राजस्थानच्या जयपूरमधील बागरू विधानसभा मतदारसंघातील रामपुरा कंवरपुरा या गावात कॉकरोच जनता पार्टीच्या ‘स्कूल ठीक करो अभियानांतर्गत आशुतोष रांका आणि त्यांचे सहकारी गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. 

यात आशुतोष रांका यांचे कपडे फाटले तर सलमान या एका कार्यकर्त्याचा हाताला जबर दुखापत झाली. या घटनेला भाजपाचे गुंड जबाबदार असल्याचा आरोप सीजेपीने केला आहे.  

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना आशुतोष रांका म्हणाले, “आज संपूर्ण देशाने भाजपाची गुंडगिरी पाहिली. पोलिसांना हा प्रकार आधीपासून माहीत होता. तरीही त्यांनी हात वर केले आणि आम्ही काहीच करणार नाही, असे सांगितले. राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आला आहे. गुंडानी आधीच दगड आणून ठेवले होते. त्यांनी आमच्यावर दगडफेक केली. आमच्या एका कार्यकर्त्याचा हात तोडला गेला. महिलांनाही गुंडांनी सोडले नाही. राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांच्या इशाऱ्यावर हा सुनियोजित हल्ला करण्यात आला.”

“पुढील ४८ तासांत जर या सर्व गुंडांना अटक झाली नाही आणि त्यांनी दिलेले आदेश मागे घेतले गेले नाही तर आम्ही संपूर्ण राजस्थानात हे आंदोलन करू,” असा इशाराही आशुतोष रांका यांनी दिला आहे.

आशुतोष रांका यांनी सांगितले की, ते गेल्यावर्षी सुद्धा या शाळेत आले होते. ही शाळा म्हशींच्या गोठ्यात भरवली जाते. तेव्हापासून ते ही शाळा सुधारण्याची मागणी करत आहेत. पण आजतागायत या शाळेत सुधारणा झालेली नाही. आजही गोठ्यातच शाळा भरत आहे. यावेळी स्कूल ठीक करो मोहिमे अंतर्गत ते गावकऱ्यांच्या सांगण्यावरून शाळा नीट करण्याची मागणी करण्यासाठी तिथे गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला गावातील ग्रामस्थांनी केला नसून भाजपाच्या गुंडांनी केला आहे, असा दावाही रांका यांनी केला आहे. यावेळी कार्यकर्त्यांना मारहाण झाली, महिला कार्यकर्त्यांचे फोन हिसकावले गेले. त्यांच्याशी अभद्र वागणूक केली गेली आणि गाड्यांवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. शिवाय पोलिसांना या सर्व प्रकारची आधीच माहिती होती. पोलीस घटनास्थळी उपस्थितही होते मात्र त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, असेही त्यांनी सांगितले.

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार एका गावकऱ्याने सांगितले की, “आम्हाला शाळा बांधण्यासाठी १२ लाख रुपये मिळाले आहेत आणि आम्ही आमची शाळा बांधण्यासाठी सक्षम आहोत. भगवान रामाविषयी वाईट बोलणाऱ्या आणि देशाला विभाजित करू पाहणाऱ्या लोकांकडून आम्हाला कोणतेही काम करायचे नाही.”

मात्र आशुतोष रांका यांनी एक्स या समाज माध्यमावर गावकऱ्यांची काहीही चूक नाही. जे काही झालं ते बाहेरून आलेल्या लोकांनी केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  


विश्लेषण :

गावकऱ्यांच्या या वक्तव्यावरून ही कोणाची भाषा आहे हे स्पष्ट होतं. जर त्यांना १२ लाख मिळाले आहेत आणि ते शाळा बांधणार आहेत तर तसं सीजेपी कार्यकर्त्यांना नीट बसून सांगता आलं असतं. त्यावर मारहाण करण्याची, गाड्या फोडण्याची काय गरज होती? तुमच्या शाळा आणि तुमच्या मुलांसाठी ही मंडळी आली होती. त्यांना राजकारण करायचं असतं तर ते जीवावर उदार होऊन गावागावात गेले नसते. याच जयपूरमध्ये अभिजित दीपके यांच्यावर हल्ला झाला होता. हे माहित असूनही हे कार्यकर्ते तिथे गेले. या कार्यकर्त्यांपैकी कोणीही भगवान रामाविषयी काही वाईट बोललेलं नाही आणि देशाला विभाजित करण्याची भाषाही केलेली नाही. तरीही अशा प्रकारचे त्यांच्यावर आरोप करण्याचा अर्थ काय होतो? यावरही आशुतोष रांका यांनी यात गावकऱ्यांची चूक नाही असं म्हटलं आहे. किमान गावकऱ्यांनी या गुंडांना न जुमानता आपल्या भल्याचा विचार केला पाहिजे. त्यांना शाळा बांधण्यासाठी मिळालेले १२ लाख कधी मिळाले? शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही अजून शाळा बांधून सुद्धा का झाली नाही? याची उत्तरं मिळाली नसली तरी त्यांनी किमान या पैशांचा योग्य उपयोग करून आता तरी आपल्या गावातील शिक्षणाकडे लक्ष द्यावं.    

सीजेपीने ‘स्कूल ठीक करो’ अभियान सुरू केल्यापासून त्यांना जिथे जिथे विरोध झाला तो शिक्षणाच्या विरोधकांनीच केला आहे. आता हे लोक कोण आहेत हे लोकांनी ओळखावं आणि प्रसार माध्यमांनी योग्य शीर्षकासह ते दाखवावं. हा हल्ला झाल्यावर आशुतोष रांका आणि सर्व सीजेपी कार्यकर्त्यांना तिथून निघावे लागले. मात्र याचे वृत्तांकन करताना प्रसार माध्यमांनी ‘आशुतोष रांका को दौडा दौडा कर भगाया,’ अशा प्रकारच्या बातम्या दिल्या. असले मथळे देऊन प्रसार माध्यमं अजूनही आपली भक्ती दाखवत आहेत. पण हे त्यांच्याही मुलांच्या भविष्यासाठी घातक आहे हे त्यांनाही कळेल तो सुदिन.