जिल्हानिहाय कृती आराखडे तयार करण्याचे निर्देश


दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी हवेची गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (सीएक्यूएम) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. २०२६ च्या तुलनेत २०२७ मध्ये वार्षिक सरासरी वायुप्रदूषणात किमान १५ ते २० टक्के घट करण्याचे उद्दिष्ट आयोगाने दिल्लीसह एनसीआरमधील राज्यांना दिले आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच आयोगाने जिल्हानिहाय कृती आराखडे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या आराखड्यात प्रत्येक उपाययोजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि देखरेखीसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याचे नाव, पद आणि संपर्क तपशील नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हिवाळ्यातील हवामानामुळे राजधानीतील प्रदूषणाची तीव्रता वाढते. त्यातच शेजारील राज्यांमध्ये होणाऱ्या शेतातील पिकांच्या अवशेषांच्या जाळपोळीमुळे प्रदूषणात आणखी भर पडते. त्यामुळे प्रदूषणाच्या विविध स्रोतांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आयोगाने ही नवी यंत्रणा आखली आहे.



सर्व आराखडे ऑनलाइन पोर्टलवर सादर करण्याचे निर्देश

२० नोव्हेंबर रोजी दिल्ली आणि एनसीआरमधील राज्य सरकारांना पाठविलेल्या पत्रात आयोगाने सध्याच्या राज्य आणि महानगरपालिका स्तरावरील आराखड्यांव्यतिरिक्त जिल्हास्तरावरही स्वतंत्र कृती आराखडे तयार करण्यास सांगितले आहे. वाहनांमधून होणारे उत्सर्जन, रस्त्यांवरील धूळ, औद्योगिक प्रदूषण, बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणारी धूळ, महानगरपालिकेचा कचरा, पिकांचे अवशेष जाळणे, डिझेल जनरेटर संच, स्मशानभूमी तसेच प्रदूषणाच्या अन्य स्थानिक स्रोतांवर नियंत्रण मिळविण्यासाठी या आराखड्यात मोजता येण्याजोगी उद्दिष्टे, कालमर्यादा आणि देखरेखीसाठीचे निकष निश्चित करावे लागणार आहेत. प्रत्येक उपाययोजनेसाठी संबंधित विभाग किंवा यंत्रणेचे नाव तसेच अंमलबजावणी आणि देखरेखीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याचे नाव, पद आणि संपर्क क्रमांक द्यावा लागणार आहे. हे सर्व आराखडे ५ डिसेंबरपर्यंत आयोगाच्या ऑनलाइन पोर्टलवर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रदूषणात १५ ते २० टक्क्यांची घट अपेक्षित

वार्षिक सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय), पीएम २.५ आणि पीएम १० यांच्या पातळीत किमान १५ टक्के घट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ही घट २० टक्क्यांपर्यंत नेण्याचे प्रयत्न करण्यासही सांगण्यात आले आहे. या आराखड्यांसाठी आयोगाकडून आणखी काही मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत. तसेच, शहरी विकास प्राधिकरणांच्या उपाययोजनांचा समावेश संबंधित महानगरपालिकांच्या आराखड्यांमध्ये केला जाणार आहे.

२३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर आराखडा तयार करण्याबाबत अधिक स्पष्टता मिळेल, अशी अपेक्षा दिल्ली सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सच्या वार्ताहराकडे व्यक्त केली. आयोगाने शुक्रवारी निर्देश जारी केले असून, त्यानुसार सरकार कार्यवाही करेल, असेही त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. दिल्लीतील विविध जिल्ह्यांमध्ये प्रदूषणाचे स्रोत बहुतांश समान असल्याने जिल्हानिहाय आराखडे इतर एनसीआर राज्यांसाठी अधिक उपयुक्त ठरतील, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले. इतर राज्यांमध्ये मात्र जिल्ह्यानुसार प्रदूषणाच्या स्रोतांमध्ये फरक आहे. एखाद्या जिल्ह्यात औद्योगिक प्रदूषणाची समस्या गंभीर असू शकते, तर दुसऱ्या जिल्ह्यात रस्त्यांवरील धूळ हे प्रदूषणाचे प्रमुख कारण असू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीतील विविध जिल्ह्यांमध्ये प्रदूषणाचे स्रोत बहुतांश समान असल्याने जिल्हानिहाय आराखडे इतर एनसीआर राज्यांसाठी अधिक उपयुक्त ठरतील, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले. इतर राज्यांमध्ये मात्र जिल्ह्यानुसार प्रदूषणाच्या स्रोतांमध्ये फरक आहे. एखाद्या जिल्ह्यात औद्योगिक प्रदूषणाची समस्या गंभीर असू शकते, तर दुसऱ्या जिल्ह्यात रस्त्यांवरील धूळ हे प्रदूषणाचे प्रमुख कारण असू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.



प्रदूषण मापनाबाबत अद्याप स्पष्टता नाही

दरम्यान, जिल्हानिहाय प्रदूषण घट कशी मोजली जाणार, याबाबत आयोगाने अद्याप स्पष्टता दिलेली नाही. एखाद्या जिल्ह्यातील प्रदूषणाची वार्षिक सरासरी तेथे असलेल्या प्रदूषण मापन केंद्रांची संख्या आणि त्यांची ठिकाणे यांवर अवलंबून असते. एका मापन केंद्रावर नोंदवली जाणारी प्रदूषणाची पातळी ही त्या विशिष्ट ठिकाणापुरती मर्यादित असते. त्यामुळे जिल्ह्याने निर्धारित उद्दिष्ट गाठले की नाही, हे ठरविण्यासाठी कोणत्या मापन केंद्रांवरील आकडेवारीचा आधार घेतला जाणार, याबाबत आयोगाने काहीही स्पष्ट केलेले नाही.

प्रदूषण मापनाबाबत अद्याप स्पष्टता नाही

दरम्यान, जिल्हानिहाय प्रदूषण घट कशी मोजली जाणार, याबाबत आयोगाने अद्याप स्पष्टता दिलेली नाही. एखाद्या जिल्ह्यातील प्रदूषणाची वार्षिक सरासरी तेथे असलेल्या प्रदूषण मापन केंद्रांची संख्या आणि त्यांची ठिकाणे यांवर अवलंबून असते. एका मापन केंद्रावर नोंदवली जाणारी प्रदूषणाची पातळी ही त्या विशिष्ट ठिकाणापुरती मर्यादित असते. त्यामुळे जिल्ह्याने निर्धारित उद्दिष्ट गाठले की नाही, हे ठरविण्यासाठी कोणत्या मापन केंद्रांवरील आकडेवारीचा आधार घेतला जाणार, याबाबत आयोगाने काहीही स्पष्ट केलेले नाही.

प्रदूषणाला प्रशासकीय जिल्ह्यांच्या सीमा नसतात. एका जिल्ह्यातील प्रदूषण दुसऱ्या जिल्ह्यातही पसरू शकते. जिल्हास्तरीय अधिकारी स्वतःच्या जिल्ह्यातील प्रदूषणाच्या स्रोतांवर नियंत्रण ठेवू शकतात; मात्र हवेतील एकूण प्रदूषणावर बाहेरील जिल्ह्यांमधून येणाऱ्या प्रदूषित हवेमुळेही परिणाम होतो. आयोगाने संपूर्ण प्रदूषण क्षेत्राचा एकत्रित विचार करणाऱ्या 'एअरशेड अप्रोच'चा अवलंब करण्याचे म्हटले असले, तरी जबाबदारी मात्र जिल्हानिहाय निश्चित केली आहे. त्याचप्रमाणे वारा, पाऊस आणि वातावरणातील प्रदूषकांच्या प्रसाराची उंची यांमधील बदलांमुळेही वार्षिक प्रदूषणाच्या सरासरीवर परिणाम होतो. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांमुळे झालेली घट आणि अनुकूल हवामानामुळे झालेली घट यांमध्ये फरक कसा केला जाणार, याचे उत्तरही आयोगाने दिलेले नाही. प्रत्येक जिल्ह्याला स्वतःच्या हद्दीतून किती प्रदूषण होते आणि त्याचे प्रमुख स्रोत कोणते आहेत, याची अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे. त्याशिवाय कोणत्या उपाययोजनेमुळे किती प्रदूषण कमी होईल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. सर्व जिल्ह्यांना त्यांच्या सुरुवातीच्या प्रदूषण पातळीनुसार किंवा प्रदूषणाच्या स्रोतांनुसार वेगवेगळी उद्दिष्टे न देता सरसकट किमान १५ टक्के घट करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे प्रमाण निश्चित करण्यामागील आधारही आयोगाने स्पष्ट केलेला नाही.

'एन्व्हायरो कॅटॅलिस्ट्स'कडून निर्णयाचे स्वागत

पर्यावरणविषयक संशोधन संस्था 'एन्व्हायरो कॅटॅलिस्ट्स'चे संस्थापक आणि प्रमुख विश्लेषक सुनील दहिया यांनी आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्य आणि महानगरपालिका स्तराबरोबरच जिल्हास्तरावरही प्रदूषण नियंत्रणाचे आराखडे तयार करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक उपाययोजनेसाठी मोजता येण्याजोगी उद्दिष्टे, कालमर्यादा आणि जबाबदार अधिकाऱ्याचे नाव निश्चित केल्यामुळे कोणती उपाययोजना कुठे राबवायची, ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आणि तिची जबाबदारी कोणाची आहे, हे स्पष्ट होईल. प्रदूषणाच्या स्रोतांवरच नियंत्रण मिळविण्यावर दिलेला भर हा राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासह संपूर्ण देशासाठी आवश्यक असल्याचे दहिया यांनी नमूद केले. मात्र, हा आराखडा प्रत्यक्षात यशस्वी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रदूषणाच्या स्रोतांची अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्याने प्रदूषण उत्सर्जनाची नोंदवही तयार करून दर तीन महिन्यांनी ती अद्ययावत करणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि संसाधनेही प्रशासनाकडे असली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. या माहितीबरोबरच प्रदूषणाचे सध्याचे प्रमाण, विविध क्षेत्रांनुसार जिल्हानिहाय उत्सर्जनाची आकडेवारी आणि १५ ते २० टक्के प्रदूषण घटविण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने झालेली प्रगती सार्वजनिक करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आकडेवारी सर्वसामान्यांसाठी खुली केल्यास उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवणे शक्य होईल, असेही दहिया यांनी स्पष्ट केले.

शनिवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता सलग सातव्या दिवशीही 'खराब' श्रेणीत कायम होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार, दिल्लीचा २४ तासांचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक २६५ नोंदविण्यात आला. शुक्रवारी हा निर्देशांक २७० होता. म्हणजेच एका दिवसात पाच अंकांची सुधारणा झाली. दिल्लीतील ५७ प्रदूषण मापन केंद्रांपैकी १३ केंद्रांवर हवेची गुणवत्ता 'अत्यंत खराब' श्रेणीत नोंदविण्यात आली. शनिवारी दिल्लीतील एकूण प्रदूषणात वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनाचा वाटा सर्वाधिक ३३.१ टक्के होता. त्याखालोखाल दुय्यम सेंद्रिय एरोसोलचा वाटा १६.५ टक्के, तर जैवइंधन जाळण्याचा वाटा १३.९ टक्के होता.

दिल्लीची हवा आगामी काळातही 'खराब' श्रेणीत राहण्याचा अंदाज हवेची गुणवत्ता आणि हवामान अंदाज यंत्रणेने (एक्यूईडब्ल्यूएस) व्यक्त केला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार, शनिवारी दिल्लीतील कमाल तापमान २७.६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १२.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. हिवाळ्यातील हवामानामुळे प्रदूषकांचा वातावरणात होणारा प्रसार मर्यादित राहत असल्याने दिल्लीतील प्रदूषणाची समस्या अधिक गंभीर बनत आहे. त्यामुळे केवळ प्रदूषणाची पातळी मोजण्याऐवजी त्याच्या स्रोतांवर नियंत्रण मिळविणे आणि त्यासाठी निश्चित केलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.