सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी जनहित याचिका किंवा विविध माध्यमातून सरकार व इतर व्यवस्थांवर कठोर आरोप, टिका, विश्लेषण करणारांना झुरळाची उपमा दिली. 


ती देताना त्यांनी युवकांनाही त्यात ओढले. आणि समाजमाध्यम जगात एक वादळ घोंगावले व रात्रीत कॉक्रोच जनता पार्टी स्थापन झाली. अर्थातच समाजमाध्यमावरच! रात्रंदिन समाजमाध्यमावरच कार्यरत समूहात या पार्टीचा बझ तयार झाला व या माध्यमाच्या भाषेत तीन तासातीन लाखावर फॉलोअर्स झाले. त्यांनी एक पाच - सात कलमी अजेंडाही जाहिर केला व एक ॲन्थमही तयार केलं

बोधचिन्ह वगैरे तर लगेचच झालं होतं.



सर्वसाधारणपणे समाजमाध्यमात व्यवस्थेविरोधात धुमाकूळ घालताना अनेकदा ती तात्कालिक व उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. स्टॅन्डअप कॉमेडिअन किंवा युट्यूबर वेळोवेळी आपले आविष्कार प्रसृत करत असतात. देशातील वाढत्या असहिष्णू पर्यायाने निर्बुद्ध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वातावरणामुळे बरेचदा या कलाविष्कारांकडे कलात्मक विरोध म्हणून न बघता सरळ देशद्रोही वगैरे ठरवून पोलीस तक्रार, खटले ते तुरूंगवास घडवला जातो. हे नवे पर्यावरण २०१४ नंतर अधिक जोमाने कार्यरत झालेय.

महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर अशी असहिष्णुता शिवसेना स्थापनेनंतर (१९६६) पुढील तीन चार दशके जोरात होती. शिवसेना किंवा वा विशेषत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधातील टिकेला दहशतीनेच उत्तर दिले जात असे. यात शिवीगाळ जाळपोळ, मारहाण, मालमत्तेचं नुकसान असे सर्व प्रकार असत. आचार्य अत्रेंना तर सेनाप्रमुख वरळीचा डुक्कर म्हणूनच हिणवत. पुढे ग. वा. बेहरे ते निखिल वागळे असे अनेक पत्रकारांना प्रसाद देण्यात आला. हा प्रकार शिवसेना स्टाईल म्हणून आजही ओळखला जातो.

स्वातंत्र्यानंतर ८०च्या दशकापर्यंत केंद्रात व बहुसंख्य राज्यात कॉंग्रेस सत्तेत होती. पण आजच्या सारखी सर्वप्रकारची असहिष्णुता तेव्हा नव्हती. आणीबाणी लावणे ही मोठीच चूक होती. पण त्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधानांची निवडणूक रद्द ठरवली होती! म्हणजे न्यायव्यवस्था स्वतंत्र होती. शेषन काळात निवडणूक यंत्रणा स्वायत्त होती. आज हायकोर्ट काय सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच आपली स्वायत्तता सत्तेपुढे लवचिक करताना दिसतात. झुरळं हे संबोधन त्याच प्रवृत्तीचे एक ताजे उदाहरण.

सध्या मुख्य माध्यमेही सत्ताशरण व दबावात असल्याने समाजमाध्यम हे एक नवेच प्रसार माध्यम झटपट व मोफत प्रचार प्रसारासाठी उपलब्ध असल्याने रात्रीत कॉक्रोच जनता पार्टी उभी राहिली.

आपल्याकडे सध्याच्या वातावरणात कोणी मोठा ब्र काढला की सत्ता विरोधक, सत्ता विचार विरोधक यांना एकदम हुरूप चढतो. लगोलग त्याच्या मुलाखती, दौरे, भाषणे, सध्याचे प्रचलित पॉकास्ट सर्वत्र हा नवा अवतार दिसू लागतो. वारेमाप प्रसिद्धी देत मूळच्या वारेमाप प्रसिद्धीत भर घालतात. त्यात एक अंतस्थ फायदा हा असतो. या निमित्ताने यांचेही व्ह्यूज वाढतात. व्हिडियो वाढतो. सबस्क्रायबर्स वाढतात पर्यायाने मोनोटायझेशन!

त्यामुळे गोदी मीडियाच्या मोनोटोनीसारखाच हा अल्टरनेट मीडियाही मोनोटोनस होत चाललाय. यांनाही भडक वा चटपटीत मथळ्यांची गरज भासू लागलीय. त्याहून वाईट म्हणजे थेट निष्कर्षालाच पोहचण्याची घाई यांनाही झालीय.

या नव्या कॉक्रोच पार्टीला थेट अण्णा आंदोलन, जगभरातील जेन-झी आंदोलने व नंतरच्या सत्ता परिवर्तनापर्यंत यातले काही ससे जोरात पळू लागलेत. गंमत म्हणजे राष्ट्रीय पक्षांचे ज्येष्ठ अभ्यासू खासदारही या वासरात शिंगे मोडून सामील होताना दिसताहेत.

आकार, उकार नसलेल्या व समाजमाध्यमावरच जन्मलेल्या एका प्रतिक्रियेला थेट जनआंदोलन म्हणण्याची घाई कशाला?

याआधी अण्णा आंदोलन, आम आदमी पार्टी, हार्दिक पटेल, कन्हैय्या कुमार इत्यादींच्या पालख्या आपण अशाच जोरात वाहिल्या. आज कॉंग्रेस नामशेष झाली पण भाजप अधिक शक्तिशाली व दमनकारी. भाजपकडे (आणि संघ) आज सत्ता, साधन, संपत्ती इतकी आहेत की ते आता अमेरिकन न्यायालयांवर प्रभाव पाडू लागलेत. भारतातून परदेशी गुंतवणूकदार पाय काढत असताना भारतीय उद्योगपती अमेरिकेत गुंतवणूक करत रोजगारनिर्मितीचा करार करतो व चालू खटल्यातून दोषमुक्त होतो!

झुरळाची उत्पत्ती सरन्यायाधीशांनी केलीय. त्याविरोधातल्या आंदोलनात भाजप संघ अदृश्य शक्तीने प्रवेश करून ते झुरळांची फुलपाखरे, भुंगे करून त्यांना कमळा भोवतीच गुंजन करायला लावतील. हे आपणास कळेल तेव्हा फार उशीर झाला असेल.

त्यामुळे झुरळाच्या जोशात आपला होश उडत नाही ना यावर लक्ष ठेवा. सत्ताविरोधी लढाई, तीही संघ भाजपाविरोधातील म्हणजे रील, व्हिडियो बनवण्याइतकी सोपी नाही. ती जमिनीवरूनच द्यावी लागेल. आभासी माध्यमे त्यातला एक जरिया असू शकतो एवढेच!

 

ताजा कलम :

कायम आपदा मे अवसर शोधणारे पंतप्रधान त्यांचा राजकीय पक्ष व मातृसंघटना प्रथमच आपदाला आपत्ती म्हणायला लागलेत. हॅंगओव्हर उतरला की डोके ठणकू लागते, हा अट्टल नशेबाजांचा अनुभव दहा बारा वर्षे सत्तानशेत चूर असलेल्यांना येऊ लागलाय हे ही नसे थोडके.पण त्यांचे अंधभक्त अजूनही संमोहनात आहेत. बलात्कार थोपवता येत नसेल तर सहयोग करून आनंद घ्या, अशा एका निलाजऱ्या सल्ल्याला लाजवेल असे या आपत्तीकाळात अंधभक्तांचे वागणे आहे.

 

संजय

पवार