प्रशांत महासागरात सध्या विकसित होत असलेला एल निनो आगामी काळात जगाच्या हवामानावर मोठा परिणाम घडवून आणण्याची शक्यता आहे. 



कार्बन ब्रीफ या नियतकालिकाच्या विश्लेषणानुसार, जून २०२६मध्ये सुरू झालेला हा एल निनो २०२७पर्यंत टिकू शकतो आणि आधुनिक हवामान नोंदीतील सर्वात शक्तिशाली एल निनो ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला अनेक माध्यमे आणि हवामानतज्ज्ञांकडून ‘सुपर एल निनो’ म्हटले जात आहे. 

एल निनो हा एल निनो-दक्षिण दोलन (हेलकावे) El Niño-Southern Oscillation (ENSO) या नैसर्गिक हवामानचक्राचा उष्ण टप्पा आहे. ENSO चक्रात 'ला निना' (La Niña) म्हणून ओळखला जाणारा थंड टप्पा आणि 'तटस्थ' (neutral) टप्पा यांचाही समावेश असतो. 'एल निनो' (El Niño) आणि 'ला निना' या घटना साधारणपणे नऊ ते १२ महिने टिकतात, परंतु त्याहून अधिक काळही चालू राहू शकतात.

सामान्य परिस्थितीत उष्णकटिबंधीय पट्ट्यात व्यापारी वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. त्यामुळे उबदार पाणी आशियाच्या दिशेने सरकते आणि दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याजवळ खोल समुद्रातील थंड, पोषकद्रव्यांनी समृद्ध पाणी वर येते. या प्रक्रियेला 'अपवेलिंग' (upwelling) असे म्हणतात. एल निनोच्या काळात हे वारे कमकुवत होतात किंवा काही भागांत उलट दिशेने वाहतात. परिणामी उबदार पाणी पूर्वेकडे सरकते, थंड पाण्याचा वर येण्याचा प्रवाह कमी होतो आणि महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढते.

पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या या पाण्यामुळे हा प्रदेश जगातील सर्वाधिक मत्स्योत्पादन होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक बनला आहे. उदाहरणार्थ, पेरूचा 'अँकोव्ही' (anchovy) माशांचा व्यवसाय हा उत्पादनाच्या परिमाणाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा व्यवसाय आहे.

या बदलाचा परिणाम केवळ प्रशांत महासागरापुरता मर्यादित राहत नाही. वातावरणातील वाऱ्यांचे प्रवाह, पर्जन्यमान आणि तापमान यांच्यात बदल होऊन जगातील अनेक प्रदेशांमध्ये दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, उष्णतेच्या लाटा आणि वणव्यांचा धोका वाढतो.

भारतासाठी एल निनो विशेष महत्त्वाचा आहे. एल निनोमुळे वर्षाच्या सुरुवातीला भारतात तीव्र उष्णता वाढू शकते आणि नंतर नैऋत्य मोसमी पावसावर परिणाम होऊन दुष्काळाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शेती, पाणीपुरवठा आणि अन्नधान्य उत्पादनावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. आग्नेय आशिया आणि ऑस्ट्रेलियातही कोरडे हवामान आणि वणव्यांचा धोका वाढतो. त्याउलट दक्षिण अमेरिकेतील काही भागांत अतिवृष्टी व पूर, तर काही भागांत दुष्काळ आणि वणवे निर्माण होऊ शकतात. आफ्रिकेच्या दक्षिण भागात दुष्काळाचा, तर पूर्व भागात पुराचा धोका वाढू शकतो.



एल निनोचा जागतिक तापमानावरही मोठा परिणाम होतो. प्रशांत महासागरातील उष्ण पाणी वातावरणात अतिरिक्त उष्णता सोडते. त्यामुळे जागतिक सरासरी तापमानात तात्पुरती वाढ होते. यापूर्वी १९९८, २०१६ आणि २०२४ या एल निनोच्या प्रभावाखालील वर्षांमध्ये जागतिक तापमानाचे विक्रम नोंदले गेले होते. मात्र, दीर्घकालीन तापमानवाढीमागे मानवनिर्मित हवामानबदल हा मूलभूत घटक आहे; एल निनो त्यात तात्पुरती भर घालतो.

२०२६-२७च्या एल निनोबाबतचे अंदाज विशेष चिंताजनक आहेत. कार्बन ब्रीफ या नियतकालिकाने १४ हवामान मॉडेल गटांच्या अंदाजांचे विश्लेषण केले असून, त्यातील ९६ टक्के मॉडेल-अंदाजांमध्ये हा एल निनो आधुनिक निरीक्षण नोंदीतील सर्वात शक्तिशाली ठरण्याची शक्यता दिसते. निनो ३.४ या प्रशांत महासागरातील महत्त्वाच्या प्रदेशातील समुद्रपृष्ठ तापमानातील वाढ २०१५-१६च्या २.७५ अंश सेल्सिअसच्या विक्रमापेक्षा अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मात्र हवामानबदलामुळे एल निनो अधिक तीव्र होत आहे का, हा प्रश्न अजूनही वैज्ञानिक चर्चेचा विषय आहे. काही संशोधनांमध्ये वाढत्या जागतिक तापमानामुळे तीव्र एल निनो घटनांची शक्यता वाढत असल्याचे संकेत मिळतात; परंतु हजारो वर्षांच्या हवामान नोंदींच्या अभ्यासातून एल निनोची तीव्रता आणि वारंवारता नैसर्गिकरीत्याही मोठ्या प्रमाणात बदलत असल्याचे दिसते. त्यामुळे निश्चित निष्कर्षासाठी आणखी संशोधन आवश्यक आहे.

एकंदरीत, ‘सुपर एल निनो’ हा केवळ समुद्राच्या तापमानातील बदल नसून जागतिक हवामानव्यवस्थेवर परिणाम करणारी मोठी घटना आहे. भारतासह अनेक देशांसाठी उष्णता, पावसातील अनिश्चितता, दुष्काळ, पूर, वणवे आणि अन्नसुरक्षेची आव्हाने वाढू शकतात. त्याच वेळी मानवनिर्मित जागतिक तापमानवाढ सुरूच असल्याने एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या तात्पुरत्या उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू शकते. त्यामुळे २०२६-२७ हा काळ हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा काळ विध्वंसकतेच्या विस्फोटाचा ठरेल असे चित्र सध्या दिसत आहे.   

---- संदर्भ  https://interactive.carbonbrief.org/el-nino-explainer/index.html