चिपळूण – प्रतिनिधी - दि. २२ मार्च २०२६
आपल्या देशात
सांस्कृतिक संघर्ष अनादी काळापासून सुरू आहे. हा सांस्कृतिक लढा महत्त्वाचा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा संघर्ष पुढे नेताना विविध पातळीवर त्यांना लढावे
लागले. विषमतावादी संस्कृती बदलासाठी पुष्कळ परिश्रम बाबासाहेबांनी घेतले व
त्यातून एक नवी समतावादी आदर्श बौद्ध संस्कृती उदयास आली. त्यामुळे साहित्यिकांनी
या सांस्कृतिक संघर्षाचा वेध घेऊन प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी निकोप काम
करायला हवे, असे
स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ, सुप्रीम कोर्टातील वकील ॲड. संघराज रुपवते
यांनी येथे केले.
कोकणातील साहित्यिक व
कलावंतांची शिखर संस्था असलेल्या अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या (रजि.) तिसऱ्या वर्धापन
दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या ठिकाणी रविवारी करण्यात आले होते. त्यावेळी ते
प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रबोधिनीचे
केंद्रीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तथा पॅंथर ज. वि.
पवार हे होते. विचार मंचावर प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक आनंद देवडेकर, उपाध्यक्षा प्रा. आशालता
कांबळे,
डॉ. राजेंद्र मुंबरकर, प्रा. डॉ संजय खैरे, प्रा. विजय मोहिते, संजय गमरे, ज्येष्ठ कवयित्री
कविता मोरवणकर, सरचिटणीस सुनील हेतकर, संदेश पवार, अशोक
चाफे,
डॉ. श्रीधर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
ॲड. संघराज रुपवते पुढे
म्हणाले,
“समाजाचे नेतृत्व
करणाऱ्या लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ विचार, बुद्धाचा मूळ विचार नीटपणे अंगिकारला नसल्यामुळे
या विचारांमध्ये अनेक विचारांची भेसळ झालेली आहे. वंचित, बहुजन, मूलनिवासी यासारख्या भ्रामक संकल्पनांमुळे मूळची बुद्धिस्ट
आयडेंटिटी हरवलेली आहे. त्यामुळे ती हरवलेली बुद्धिस्ट आयडेंटिटी प्राप्त
करण्यासाठी सर्व स्तरावर काम करण्याची आवश्यकता आहे. नेत्यांनी
योग्य प्रकारे काम न केल्यामुळे आंबेडकरी समुदायाचे प्रचंड मोठे नुकसान झालेले
आहे. त्यामुळे ही जबाबदारी आता विचारी लोकांवर येऊन पडते, ती आपण स्वीकारली पाहिजे. लोकांना बाबासाहेबांचा व बुद्धाचा
मूळ विचार समजावून सांगितला पाहिजे.”
यावेळी त्यांनी अतिशय काव्यमय शैलीत विविध उदाहरणाद्वारे आपले मत प्रकट केले.
आगामी जनगणनेच्या
संदर्भात बोलताना ते म्हणाले, “एका मोठ्या
संस्थेने पत्रक काढून लोकांना लाभ मिळावा म्हणून काही मार्गदर्शन केले आहे. मात्र
ते अत्यंत चुकीचे आहे, असे आपले स्पष्ट मत असून न्याय्य मार्ग काढण्यासाठी सरकारला सूचना करायला
हव्यात. बौद्ध समुदायाची नोंद जनगणनेमध्ये योग्य होण्यासाठी त्यांच्या सन्मानाला
कुठे धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता
आहे. नाहीतर जनगणनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा धर्मांतरित बौद्ध झालेल्या
समुदायाला पुन्हा जातीच्या बखेड्यात ढकलण्याचा प्रयत्न केला जात नाही ना? याचा शोध घेतला पाहिजे. त्यासाठी समाजातल्या शीर्ष
नेतृत्वाने दूरगामी विचार करून योग्य कृती केली पाहिजे. बौद्धांची नोंद करताना ती
बौद्ध म्हणूनच व्हावी, अथवा धर्मांतरित बौद्ध म्हणून व्हावी, शिवाय ते अनुसूचित जाती अथवा जमातीचे आहेत इथपर्यंत होणे ठीक आहे.
मात्र ते कोणत्या जातीचे आहेत? त्या जातीची नोंद मुळीच आवश्यक नाही.”
ते पुढे म्हणाले, “चवदार तळ्याच्या
क्रांतीला शंभर वर्षे पूर्ण होत असताना आंबेडकरी चळवळीने आपले सिंहावलोकन केले
पाहिजे. आपल्या चळवळीचा सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय वाटचाल योग्य दिशेने होण्यासाठी काम करण्याची
आवश्यकता आहे. बाबासाहेबांनी १०० वर्षांपूर्वी चवदार तळ्याच्या पाण्याला लावलेली आग आजपर्यंत
विझू शकलेली नाही आणि यापुढे शतकानुशतकेही ती विझू शकणार नाही, अशा प्रकारची क्रांती डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे. हा क्रांतीचा विचार विझू न देणे ही सर्वांची
जबाबदारी आहे. १९२७ साल हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचे वर्ष
आहे. अनेक क्रांतिकारी घटना या वर्षी घडल्या
आहेत. म्हणूनच १ जानेवारी १९२७ रोजी भीमा कोरेगाव या
ठिकाणी केलेल्या अभिवादनापासून
ते १४ ऑक्टोबर १९५६ रोजी केलेल्या बौद्ध धम्म स्वीकारापर्यंतचा त्यांचा हा
प्रवास आपल्याला खूप मोठा सांस्कृतिक संघर्षाचा आणि सर्वांना प्रेरणादायी आहे.”
यावेळी प्रा. आनंद
देवडेकर,
प्रा. अशालता कांबळे, सरचिटणीस सुनील हेतकर, प्रा. विजय मोहिते तसेच विविध जिल्हाध्यक्ष यांनी आपली मनोगते
व्यक्त केली. आपापल्या जिल्ह्यात प्रबोधिनीचे काम कशाप्रकारे चालते आहे याचे
विवेचन केले. अध्यक्ष ज. वि. पवार यांनी तीन वर्षांमध्ये प्रबोधिनीने
केलेले काम फार मोठे आहे, असे नमूद करून आगामी काळात ही संस्था चळवळीसाठी एक
महत्त्वाची संस्था म्हणून नावारूपाला येईल मला आशा वाटते, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस संदेश
पवार यांनी केले.
यावेळी डॉ. श्रीधर पवार
यांची कन्या सृजना निरंजनी श्रीधर यांचे ‘टू इंटरव्ह्यूज’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या
हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमानंतर
ज्येष्ठ कवयित्री कविता मोरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन घेण्यात आले. कवी
संमेलनाचे सूत्रसंचालन कवयित्री स्नेहा कदम हिने तर संपूर्ण कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन कवी प्रतीक पवार यांनी केले. आभार अशोक चाफे यांनी मानले.
या कार्यक्रमाला
नाटककार अरुण कदम, कामाठीपुराकार सुधीर जाधव, पॅंथर सुमेध जाधव, प्रा. उत्तम भगत, शारदा नवले, प्राचार्य गिरीश साळवे, प्रसेनजीत, रत्नपाल जाधव, के पुरुषोत्तम, विद्या हेतकर, स्नेहल तांबे, अनिल जाधव, प्रशिल जाधव, बौद्धाचार्य सकपाळ, ॲड. नाना अहिरे, ॲड. जालिंदर यादव, दीपक भालेराव, प्रकाश कांबळे, वसंत मोरे, राजा रावळ आदि मान्यवर
प्रेक्षकात उपस्थित होते.


0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.