सत्तर-ऐंशीच्या दशकातील हिंदी चित्रपटातील एक शैलीदार खलनायक होते अजित. अत्यंत भरदार आवाज पण बोलणे संथ लयीत. त्यांच्या संवाद म्हणण्याची शैली लक्षात ठेवून त्यांचे संवाद लिहिले जात. ते लोकप्रिय होत. काही वेळा नकलाकार काही संवाद निर्माण करत. असाच त्यांचा एक संवाद होता… ‘इसे लिक्विड ॲाक्सिजनमें डालदो! लिक्विड इसे जिने नही देगा और ॲाक्सिजन इसे मरने नही देगा!!’ हा संवाद आठवण्याचे कारण पंतप्रधान मोदींचे शनिवारी राष्ट्राला उद्देशून केलेले संदेशवजा भाषण. यात संदेश नव्हताच; होते फक्त भाषण व ते ही निवडणूक प्रचारी थाटाचे.
‘आले मोदींच्या मना तिथे मोदींचेही चालेना,’ अशा
घटनाक्रमांची किंवा तथाकथित धक्कातंत्राची आता गेल्या दशकभरात सर्वांनाच सवय
झालीय. त्यामुळे अकरा वर्षाच्या कारकिर्दीत थेट सभागृहातच संख्याबळाअभावी
सरकारचा पराभव मोदींच्या जिव्हारीच लागला. पराभव दिसत असताना त्यांनी लोकसभेत भाषण
केलं. पराभव झाल्यावर भाजप कार्यकर्त्यांसमोर पुन्हा भाषण. तेही कमी वाटले
म्हणून आपलाच चेंडू व आपलीच बॅट असल्याने दूरचित्रवाणीवरून पुन्हा ‘राष्ट्र के नाम संदेश’ म्हणून पुन्हा
तेच भाषण!
महिला आरक्षण बिल
संसदेत विरोधकांनी त्यातूनही कॉंग्रेसने मंजूर होऊ दिले नाही व देशातील महिलांचा हक्क हिरावून
घेतला. सबब देशातील महिला विरोधकांना - त्यातूनही कॉंग्रेसला
माफ करणार नाहीत. त्या होऊ घातलेल्या पाच राज्यातील निवडणुका, नंतरच्या तीन
वर्षातील इतर राज्य निवडणुका व २०२९ सालातील लोकसभा निवडणुकीत महिला म्हणजेच आई, बहिण, पत्नी, मुलगी, आजी इ. स्त्री देहधारी
साऱ्या विरोधकांना त्यातूनही
कॉंग्रेसला आयुष्यभराचा धडा
शिकवतील. सुपडा साफ करतील!
याचा उलट अर्थ त्या
भाजपला व मोदींना विजयी करतील व मोदी नेहरूंच्या कारकीर्दीच्या वर्षांचा विक्रम मोडतील. शिवाय नवा विक्रम रचतील. कदाचित ते तहहयात
पंतप्रधानपदी बसून राहतील, नवनवी विधयके आणून!
खरं तर २०२३ सालीच
मंजूर झालेल्या महिला आरक्षणाची ढाल नव्या विधेयकाच्या रूपाने बनवून त्यामागून
मतदारसंघ परिसिमन व जातगणना अशी एकात एक भांडी असावीत तशी विधेयके मंजूर
करवून घेऊन २०२९ च्या लोकसभा विजयाची रेष आत्ताच ठळक नोंदवून टाकायची असा ताकाला
जाऊन भांडे लपविण्याचा खेळ भाजप व मित्रपक्ष खेळले. पण घटनात्मक
दुरूस्ती असल्याने दोन तॄतीयांश मतं मिळणं शक्य नसताना खेळले व तोंड फोडून
घेतले!
‘गिर गए तो भी टांग उपर’ ही संघ व भाजपची नेहमीची पराभवोत्तर रणनिती. देशातील पारंपरिक माध्यमे व नवी समाजमाध्यमे भाजपने दहशत, दडपण व पैसा पेरून हाताशी ठेवल्याने जनसामान्यांना एकच एक बाजू दाखवली, लिहिली जाते. ती एकच बाजू अर्थातच भाजपची असते. परवापासून तेच चालू आहे. त्याचाच एक भाग होता ‘राष्ट्र के नाम संदेश!’
यात माध्यमांची साथ
भाजपलाच. सरकार संसदेत हरलं पण लोकमान्य लोकशक्ती दैनिकात पहिल्या
पानावर फोटो भाजप एनडीएच्या महिला खासदारांचा! माध्यमातले भाजप व परिवाराचे स्लिपर
सेल विरोधकांना श्रेय देत नाहीतच. उलट त्यांच्या विरोधी बातम्यांचे मथळे नीट चालवतात.
आता देशभर ‘नारी वंदन’ कार्यक्रम
राबवणार. गुलाम माध्यमे रकाने भरणार. अग्रलेखातून
चापट्या मारल्यासारखे करणार व उरलेली १५/२० पाने नमो, नमामि, वगैरे नमो
बाराखडी.
विरोधकांना एकीच्या
बळावर अकरा वर्षांनी का होईना सरकारच्या उन्मत्तपणाची हंडी फोडता आली!
आता एकच अपेक्षा. २०२४ लोकसभा
विजयानंतर पुन्हा अगभूत गुणांनी विस्कळीत झालेल्या विरोधकांवर नंतरच्या विधानसभा
ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत
सपाटून मार खायची वेळ आली. त्यातून ते गारद
झाले होते. या एका विजयाने गाफील न राहता पुढील तीन वर्षे विविध
विधानसभेसह लोकसभा निवडणुकीत ही आघाडी. एकी टिकवली तर देशाला विघटन नी विखारी धर्मांधतेच्या
ज्वालामुखीवर बसविणाऱ्या मंडळींना हद्दपार करून संविधान व देश वाचवता येईल.
ताजा कलम :
हॄषिकेश जोशी हे हिंदी
मराठी चित्रपट, वेब सिरीज इत्यादी मधील एक दमदार नाव. कोल्हापूरच्या
मातीत जन्मलेला हा कलाकार रंगभूमी व पडदा यावर व त्यामागे एक अत्यंत बुद्धिमान, मिश्किल
व वातावरण खेळकर ठेवणारं व्यक्तिमत्व. त्यांचे वडिलही कोल्हापूरच्या मातीतले चित्रकार, चित्रकर्मी. तर या जोशींनी
परवा पुण्यात एका कार्यक्रमात एक विधान केलं. ते पुढील प्रमाणे :
‘नाट्यकलेचा अभ्यास करताना मी दोन दशके डाव्या विचारांच्या
प्रभावाखाली होतो. मात्र जगभरातील संस्कृती नष्ट होत असताना
भारताची संस्कृती का टिकली याचा अभ्यास करताना संघाची बलस्थाने लक्षात आली. राष्ट्रभक्तीचा
समान धागा मला संघाकडे आकर्षित करणारा ठरला.’
योगायोग पहा जोशींचे हे
परिवर्तन घडत असतानाच त्यांनी लिहून दिग्दर्शित केलेले ‘बोलविता धनी’ नावाचे नाटक
त्यांना लेखनाचा पुरस्कार मिळवून देते झालेय! कधी कधी कलाकृती न
बोलता बोलते ती अशी!
संजय
पवार



0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.