मी निवडून आले तर मी खड्डे बुजवेन. शहरातल्या नदीत चुकूनही सांडपणी सोडले जाणार नाही याची काळजी मी घेईन आणि शहराची पाणीपुरवठा आणि मलनि:सारण व्यवस्था सुधारेन.’

हे आश्वासन आहे महापौरपदासाठी निवडणूक लढवत असलेल्या एका उमेदवाराचे. आश्वासनातील प्रश्न व त्यांच्या सोडवणुकीचे आश्वासन पाहता ही निवडणूक व उमेदवार महाराष्ट्र किंवा भारतातल्या एखाद्या राज्यातील एखाद्या प्रमुख शहरातील असावा असेच वाटेल.



पण नाही.
हे आश्वासन दिले आहे अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डी.सी. येथील महापौरपदाच्या एक इच्छुक उमेदवार रिनी संपत यांनी!

यातली पुढची माहितीही अशीच माहितीपूर्ण, रंजक. या रिनी संपत या मूळ भारतीय असलेल्या दक्षिण आशियाई नागरिक आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितली असून पक्षांने उमेदवारी दिली व दोन टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या तर त्या वॉशिंग्टन डी.सी.च्या पहिल्या दक्षिण आशियाई महापौर तर होतीलच पण न्यूयॉर्कचे ३४ वर्षीय तरूण महापौर झोहरान ममदानी यांचा विक्रम मोडून त्या ३१ वय असलेल्या तरूण महापौर बनतील.

या अशा बातम्या वर्तमानपत्राच्या छोट्या मोठ्या स्तंभात / एखाद्या समाज माध्यमात / वा यू ट्यूबवरील स्वतंत्र चॅनेल वरून आपल्या नजरेसमोर येतात, नजरेखालून जातात. पण रिल्सच्या जमान्यात आता ब्रेकिंग न्यूज वा वर्तमानपत्रातील हेडलाईन्स पुरतेच ‘वाचन’ राहिलेल्या आपल्याकडून सहज दुर्लक्षित राहतात. ही बातमीही एका वर्तमानपत्राच्या पानात सापडली.

या बातमीवर लिहिण्याचे कारण वॉशिंग्टन डी.सी.अमेरिकेची राजधानी. प्रसिध्द व्हाईट हाऊसही इथेच, म्हणजे जगाच्या महाशक्तीच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय / निवासस्थान असलेले हे एक शहर नसून स्वतंत्र जिल्हा आहे. आता जिल्ह्याला महापौर कसा वगैरे तपशिलात ज्यांना रस असेल त्यांनी स्वतंत्रपणे माहितीच्या महाजालात जाऊन माहिती घ्यावी.

इथे नोंद घेण्याचे कारण साधारण ६० च्या दशकापासून भारतातून जो ब्रेन डेन सुरू झाला अमेरिकेत तो ९२ च्या उदारीकरणानंतर वेगाने होऊ लागला व २१ व्या शतकात तर अमेरिकेसह युरोप, ॲास्ट्रेलिया, न्युझीलंड इत्यादी देशातही त्याचा वेग वाढला.

मात्र ७० च्या दशकात आखाती देशात पेट्रो डॉलर कमाविण्यासाठी भारतातून जे असंख्य लोक गेले त्यांना ब्रेन ड्रेन न मानता ‘मजूर’ म्हणून संबोधले गेले (जसे स्वातंत्र्यपूर्व काळात आफ्रिका, मलेशिया इत्यादी देशात गेलेले स्थलांतरीत मजूर म्हणून गणले जातात.) त्यामुळे अमेरिका, युरोप इथे भारतातून स्थलांतरित व आखाती देशातील स्थलांतरीत यात फरक केला जातो. डॉलरला ख्रिश्चॅनिटीचा वास येत नाही पण पेट्रो डॉलरला इस्लामिक धर्मगंध तीव्रपणे येतो. तो कुणाला येत नाही वा येतो? तर भारतातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय यांना. विशेषत: महाराष्ट्रातील अशा वर्गाला सोयिस्कर गंध येतात वा येत नाहीत. तसेच मुलीच्या वा सुनेच्या बाळंतपणानिमित्त परदेशवारी लाभार्थी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तर पदोपदी तिथे आणि इथे अशी तुलना करण्याचा छंदच लागतो!

त्यातून मग स्वच्छता, वक्तशीरपणा, सिव्हिक सेन्स वगैरेवर त्यांची रसवंती डायनिंग टेबल वरून स्थानिक नगरसेवकांने बांधलेल्या जॉगिंग ट्रॅकवर तिकडून आणलेल्या टीशर्ट, ट्रॅक पॅन्ट व शूज घालून मॉर्निंग वॉक समयी तिकडची वाहवा व इकडची तुच्छता करताना थकत नाही.

पूर्वी जमले तर सूर्यनमस्कार व रात्री घरातल्या घरात शतपावली करणारा वर्ग आपल्या पाल्यांमुळं परदेश पर्यटन लाभार्थी झाला आणि त्याला देश भिकार वाटू लागला. आणि ज्या ७५ वर्षातल्या  स्वतंत्र भारताच्या शासकांनी जी काही धोऱणे आखली, प्रगती केली ती दुर्लक्षून (पण त्याचे सर्व लाभ घेतले, ओरबाडले) थेट २०१४ नंतरच त्यांना देशाभिमान वाटू लागला! हा देशाभिमान ज्वर धार्मिक व पर्यायाने जातीय उन्मादात बदलत गेलाय गेल्या ११/१२ वर्षात.

तर अशा तिकडचे गोडवे गाणाऱ्यांना ही बातमी म्हणजे एक सणसणीत थप्पड आहे. घरोघरी मातीच्या चुली, तशा देशोदेशी, नगरोनगरी समस्या या आज २१ व्या शतकातही सारख्याच आहेत हे या निमित्ताने नवश्रीमंत, नवहिंदू व नवदेशभक्तांना कळले तर बरेच आहे. या निमित्ताने तरी त्यांना पाडगावकरांच्या ओळी वॉशिंग्टन डीसीत उच्चरवात म्हणता येतील की तुमचे नी आमचे सेम असते!

तसेही तिकडून डॉलर हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी जमविणारे / घेणारे तिथे गेल्यावर वा तिथे असताना कधी ही स्थिती लक्षात घेऊन भारत ७५ वर्षात किती व कसा पुढे गेला हे सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून जर बघायला लागले तरी पुष्कळ झाले.

आज देशातला सर्व प्रकारचा कट्टरतावाद पहाता, सर्व यंत्रणांचे सरकार पुढचे साष्टांग दंडवत पाहाण्याच्या काळात अमेरिकेत एक दक्षिण आशियाई बाई जी मूळ भारतीय आहे ती तिथे महापौर होऊ शकते व आपल्या देशात इथलेच नागरिक मतदानाच्या हक्कांपासून वंचित ठरतात. नवभारताच्या दंडकाप्रमाणे संपत बाई घुसपैठिया ठरवली गेली असती!

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेला आपला देश. देशात रोज लोकशाहीचे  धिंडवडे निघत असताना अमेरिकेकडे तोंड करून बसलेल्यांना थोडी जनाची नाही पण मनाची तरी लाज वाटेल का?

 

ताजा कलम:

बारामती हा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदू झाल्याला पन्नासहून अधिक वर्ष झाली. प्रथम शरद पवार, नंतर पवार कुटुंबिय हे एक पोलिटिकल पॉवर सेंटर झाले. शरद पवारांचे घर गोविंद बाग हे राजकीय व कौटुंबिक घडामोडीचे केंद्र झाले. पण अजितदादा काकांना सोडून गेल्यापासून गोविंद बागेतील राजकीय आखाडा ओसाड व कौटुंबिक जिव्हाळा आटत गेला व अजितदादांच्या निधनानंतर तर गोविंद बागेचे सुकलेपण साक्षात थोरल्या पवारांच्या सध्याच्या देहबोलीतून दिसते तेव्हा कट्टर विरोधकही मनातून चरकत असेल. अनपेक्षित हा शब्द गोविंद बाग शब्दश: जगतेय.

 

संजय

पवार