सध्या कॅप्टन अशोक खरात यांच्याबद्दल रोज नवनवीन बातम्या येत आहेत. नवनवीन नावे जोडली जाताहेत. त्यांचे नवनवीन प्रयोग बाहेर येताहेत. त्यात एका ठिकाणी असं म्हटलंय कॅप्टन स्वच:ला ईश्वर / देव यांचा दूतच असल्याचे सांगत होता. म्हणजे हाही एक नॉनबायोलॉजिकल असण्याचा प्रकार. लोक त्यावर विश्वास, (अंध) श्रध्दा, आस्था ठेवतात. असं करणारा वा दावा करणारा कॅप्टन हा पहिला वा एकमेव नाही.



या आधीही अनेकांनी स्वत:ला, रामाचा, कृष्णाचा आणखी कुणाकुणाचे अवतार मानून आपल्या भक्तसंप्रदायाचे भावनिक शोषण केलेले आहे. शोषण जोपर्यंत आर्थिक, मानसिक, लैंगिक या प्रकारात होऊनसुध्दा भक्तांची श्रद्धा तसूभर हलत नाही. कधीतरी, कुणाची तरी हा दाब सहन करण्याची क्षमता संपते आणि मग खूनाला वाचा फुटते तशी बातमीलाही वाचा फुटते. आणि मग काही दिवस, वर्षे ही बातमी चर्चेत राहते, नंतर ती विस्मृतीत जाते.

चर्चा फार वरच्या पातळीपासून, सर्वसामान्य पातळीवरच्या भक्तांची होते. पण २०२६ मध्येही विज्ञानवादी विचार का रूजत नाहीत? या चर्चा होत नाहीत. जादूटोणा कायद्याअंगर्गत शिक्षा होईल हे खरेच. पण त्या कायद्याच्या पलिकडे सर्वसाधारण जे फौजदारी कायदे आहेत ते वापरून सुद्धा विविध कलमांखाली डझनावारी बाब, बुवा, साध्वी तुरूंगात जाऊ शकतात. पण हे केले जात नाही. सत्ताधारी, प्रशासन, पोलीस नी न्यायव्यवस्था यांच्याही काही गरजा, प्राधान्यक्रम असतात. त्या सर्वांच्या सोयीने एखादे प्रकरण बाहेर येते, मोठे होते, शांत होते. पुढे विस्मृतीत जाते.

यात अनेकदा तर असे वाटते की, एखाद्या चित्रपटाप्रमाणे याची कथा, पटकथा व संवाद लिहून तयार असतात. एक बाबा तयार केला जातो. त्याचा अवतार प्रसिद्ध केला जातो. भरपूर लूट करवून घेतली जाते. यात काळही निश्चित केला जातो. होणाऱ्य उत्पन्नातील प्रत्येकाचा वाटाही निश्चित केला जातो. तुरूंगात कुणी किती वर्षं रहायचं हे ही ठरवलेलं असतं. काही वेळा यात दगाबाजी होते. भागीदार पलटतात. खेळ उलटाच अंगावर येतो. असं घडलं तर बळी कुणाचा द्यायचा याच्याही चाली रचल्या जातात. मोठे खेळाडू बालमबाल वाचतात. प्यादी मरतात.

यातून जप्त केलेली संपत्ती, रोख रक्कम, स्थावर जंगम मालमत्ता यांचे नेमके काय होते, हे कुणालाही कळत नाही. अनेकदा या सर्व गोष्टी कथानकाला आवश्यक म्हणून ही प्रॉपर्टी जमा केलेली असते. ही जप्तीत गेली तरी मूळ मालमता कुठे तरी शिल्लक असते! हा सगळा खेळच सुव्यवस्थेचा उचित वापर करूनच सुरक्षित राखलेला असतो.

 सध्याही नव्या ताज्या भोंदू बाबाच्या निमित्ताने राजकारण्यांची चर्चा झडतेय. मुळात हे राजकारणी भक्त म्हणून जातात त्याच्याकडे की भागीदार म्हणून? कारण आपले राजकारणी व त्यांची भक्ती सत्ता सोडली तर कुणाशीच नाही. सत्ता मिळवायला पैसा लागतो. पैसा या अशाच मार्गाने झटपट व अमाप मिळू शकतो. प्रसंगी किमान ते कमाल कुप्रसिद्धी मिळू शकते. हे गुंतवणुकीतले धोके म्हणून बघितले जाते. यातही राजकारण होते. सगळे मती गुंग करणारे आहे, असते व राहिल.

जोवर सूर्य आहे व पॄथ्वी सूर्याभोवती फिरताना स्वत: भोवती फिरतेय तोवर दिवस व रात्रीचा उडेड व अंधाराचा खेळ सुरूच राहणार तसेच जोवर श्रद्धा आहे तोवर अंधश्रध्दा राहणार. सत्ता आहे तोवर पैसा व पैसा आहे तोवर सत्ता लाभत राहणार. हे (दुष्ट) चक्र भेदायचे देखावे उभे केले जातील पण चक्र भेदण्याऐवजी ते चालूच ठेवण्याकडे कल राहणार.

यदा यदा ही धर्मस्य त म्हटल्याप्रमाणे मी पुन्हा येईन’चे(च) प्रयोग चालू राहतील. पुन्हा फडणवीस नाही भोंदू बाबा नामक नॉनबायोलॉजिकल समाजात येत राहणार. येतच राहणार. समाजाच्या विवेकालाच आव्हान देत राहणार. समाजाचा विवेक कधी काळी तरतमभाव पाळणारा होता.आता तो विवेकाचा खून करून आम्ही त्याचा वध केला, असं गर्वाने म्हणत उन्मादी यात्रा काढतो.

ही यात्राच विवेकाची अंत्ययात्रा असते जी सध्या सर्रास निघताना दिसतेय. चिंतेस कारण नाही का हे बायोलॉजिकल समाजास?

 

ताजा कलम :

दिवंगत अजित पवार यांचा पक्ष, ते ज्यातून बाहेर पडले तो मूळ पक्ष व पवार परिवार यांच्यात नेमके काय चाललेय कळत नाही. हे म्हणण्याचे कारण संसद रत्न खिताबाच्या अनेक वेळच्या मानकरी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनावर संसदेत आपले म्हणणे उशिरा का होईना मांडले. मात्र बहुतांश वेळी इंग्रजी वा हिंदीत दमदार बोलणाऱ्या सुप्रियाताईंनी हा विषय मात्र स्वच्छ व संपूर्ण मराठीच मांडला!

काही(स)कारण सापडतेय का?

 

संजय

पवार