महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांची द्विशताब्दी ही केवळ एक ऐतिहासिक घटना नाही, तर भारतीय समाजमनाला जागृत करणारा आणि समतेच्या दिशेने वाटचाल करण्याचा पुनःशपथ घेण्याचा क्षण आहे. २०२७ मध्ये येणाऱ्या य द्विशताब्दी वर्षानिमित्त आपण त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि संघर्षाचा सखोल विचार करणे अत्यंत आवश्यक ठरते.


महात्मा फुले यांनी ज्या काळात कार्य केले, तो काळ जातीय विषमता, अज्ञान आणि अंधश्रद्धांनी ग्रासलेला होता. अशा परिस्थितीत त्यांनी समाजातील अन्यायाला थेट आव्हान दिले. त्यांनी ब्राह्मणवादी वर्चस्वाला विरोध करत बहुजन समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष उभारला. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता -शिक्षण, समता आणि बंधुता.

आजच्या काळातही महात्मा फुले यांचे विचार अत्यंत समकालीन आहेत. शिक्षणातील असमानता, जातीय भेदभाव, स्त्रीदमन – या सर्व प्रश्नांवर त्यांचे विचार आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांनी केवळ आपल्या काळातील अन्यायाला आव्हान दिले नाही, तर भारताच्या भविष्यासाठी एक नवा दिशादर्शक मार्गही दाखवला. म्हणूनच त्यांना ‘देशाचे दिशादर्शक’ असे संबोधणे अत्यंत योग्य ठरते.

फुले यांनी समतेची आणि विवेकाची मशाल पेटवली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, माणूस हा माणूस म्हणूनच समान आहे. त्यांच्या या विचारांनी भारतीय समाजाच्या मुळावरच प्रहार केला.  त्यांच्या विचारांचा प्रभाव पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान नेत्यांवरही पडला. सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांचा पाया त्यांनीच घातला.



थॉमस पेन या विचारवंताचा प्रभाव

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारविश्वावर पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा, विशेषतः थॉमस पेन या विचारवंताचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. थॉमस पेन हा १८व्या शतकातील प्रबोधनकालीन विचारवंत होता, ज्याने स्वातंत्र्य, समता आणि मानवी हक्क यांचा जोरदार पुरस्कार केला. त्याचे  Rights of Man आणि The Age of Reason हे ग्रंथ अत्यंत प्रभावी ठरले.

थॉमस पेनने समाजातील सर्व माणसे समान आहेत, असा विचार मांडला. हाच विचार महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारतीय समाजात लागू केला. फुले यांनी जातव्यवस्थेचा कठोर विरोध करून शूद्र-अतिशूद्र आणि स्त्रियांना समान हक्क मिळावेत यासाठी संघर्ष केला. ही समतेची संकल्पना पेनच्या विचारांशी जवळून संबंधित आहे.

The Age of Reason मध्ये पेनने अंधश्रद्धा, धर्मग्रंथांवरील आंधळा विश्वास यावर टीका केली. त्याचप्रमाणे फुले यांनीही ब्राह्मणवादी धर्मव्यवस्थेवर प्रखर टीका करत तर्क आणि विज्ञानावर आधारित विचार मांडले. त्यांनी धर्माचा वापर शोषणासाठी कसा केला जातो हे उघड केले शिक्षणाचा प्रसार आणि जागृती

थॉमस पेनच्या लेखनातून लोकजागृतीची प्रेरणा मिळते. फुले यांनीही शिक्षणाला मुक्तीचे साधन मानले आणि स्त्रिया व दलितांसाठी शाळा सुरू केल्या. समाजातील अन्याय दूर करण्यासाठी शिक्षण हा मुख्य मार्ग आहे, हा दृष्टिकोन दोघांमध्ये समान आहे.

पेनने राजसत्तेविरुद्ध आणि अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला. फुले यांनी भारतीय समाजातील जातीय शोषणाविरुद्ध लढा दिला. त्यांनी शेतकरी, स्त्रिया आणि कनिष्ठ जातींच्या हक्कांसाठी आवाज उठवला. थॉमस पेनच्या विचारांमध्ये व्यक्तिस्वातंत्र्याला फार महत्त्व आहे. फुले यांनीही स्वाभिमान आणि मानवी प्रतिष्ठा यांना केंद्रस्थानी ठेवून सामाजिक क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

थॉमस पेन आणि महात्मा फुले यांचे कार्य वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या समाजात झाले असले, तरी त्यांच्या विचारांचा गाभा एकच आहे - मानवमुक्ती, समता आणि विवेकवाद. पेनच्या प्रबोधनवादी विचारांनी फुले यांच्या सामाजिक क्रांतीला बौद्धिक दिशा दिली. त्यामुळे फुले यांचे कार्य केवळ स्थानिक न राहता जागतिक मानवतावादी परंपरेशी जोडले गेले.

आधुनिक विज्ञानाच्या आधारावर घडलेले प्रगत विचार आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांमध्ये आश्चर्यकारक सुसंगती दिसून येते. विज्ञानाने जसे जगाला अंधश्रद्धा, परंपरागत बंधने आणि अवैज्ञानिक समजुतींपासून मुक्त करण्याचा मार्ग दाखवला, तसेच फुले यांनी भारतीय समाजाला सामाजिक अन्याय, जातिभेद आणि धार्मिक दुराग्रहांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला.विज्ञानाचा आधार : तर्क, प्रयोग आणि सत्यशोधन

आधुनिक विज्ञान हे तर्क, अनुभव आणि प्रयोग यावर आधारित आहे. कोणतीही गोष्ट अंधपणे स्वीकारण्याऐवजी तिची पडताळणी करणे, हे विज्ञानाचे मूळ तत्व आहे. फुले यांच्या विचारातही हाच दृष्टिकोन दिसतो. त्यांनी समाजातील प्रस्थापित धार्मिक आणि सामाजिक संकल्पनांना प्रश्न विचारले. ‘सत्यशोधक’ हा शब्दच त्यांच्या विचारांची दिशा दर्शवतो-सत्याचा शोध घेणे. अंधश्रद्धेविरोध आणि विवेकवाद

विज्ञानाने अंधश्रद्धा आणि मिथकांचा भांडाफोड केला. फुले यांनीही धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अन्यायकारक प्रथा आणि अंधश्रद्धांचा कठोर विरोध केला. त्यांनी माणसाला विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची प्रेरणा दिली. हा विवेकवादी दृष्टिकोन आधुनिक विज्ञानाशी पूर्णपणे सुसंगत आहे.

आधुनिक विज्ञान माणसाला जाती, धर्म, वंश यांच्या पलीकडे एक समान जैविक अस्तित्व म्हणून पाहते. फुले यांनीही ‘माणूस हा माणूसच आहे, या तत्त्वावर समाजरचना मांडली. त्यांनी शूद्र-अतिशूद्र, स्त्रिया यांना समान हक्क मिळावेत यासाठी संघर्ष केला. विज्ञानाचा मानवकेंद्रित दृष्टिकोन आणि फुले यांचा समतेचा विचार एकाच दिशेने जातो. विज्ञानाने जसे भौतिक जगाचे अज्ञान दूर केले, तसेच फुले यांनी सामाजिक अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला.

आजच्या काळात, जेव्हा विज्ञान प्रचंड वेगाने पुढे जात आहे, तेव्हा फुले यांचा विचार अधिकच महत्त्वाचा ठरतो. कारण विज्ञान आपल्याला साधने देते, पण त्या साधनांचा योग्य वापर करण्यासाठी समता, नैतिकता आणि सामाजिक भान आवश्यक असते आणि तेच मूल्य फुले आपल्याला शिकवतात.

फुले आंबेडकर तिसऱ्या जगाचे दोन डोळे आहे. या जगाला त्यांच्या विचारा शिवाय दुसरा पर्याय नाही...

अरुण वाघ