सातारा जिल्ह्यातील १,५०० मेगावॅट क्षमतेच्या अदानी समूहाच्या तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्पाच्या (पीएसपी) अडचणी वाढल्या आहेत.
प्रकल्पासाठी आवश्यक वैधानिक
परवानग्या मिळाल्याबाबत सातारा वन विभागाचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी
प्रश्न उपस्थित केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण
मंडळाने (एमपीसीबी) अदानी रिन्यूएबल एनर्जी वन लिमिटेड या कंपनीला कामबंदीची नोटीस
बजावली आहे. सातारा जिल्ह्यातील सावरघर गावातील दोन भूखंडांवर कंपनीकडून
विनापरवानगी उत्खनन आणि बांधकाम सुरू असल्याचा ठपका मंडळाने ठेवला आहे. या ठिकाणी
प्रकल्पाच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपातील कामगार निवास व्यवस्था आणि बांधकाम
साहित्य साठविण्याची सुविधा उभारण्यात येत होती. मंडळाच्या म्हणण्यानुसार, कंपनीने आवश्यक परवानग्या न घेताच हे काम सुरू केले होते.
तसेच,
या दोन भूखंडांवरील विकासकामांसाठी सक्षम प्राधिकरणाकडून
पर्यावरणीय मंजुरीही घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे संबंधित दोन्ही ठिकाणांवरील
सुरू असलेली तसेच प्रस्तावित कामे तातडीने थांबविण्याचे निर्देश मंडळाने दिले
आहेत.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचा इशारा
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाणी (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९७४ मधील कलम ३३ अ आणि हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९८१ मधील कलम ३१ अ अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत. मंडळाची पूर्वपरवानगी न घेता पुन्हा काम सुरू केल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही कंपनीला देण्यात आला आहे.
तारळी प्रकल्पाला एका आठवड्याच्या आत कामबंदीची नोटीस मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १३ नोव्हेंबर रोजी वनविभागानेही प्रकल्पाला नोटीस बजावली होती. दरम्यान, या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी १७ नोव्हेंबर रोजी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. मात्र, या बैठकीनंतरही वन विभागाने पुढील कारवाईबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.
प्रदूषण नियंत्रण
मंडळाच्या नोटिशीला उत्तर देताना कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, बांधकामाच्या काळात आवश्यक असलेल्या तात्पुरत्या
सुविधांसाठी निश्चित करण्यात आलेले हे दोन भूखंड प्रकल्पाच्या कायमस्वरूपी
घटकांमध्ये समाविष्ट नाहीत. प्रकल्पाच्या कायमस्वरूपी घटकांसाठी आवश्यक असलेल्या
सर्व वैधानिक मंजुरी घेण्यात आल्या आहेत. तसेच, या खासगी जमिनीच्या तात्पुरत्या वापराचा विचार केंद्रीय
विद्युत प्राधिकरणाने (सीईए) मंजूर केलेल्या आराखड्यात आधीच करण्यात आला आहे, असे कंपनीने स्पष्ट केले. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या
तात्पुरत्या सुविधा हटविण्यात येतील आणि संबंधित जमीन पूर्ववत करण्यात येईल, असेही प्रवक्त्याने सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे
वस्तुस्थिती आणि आवश्यक स्पष्टीकरणांसह उत्तर सादर करण्यात येणार असल्याचे कंपनीने
स्पष्ट केले आहे. तोपर्यंत या दोन्ही भूखंडांवरील कामकाज स्थगित ठेवण्यात
आल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचा सवाल
दरम्यान, सातारा वन विभागाचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी ७ एप्रिल २०२५ रोजी कंपनीला काम सुरू करण्यासाठी संमती (सीटीई) देण्यापूर्वी मंडळाने सर्व भूखंडांसाठी आवश्यक पर्यावरणीय आणि वन्यजीवविषयक मंजुरी उपलब्ध असल्याची पडताळणी केली होती का, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, सावरघर गावाचा प्रकल्पाच्या पर्यावरणीय मंजुरीमध्ये समावेशच नाही. या मंजुरीमध्ये केवळ निवाडे, काळंबे, तोंडोशी आणि जळू या चार गावांचा समावेश असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे सावरघरमधील जमिनीवर सुरू असलेल्या कामांना आवश्यक परवानग्या मिळाल्या होत्या का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ताज्या नोटिशीनंतर कंपनीने तारळी गावातील प्रकल्पाच्या सर्व ठिकाणांवरील काम थांबविले आहे. सध्या कोणतेही बांधकाम सुरू नसल्याची माहिती वन विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. वन विभागाने कंपनीने यापूर्वी बजावलेल्या नोटिशीला दिलेल्या उत्तराची तपासणी पूर्ण केली असून, पुढील आठवड्यात केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडे (एमओईएफसीसी) अहवाल सादर करण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.