ये पब्लिक है, ये सब जानती है अशा मुखड्याचं गाणं साधारण ७०/८० च्या दशकात अतिशय लोकप्रिय होतं. त्या गाण्याची आज आठवण काढण्याचं कारण काय? असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर पुढीलप्रमाणे.

जगप्रसिध्द गायिका आशा भोसले यांचं ९२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांच्या ज्येष्ठ भगिनी लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच वृद्धापकाळाने आशा भोसलेंचंही निधन झालं.



९२ वर्षांचं आयुष्य म्हणजे शारिरिकदृष्ट्या समृद्ध आयुष्यच म्हणता येईल. अखेरच्या काळातील काही छोटी-मोठी आजारपण वगळता, अगदी ९० व्या वर्षीही त्यांनी गायनाचा जाहीर कार्यक्रम करून त्यांच्या अगणित विक्रमात आणखी एका विक्रमाची भर घातली. त्यामुळे एका सुफळ, संपूर्ण आयुष्याची अखेर सुसह्य पद्धतीने झाल्याचे समाधान त्यांच्या आप्तस्वकियांसह तमाम भारतवासीयांनाही वाटले असावे.

असे असले तरी त्यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने त्याचे वृत्तांकन झाले ते फारच ठोकळेबाज किंवा एक उपचार करावा तसेच केलेले दिसले. दूसरा प्रकार अतिशय आश्चर्यकारक होता तो म्हणजे आशा भोसले यांची अलिकडची काही विधानं समाजमाध्यमांवर पुर्नप्रकाशित करून त्यांच्यावर तिखट शब्दात प्रहार करून ‘विनम्र’ आदरांजली वाहिली गेलेली दिसली. त्यात आशा भोसलेंसह मंगेशकर परिवारावरही टिप्पणी केलेली दिसली.

सर्वात तिखट प्रतिक्रिया उद्धव व राज ठाकरे या बंधूचे पक्ष, त्यांचे सैनिक यांच्याकडून नोंदविल्या गेल्या. त्यानिमित्ताने लता व मंगेशकर कुटुंबियांवरी सप्रमाण दाखले देत सैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्यात. आणि इथेच ते गाणं प्रकर्षाने आठवतं, ये पब्लिक है, ये सब जानती है.

बाळासाहेब ठाकरे हयात असताना हे कुटुंब बाळासाहेबांनाच हिंदहॄदयसम्राट म्हणून मुजरे करत होते. अगदी काल-परवापर्यंत उद्धव व विशेषत: राज ठाकरेंविषयी तोंडभरून कौतुक करणाऱ्या आशा भोसले यांनी नुकतंच अतिशय कोरडेपणाने मी फक्त आशिष शेलारांनाच ओळखते, असं अत्यंत कृतघ्नपणाचे उदगार काढले. जे आता सांस्कृतिक इतिहासात त्यांच्याच मुखातून नोंदीकृत झालेत.

या कुटुंबाने २०१४ नंतर राजकीय पक्ष, व्यक्ती यांना लाजवतील अशा सत्ताधीशधार्जिण्या भूमिका ज्या लगबगीने घेतल्या, हे आजच्या भाषेत बोलायचे तर सगळे ‘पब्लिक डोमेन’मध्ये उपलब्ध आहे. ज्यांना लोकोत्तर व्यक्तित्वं म्हणून सर्वसामान्य जनतेने भरभरून प्रेम दिलं, त्या सामान्यांना सुप्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात काय पद्धतीने वागणूक दिली जाते, हे अलिकडेच एका प्रभावशाली राजकीय पुढारी व त्यांचे आप्तस्वकियांना प्रत्यक्ष अनुभवता आले. ज्यात त्या रूग्णाचा मॄत्यूही झाला. अखेर रुग्णालय प्रशासन, विश्वस्त, शासन यांनी त्या प्रकरणात टेबल टेनिस खेळून ते प्रकरण मिटवून (की दडपून) टाकले! शासनाकडून सवलतीत जमीन, महागडी तिकिटे लावून गाण्याचा जाहीर कार्यक्रम करून सर्वसामान्यांसाठी रुग्णालय निर्मितीचा इरादा जाहीर केला गेला. पुढे इरादा बोलाचा व कागदावर राहिला व रोकडा व्यवहारच सर्वसामान्यांच्या नशिबी आजही येतो.



आता कालही आशा भोसलेंचे अंत्यविधी झाल्यावर संध्याकाळी पं. हृदयनाथ मंगेशकर व मंगेशकर रुग्णालयाचे विश्वस्त धनंजय केळकर यांनी एक छोटेखानी प्रेस घेतली आणि जाहीर केलं की, येत्या १६ तारखेला नव्या व भव्य रुग्णालयाचे भूमिपूजन होणार आहे. नियोजित रुग्णालयाचे नाव लता-आशा मल्टिस्पेशालिस्ट रुग्णालय’ असे असणार आहे. भूमिपूजन व आशा भोसलेंना श्रद्धांजली असा हा एकत्रित कार्यक्रम असणार आहे. हा कार्यक्रम ३ हजार निमंत्रितांसाठी(च) असणार आहे. पत्र परिषदेत उपस्थित पत्रकारांना त्यांनी निमंत्रित करत, श्रद्धांजली कार्यक्रम असल्याने शक्यतो पांढरे कपडे घालून या, असं सांगायलाही पंडितजी विसरले नाही. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत पण विशेष उपस्थिती सरसंघचालक मोहन भागवतांची असणार आहे, हेही पुन्हा पुन्हा सांगितले पंडितजी व केळकरांनी! (सुनेत्रा पवारांना तुम्ही चुकलात म्हणून जाहीर चपराक देणारे आता यावर काही खरडतील का सोयिस्कर लेखणीबंद ठेवतील?)

याच पत्रपरिषदेत आशाताईंच्या आठवणीस विनम्र नकार देत पंडितजींनी चांगला संयमी पायंडा पाडला. कारण सकाळी अंत्यदर्शन व अंत्यविधीवेळी काही नातवंडे, पतवंडे सेलिब्रिटी व कॅमेरे लक्षात ठेवून जे काही उमाळे काढत होते ते फारच कृत्रिम वाटत होते. कारण ९२ वर्षांचे समृद्ध जगून निधन पावलेल्या व्यक्तिसाठी किती ते दु:खाचे प्रदर्शन!

या तुलनेत जानेवारी महिन्यात अपघाती निधनात राजकीय कारकिर्दीच्या मध्यान्ही असलेला पती गमावलेल्या सुनेत्रा पवार व आपला काल रात्रीपर्यंत सोबत असलेला बाप गमावलेल्या जय व पार्थ पवारांचा अशा वेळचा संयम आठवा!

म्हणून आज ते गाणं आठवतं 'ये पब्लिक है. सब जानती है…'

 

ताजा कलम :

लाडकी बहिण योजनेतून सत्ता मिळाल्याने राज्य कर्जबाजारी असतानाही योजना चालू ठेवणे सरकारला अपरिहार्यच. विविध नियम लावून लाभार्थींची छाटणी करूनही सरकारला ही योजना पेलवणे कठीण जात असल्याने सरकारने महसूल वाढविण्यासाठी विदेशी दारूचे दर वाढविले. परिणामी बहिणींचे भाऊ, पती, मुले (प्रसंगी स्वत:) वगैरेना देशी दारू वा बिअरकडे वळावे लागलेय!

लाडक्या बहिणींसाठी भावांनी लाडक्या ब्रॅन्डला सोडून दिलेय!

 

संजय

पवार