“समाजासाठी आपण जे काम करतो ते नेहमी सुरळीतपणे होईलच असे नाही. त्यात कधी कधी धोकाही असतो. पण माझा असाही विश्वास आहे की, जेव्हा लोकांना आवाज उठवण्यापासून रोखले जाते किंवा परावृत्त केले जाते, तेव्हा असा आवाज उठवणे अधिक महत्त्वाचे ठरते. सत्तेला जाब विचारणाऱ्या नागरिकांवरच लोकशाही अवलंबून असते. मी ज्यांना कधीही भेटलो नाही अशा लोकांनी मला पाठिंबा दिला, बळ दिले. जेव्हा मी या गोष्टींचा विचार करतो, तेव्हा मला जाणवतं की, जगात द्वेषापेक्षा माणुसकी आणि प्रेमच अधिक आहे. भीती ही प्रभावी असू शकते, पण त्याहीपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकते ती म्हणजे 'एकजूट'. आणि माझ्या अनुभवानुसार, धमकावण्याच्या किंवा दडपशाहीच्या प्रयत्नांपेक्षा माणुसकी आणि आशा नेहमीच अधिक बलवान ठरल्या आहेत,” असे उद्गार अभिजित दीपके यांच्या बोस्टन विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या मुलाखतीत काढले आहेत. 

ही मुलाखत ८ जून २०२६ रोजी प्रकाशित करण्यात आली होती. म्हणजे तेव्हा जेव्हा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतर वर आंदोलन सुरू होतं. त्यांच्या राजीनाम्यानानातर ‘कॉकरोच जनता पार्टी’ला मिळालेलं वलय तेव्हा नव्हतं. पण तेव्हा ही मुलाखत येऊन सुद्धा अभिजित दीपके यांच्यावर अनेक आरोप केले गेले. त्यांची समर्पक उत्तर त्यांनी या आरोपांच्या आधीच देऊन ठेवली होती. विरोधकांनी किमान हा लेख वाचला असता तर त्यांच्या शिक्षणावर आणि शिक्षणाच्या खर्चावर चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या ट्रोलधाडीला फार कष्ट पडले नसते. पण फक्त हवेत आरोप करणाऱ्यांना याची गरज भासली नाही. पण या आरोपवीरांच्या प्रश्नाचं उत्तर खुद्द बोस्टन विद्यापीठाने ही मुलाखत प्रकाशित करून दिलं आहे.

कोणत्याही शिक्षणिक संस्थेसाठी त्यांच्या संस्थेत शिकलेल्या विद्यार्थ्याने मिळवलेलं भरीव यश फार महत्त्वाचं असतं. कोणतीही संस्था आपल्या अशा विद्यार्थ्यांचा सन्मान करते. बोस्टन विद्यापीठानेही ते केलं आणि त्यांच्या वेबसाईट वर अभिजित दीपके यांची मुलाखत छापली. या मुलाखतीत राजकीय किंवा ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या एकंदरीत कामाविषयी नाही तर बोस्टन विद्यापीठात शिकलेल्या पब्लिक रिलेशन्स अर्थात जनसंपर्क या विषयाची त्यांना हे आंदोलन उभं करण्यात आणि ते यशस्वी करण्यात काय मदत झाली याविषयीचे प्रश्न विचारले गेले आणि अभिजितने त्यांना अगदी प्रामाणिकपणे समर्पक उत्तरे दिली आहेत. या मुलाखतीत मांडलेले काही मुद्दे देत आहे.

“तुमच्या बोस्टन विद्यापीठातील अभ्यासाचा तुम्हाला किती फायदा झाला?” या पहिल्याच प्रश्नावर अभिजित दीपके यांनी आपल्या प्राध्यापकांच्या शिस्तपूर्ण शिक्षणामुळे आपण ही मोहीम कशी उभी करू शकलो याचं विवेचन केलं आहे. अभिजित दीपके म्हणाले आहेत की, “प्रा. एमी शॅनलर यांच्या ‘स्ट्रॅटेजिक मीडिया रिलेशन्स’चे वर्ग आणि प्रा. एमी शॅनलर यांच्या ‘क्रायसिस सिम्युलेशन’च्या असाइनमेंटमुळे मला माझ्या संकोचातून बाहेर पडता आलं आणि पत्रकार व कॅमेऱ्यांसमोर आत्मविश्वासाने बोलण्याची सवय लागली. प्रा. मायकेल डॉवलिंग यांच्या वर्गांमुळे माझे विचार स्पष्ट आणि प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य विकसित झाले. प्रा. कार्ला कॅथ यांच्या वर्गातून मला हे शिकायला मिळाले की, कोणतीही प्रचारमोहीम यशस्वी होण्यासाठी ती स्थानिक संस्कृतीशी जोडलेली असणे आवश्यक आहे. त्या प्रदेशातील लोकांची संस्कृती, भाषा आणि विचार समजून घेतल्यानंतरच योग्य पद्धतीने मोहीम आखता येते. त्यामुळे कोणतीही मोहीम सुरू करण्यापूर्वी आपण ज्या लोकांपर्यंत पोहोचू इच्छितो, त्यांना सांस्कृतिक आणि भाषिकदृष्ट्या समजून घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या वर्गांनी मला शिकवले.”

“संवादाचे प्रशिक्षण घेतलेली व्यक्ती म्हणून, उपरोध हे माध्यम निवडण्याबाबत तुम्ही कसा विचार केला? भारतातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत हे माध्यम इतके प्रभावी का ठरते?” या प्रश्नावर अभिजित म्हणतात, “सध्याच्या राजकीय व्यवस्थेत तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. बेरोजगारी, संधींसाठी वाढती स्पर्धा, परीक्षांमधील गैरव्यवस्था, वाढता खर्च आणि आपला आवाज ऐकला जात नाही, अशी भावना तरुणांमध्ये आहे. त्यामुळे ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही तरुणांसाठी केवळ एक ‘मीम’ नव्हती; ती आधीपासून अस्तित्वात असलेल्या असंतोषाचे प्रतिबिंब होती. केवळ विनोद किंवा उपरोधावर आधारित आंदोलन काही दिवसांत संपून जाते. जर ‘कॉकरोच जनता पार्टी’ फक्त एक विनोद राहिली असती, तर तिचा प्रभाव काही दिवसांपलीकडे गेला नसता. म्हणूनच विनोदाने लोकांचे लक्ष वेधावे; पण त्या विनोदाने ज्या वास्तविक प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे, ते प्रश्न झाकोळले जाऊ नयेत, ही संवाद साधणाऱ्यांची जबाबदारी आहे.”



“वेबसाईट तयार करणे आणि एकूणच मोहीम उभी करणे यात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयची मदत किती झाली?” या प्रश्नावर अभिजित म्हणतात, “जेव्हा ही कल्पना आम्हाला सुचली तेव्हा आमच्याकडे मोठी व्यावसायिक टीम किंवा पुरेशी आर्थिक साधने नव्हती. मोठ्या राजकीय पक्षांकडे किंवा कंपन्यांकडे ज्या प्रमाणात साधने असतात, ती सामाजिक कार्यकर्त्यांकडे नसतात. त्यामुळे योग्य हेतू आणि योग्य कारणासाठी वापरल्यास एआय हे संसाधनविहीन चळवळीचे महत्त्वाचे साधन बनू शकते. त्यामुळे जे काम करण्यासाठी अनेक लोकांची टीम लागली असती, ते काम एआयच्या मदतीने कमी वेळात करता आले.” हे उत्तर देताना अभिजितने अत्यंत जबाबदारीने म्हटलं की, “एआयने माणसांची जागा केवळ खर्च कमी करण्यासाठी घेणे, याचं समर्थन मी करत नाही. विशेषतः राजकीय संदेशाच्या बाबतीत मानवी विवेक अत्यावश्यक असतो. राजकीयदृष्ट्या योग्य संदेश कोणता, त्याची वेळ कोणती आणि त्याचा समाजावर काय परिणाम होईल, हे समजण्यासाठी मानवी बुद्धी आणि अनुभव आवश्यक आहेत. विशेषतः अभिव्यक्तिस्वातंत्र्य, पारदर्शकता आणि सत्तेच्या उत्तरदायित्वासारख्या संवेदनशील विषयांमध्ये केवळ एआयवर अवलंबून राहता येत नाही. त्यासाठी समाजाचा प्रत्यक्ष अनुभव आणि ज्या सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारले जात आहेत, त्यांची कार्यपद्धती समजणे आवश्यक आहे.

संवादकासाठी केवळ तांत्रिक कौशल्यासह समाज समजून घेणे आवश्यक का आहे? बोस्टन विद्यापीठातील अभ्यासक्रमाचा त्यांना कसा फायदा झाला?” या प्रश्नावर अभिजित म्हणतात, “प्रभावी संवादासाठी प्रेक्षकांची सांस्कृतिक आणि भाषिक पार्श्वभूमी समजून घेणे महत्त्वाचे आहे. एखादी मोहीम कितीही चांगली असली, तरी ती ज्या समाजासाठी आहे त्याच्या मानसिकतेशी आणि स्थानिक वास्तवाशी जोडली गेली नाही, तर तिचा परिणाम मर्यादित राहतो. बोस्टन विद्यापीठात मला रणनीती, माध्यमांशी संबंध, संकटव्यवस्थापन आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची शिस्त दिली; पण मला आधीच्या प्रत्यक्ष राजकीय आणि सामाजिक अनुभवाने लोकांचे प्रश्न कसे समजून घ्यायचे हे शिकवले होते.”

सत्तेला प्रश्न विचारताना दबाव आणि धमक्यांचा सामना करावा लागू शकतो, यावर तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल?” या प्रश्नावर त्यांनी अगदी मार्मिक उत्तर दिले. ते म्हणाले, “अमेरिकेत असतानाच मला अनोळखी क्रमांकांवरून मृत्यूच्या धमक्या मिळाल्या. भारतात असणाऱ्या कुटुंबीयांनाही धमकावण्यात आले आणि काहींनी हे काम थांबवण्यासाठी मला वेगवेगळी प्रलोभने सुद्धा दिली जी मी नाकारली. या अनुभवाने एक गोष्ट अधिक ठामपणे जाणवली की, जेव्हा एखादी व्यक्ती प्रभावशाली हितसंबंधांना आव्हान देते किंवा सत्तेला प्रश्न विचारते, तेव्हा तिला गप्प करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

बोस्टनमध्ये राहून आणि तिथल्या अभ्यासातून राजकीय संवाद आणि नागरिक सहभागाबाबतची तुमची समज कशी घडली? भारतापासून दूर राहिल्याने काय फरक पडला?” या प्रश्नावर अभिजित म्हणाले, “बोस्टन विद्यापीठातील माझ्या अभ्यासाचा माझ्या विचारांवर – विशेषतः संवाद, सार्वजनिक चर्चा आणि नागरिक सहभाग यांबाबत – खोलवर परिणाम झाला. बोस्टन विद्यापीठाने मला एक भक्कम शैक्षणिक पाया मिळवून दिला. यामुळे विविध 'नॅरेटिव्ह्ज' कसे घडवले जातात, जनमत कसे तयार होते आणि एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी लोकांना एकत्र आणण्यासाठी संवादाचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे मला अधिक चांगल्या प्रकारे समजले. या शिक्षणाने मला चिकित्सकपणे विचार करण्यास, गृहीतकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास आणि केवळ पक्षपाती दृष्टिकोनातून न पाहता विविध दृष्टिकोनांतून समस्यांकडे पाहण्यास शिकवले. विविध देश, पार्श्वभूमी आणि राजकीय विचारसरणी असलेल्या लोकांच्या सहवासामुळे मला ऐकून घेण्याची वृत्ती, संवाद आणि विचारांची देवाणघेवाण यांचे महत्त्व पटले – अगदी मतभेद असतानाही.

त्याच वेळी, घरापासून दूर असण्याचे काही फायदे आणि तोटेही असू शकतात. भारतापासून दूर राहिल्यामुळे मला गोष्टींकडे पाहण्याचा एक वेगळा स्पष्ट दृष्टिकोन मिळाला. दैनंदिन राजकीय कोलाहलापासून दूर राहून मला तटस्थपणे सगळ्याचे निरीक्षण करता आलं. कधीकधी एखाद्या समस्येच्या आपण खूप जवळ असतो, तेव्हा त्या समस्येचं व्यापक स्वरूप समजून घेणं कठीण जातं. दुरून ते अधिक स्पष्ट दिसतं.”

अभिजित दीपके यांची ही मुलाखत केवळ त्यांच्या विरोधकांनीच नाही तर त्यांच्या समर्थकांनीही वाचावी अशी आहे.

मूळ मुलाखतीसाठी इथे क्लिक करा