हायवेचा रनवे करा, असं लिगिण्यास कारण की, नुकतीच प्रसिद्ध झालेली बातमी. काय होतं बातमीत

तर मुंबई - पुणे दरम्यान नवा एक्सप्रेस वे तयार केला जाणार आहे, ज्यामुळे मुंबई - पुणे हे अंतर फक्त ९० मिनिटांत पार करता येईल!



भाजपप्रणित सरकार केंद्रात व राज्यात सत्तेत आल्यापासून या सरकारचा एक कलमी कार्यक्रम आहे तो म्हणजे दिसेल तिथे सिमेंट ओतत जा. झाडं कापा आणि गरज असो वा नसो रस्ते, पूल, मेट्रो, भुयारी मार्ग, बोगदे बांधत सुटा. या सरकारांच्या धोरणात पायाभूत सुविधा याला व एकमेव या क्षेत्रालाच इतकं प्राधान्य आहे की, ही सरकारं पायाभूत सुविधा म्हणून जवळपास रोज एक योजना बनवतात. मग निविदा मागवतात, त्या मंजूर करतात, नंतर भूमिपूजन नी मग लोकार्पण! गेल्या बारा वर्षातली वर्तमानपत्रं काढा. त्यातल्या जाहिराती बघा. त्या सर्व याच कामांच्या. हिमाच्छादित प्रदेशही कॉंक्रीट ओतून असा केला की, तिथे भूस्स्खलन होऊन पूरही आले. तरी प्रकल्प रेटतातच आहेत. आता यातल्या काही सुविधा गरजेच्या होत्या. त्या झाल्या चांगलेच झाले. पण लादलेल्या योजनांचे काय? युपीत अयोध्या आणि वाराणसीत जे चाललंय त्याने या शहरांची वैशिष्ट्येच समूळ उच्चाटून टाकली जाताहेत. पण विकासाचा भस्म्यारोग झालेली सरकारं थांबायला तयार नाहीत.

आता हा जो नवा हायवे तयार केला जातोय त्याची मागणी कोणी व केव्हा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे का केली?



मुंबई पुणे ही शहरं रस्ता, रेल्वे, हवाई मार्गाने जोडूनही आता जवळपास शंभर वर्ष होत येतील. महाराष्ट्रात मुंबई - पुणे दरम्यान सर्वात वेगवान डेक्कन क्वीन रेल्वे गाडी पहिली सुरू झाली. मुंबई पुणे रस्ते मार्ग, रेल मार्ग ब्रिटिश काळापासून आहे. या मार्गावरच ब्रिटिशांनीच लोणावळा खंडाळा ही उत्तम हिल स्टेशन्स बांधली. पुण्याला रेसकोर्सवर रेससाठी रेल्वे खास गाड्या सोडत असे. मुंबई पुणे विमान सेवाही आत्ता आत्तापर्यंत होती. मुंबई पुणे घाटाघाटांच्या रस्त्याने कवी, गीतकार संगीतकारांना प्रेरणा दिली. एक्सप्रेस वे तयार झाला तरी आती का खंडाला सारखं गाणं हिट झालं. मुंबई पुणे मार्गे एसटीची लाल परी अव्याहत सुरू होती एशियाड बससेवा येईपर्यंत. आता शिवशाहीपासून साध्या बसचा पर्याय आहेच. जागतिकीकरणानंतर आलेल्या समृद्धीने एक्सप्रेस हायवे झाला तसंच पुणे आयटी हब झालं; नी जुनी मुंबई - पुणे टॅक्सी सेवा बाजूला पडून टुरिस्ट कार आणि खागी गाड्यांची रेलचेल वाढली. आयटी बूमने पिकअप ड्रॉपवाले नवेच कल्चर आले. जे आता ओला, उबेर, रॅपिडोत बदलले. सांगण्याचा मुद्दा असा की, जिथे आता चॉपरही उडतात त्या दोन शहरांसाठी रस्ते बांधणार तरी किती?

आत्ता आहे तोच एक्सप्रेस वे चार चा सहा व आठ पदरी करतातच आहेत. अटल सेतू बांधून झाला. आता मिसिंग म्हणजेच कनेक्टिंग लिंकही सुरू झालीय. कधी काळी कमीत कमी चार व जास्तीत जास्त आठहून कितीही तास लागणारा जुना हायवे इतिहासजमा झालाय. अंतर अडिच तीन तासावर आलंय. बरं वाहतुकीचे इतर विविध व सक्षम पर्याय असताना वेगाचे हे गणित नेमके कुणासाठीआहे. त्याच एक्सप्रेस वे वरून वीकएंडला वेळेत पोहचताना मारामार. मुंबई व पुणे जिथे एक्सप्रेस वे सुरू होतो वा संपतो तिथले बॉटल नेक जीवघेणे व कंटाळवाणे आणि इंधन, वेळ व पैशाचा धूर करणारे झालेत. त्यावर उपाय न शोधता तिसराच मार्ग! बारा कोटीच्या महाराष्ट्रात या दोन शहर जोडणीवरच भर का? एवढे प्रेम का? का या दोन शहरातून न संपणाऱ्या पैशांच्या खाणींचा शोध लागलाय या विकास कामातून?

मुंबई गोवा मार्ग एक तप झाले तरी तयार नाही. ठाण्याच्या  वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालाय. नाशिक - पुणे रस्ता अजून धड नाही. नाशिक - पुणे रेल्वे तर अजून कागदावरच. ठाणे पालघर जिल्ह्यासह नाशिक, धुळे, नंदूरबार येथील आदिवासी पाडे गावे बिन रस्त्याची, शाळा, दवाखान्यांची. ते वगळून थेट वाढवण बंदर आणि बुलेट ट्रेनवर अब्जावधीची उधळण!

या सरकारांना विकास करताना समतोल न साधताना बेताल, बेफाम, बेपर्वा विनाशकारी विकासाचीच भूक लागलीय. ती सामाजिक तसेच आर्थिक आरोग्य बिघडवणारी आहे.

सरकारला मुंबई - पुणे ९० मिनिटांपेक्षा कमी वेळात गाठण्याची सोय करता येईल. हायवेचे रनवेत रूपांतर करा व चॉपर सेवा सुरू करा. वीस मिनिटात मुंबई - पुणे पार!

 



ताजा कलम :

शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे नाव बदला म्हणणारे आमदार संजय गायकवाड यांनी आता आपला मोर्चा प्रबोधनकार ठाकरे लिखित दगलबाज शिवाजीकडे वळवलाय. त्यांनी त्याचेही नामांतर करण्याची मागणी केलीय!

८०/९०च्या दशकातील मातोश्री व शिवसेना आज असती तर आमदार महोदयांच्या अंगावर वस्त्र उरले नसते! आज मातोश्री शांत आहे. आणि आमदार बाळासाहेबांचे फोटो, पक्ष नाव व चिन्ह वापरणाऱ्या शिवसेनेत आहेत. जे शिवसेना नाव प्रबोधनकारांनीच दिलेय!