे काही
ख्रिस्ती धर्मगुरूही आपल्या परिने यात भर घालतच होते. बाकी सर्व जाती
जमाती पंथ यातील जात पंचायती, खाप पंचायती यातून
अंधश्रद्धांचे जाळे पार आदिवासी पाड्यापर्यंत पिढ्यानपिढ्या अस्तित्वात
आहेच. थोडक्यात श्रद्धेच्या
नावाखाली अंधश्रद्धेचा
बाजार भारतात सर्वदूर शतकानुशतके चालूच आहे.
खरात प्रकरणाने हे
पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेय. व्यक्ती, ठिकाण व तपशील
बदलतो बाकी सारे तेच. अटका होतात, खटले चालतात, शिक्षा होतात, तुरूंग भरतात तसेच
जामिनावर मोकळे
होतात वा फर्लो मिळवून उंडारतात. वचक बसेल अशा आजन्म सश्रम कारावासाची अथवा देहदंडाची शिक्षा
झाल्याचे क्वचितच. त्यामुळे संमोहनाचा हा खेळ चालूच राहतो.
दुसरे संमोहन आहे आपल्या राजकीय जीवनातले. स्वातंत्र्यपूर्व
काळात स्वातंत्र्य चळवळ, सशस्त्र क्रांती यांचे संमोहन तरूण
तरूणींवर होते. स्वातंत्र्यानंतर संसदीय लोकशाही स्थापन झाल्यावर गांधीवाद, समाजवाद, कम्युनिझम, हिंदुत्ववाद ते
नक्षलवाद पुढे फुले शाहू आंबेडकर
स्त्रीवाद यांनी संमोहित झालेले तरूण तरूणी या विचारधारा मानणाऱ्या राजकीय पक्ष,संघटना यात सक्रीय झाले.
राष्ट्रीय पक्षांच्या छत्राखाली पंचवीस - तीस
वर्षे काढल्यावर प्रादेशिक पक्षांनी राज्य, भाषा अस्मितेला
मुख्य धोरण ठरवून प्रादेशिक पक्षांची स्थापना झाली. द्रमुक ते शिवसेना
व्हाया आसू (आसाम) अशी त्यांची स्थापना व वाढ झाली. जनमानसावर या
पक्षांनी मतदारांना अस्मितेच्या राजकारणाचे संमोहन करून पक्षवाढ करून सत्ताही
मिळविली. महाराष्ट्रात शिवसेना हे बाळासाहेब ठाकरे यांचे मराठी
अस्मितेचे अपत्य. चाळीस वर्षे मराठी भाषा, माणूस व हक्क यावर राजकारण
केल्यावर ८९साली त्यांनी भाजपसोबत राजकीय युती करत हिंदुत्वाची पताका हाती घेतली. त्यातून शिवसेना
मुंबई ठाण्याबाहेर महाराष्ट्रात पसरली. ती इतकी की सरसेनापती असलेले
बाळासाहेब ठाकरे हिंदुहॄदयसम्राट झाले.
ज्या भाजपला आपले बोट
धरू दिले, त्यांना
महाराष्ट्रात मैदानी ताकद दिली, सत्तेपर्यंत
पोहचवले त्याच भाजपने बाळासाहेबांच्या निर्वाणानंतर हळूवारपणे ॲापरेशन लोटस करत
२०२२ साली बाळासाहेबांचेच पुत्र उद्धव
ठाकरे यांची शिवसेना फोडून त्यांचेच एक शिलेदार एकनाथ शिंदे
यांच्या हाती बंडाचे निशाण व पुढे मुख्यमंत्रीपदही दिले.
भाजपच्या या
सत्तासंमोहनात एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी इतके संमोहित झाले की, त्यांनी
बाळासाहेब स्थापित शिवसेना पक्ष चिन्हासहित ताब्यात घेतला.
याचे यथोचित फायदे
त्यांना २०२२ ते २०२४ पर्यंत सुखनैव लुटू दिले. २०२४ च्या
विधानसभा निवडणुकीनंतर संमोहन
कमी करत भाजपने शिवसेनेला जागे करण्यास सुरूवात केली. प्रथम
मुख्यमंत्रीपद गेले. अनेक पालकमंत्रीपदी संधी हुकवली आणि आता साताऱ्यात थेट
हातापाईची वेळ आली.
भाजपच्या संमोहनाची
छाया आजही इतकी गडद आहे की, अपमानाचा दोष भाजपवर न टाकता पोलीस व
प्रशासनावर टाकत शिवसेना युतीधर्मावर भक्ती दाखवत राहिलीय.
इतर बाबा, बुवा इफेक्ट व
ॲापरेशन लोटस संमोहनात काही फरक दिसतो? दोन्हीकडच्या
नादावलेल्यांना अंधभक्त अशी एकच उपाधी लावली तर कुणी तक्रार करायचं कारण उरेल?
ताजा कलम :
महाराष्ट्रात एक
स्वयंघोषित लोकमान्य, राजमान्य दैनिक आहे. त्याचे संपादक हे
स्वत:स विशेष समजतात. त्याच्या अग्रलेखांतून ते तुटून पडतात तसेच सोयीने ताट
चाटून पुसून पुख्खाही झोडतात. एका ताज्या अग्रलेखात त्यांनी जादूटोणा कायदा महाराष्ट्रात
लागू करण्याचे श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण
यांना बुद्धिवादी ठरवत दिलेय. आपण यांचे जूने लेख तपासलेत तर हे बोरूबहाद्दर पृथ्वीराज ’बाबां’चे
अंधभक्त आहेत हे लगेचच कळेल. दाभोळकरांच्या हत्येनंतर एका सामाजिक दबावाखाली हा कायदा
मूळ नाव बदलून केला गेला. मुख्यमंत्री निमित्त ठरले! बुद्धिवंत पृथ्वीराजांनी दाभोळकर हत्त्याप्रकरणी पुढे काय केले? प्रत्यक्ष
दाभोळकरांनी आमच्या एका भेटीत सांगितले की दहा बारा वर्षांहून अधिकच्या
या विधिमंडळीय लढाईत पहिल्यापासून सर्वात जास्त सक्रिय पुढाकार घेतला तो अजितदादा
पवार यांनी! पण त्यांची ओळख बोरूबहाद्दरांलेखी बुद्धिवंत नसल्याने
त्यांनी आपल्या बाबांस श्रेय देऊन इमान राखले!
संजय
पवार



0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.