18th
September 2019
By Vinisha
Dhamankar
निर्मला सीतारामन मॅडमनी आज ई सिगरेट्स बॅन केल्या. त्याबद्दल आधी त्यांचे आभार आणि आणखी एका समाज हितकारक निर्णयासाठी त्यांचे अभिनंदन.... पण यानंतर काही जुनाट प्रश्न पुन्हा समोर येतात. ज्या तंबाखूच्या सिगरेट्स सोडण्याच्या कारणासाठी ई सिगारेट्स घेतल्या जातात त्याच बॅन का केल्या जात नाहीत? कारण स्पष्ट आहे. ई सिगरेट्स अजून भारतात बनत नाहीत. त्या आयात केल्या जातात. मात्र तंबाखूच्या सिगरेट्स इथे बनतात ही आणि त्यातून भरमसाठ महसूल ही मिळतो. एक अर्थ मंत्री म्हणून हा महसूल बुडवी निर्णय त्या घेऊ शकत नाहीत हे कबूल. पण त्या यावर पर्याय तर देऊ शकतात?
विडी आणि सिगरेट्स
बॅन करण्यासाठी यापूर्वी जे काही प्रयत्न केले गेले ते गरिबांना विडी वळण्यातून
रोजगार मिळतो या सबबीवर अजून ही सुरु आहेत. ह्या कामगारांवर अनेक वेळा लिहिलं गेलं, डॉक्युमेंटरीज बनल्या. पण त्यांचे हाल कोणाला दिसले नाहीत. ते बॅन करून
त्यांना इतर रोजगार मिळवून देता येऊ शकतो पण तसे प्रयत्नच झाले नाहीत. या सगळ्यात
गुटखा ह्या प्रकाराने माणसाचं व्यसन त्याच्या शरीरभर आणि थुंक्यांच्या रूपाने
शहरभर पोहोचवण्यात मोठा हातभार लावला. गुटखा बॅन झाला तो कागदोपत्री. तो हमखास आणि
उघड रित्या मिळतो हे शासनाच्या खुर्च्यांवर बसलेल्या सगळ्यांना माहित आहे.
त्यांच्यावर कारवाई नाही कारण "महसूल" त्यांच्याकडूनही मिळतोच की.
हरयाणातील सोनेपत जिल्ह्यातील
गमरी गावातील महिलांनी दारूच्या दुकानाची तोडफोड केली आणि सर्व दारू रस्त्यावर ओतली.
हिंदुस्तान टाइम्स मधील Mar 27, 2017
चे छायाचित्र
ह्या सगळ्यावर मॅडमनी एकदा लक्ष घातलं असतं आणि दारू, विडी, सिगरेट, गुटखा हे सर्वच बाजारातून नाहीसे केले असते तर? तर एक स्त्री अर्थमंत्री झाली तर काय करू शकते याचा उत्तम वस्तुपाठ त्यांनी घातला असता कारण त्यांच्या समोर गावागावातील स्त्रिया दारूच्या दुकानांची तोडफोड करून ती दुकानं कशी बंद करतात याची अनेक उदाहरणं आहेत. गावातील स्त्रिया हे करू शकतात, अख्ख गुजरात राज्य दारुमुक्त होऊ शकतं तर एक अर्थमंत्री म्हणून त्या हे सर्व इतर अनेक निर्णयांप्रमाणे एका रात्रीत बॅन झालं म्हणून जाहीर करू शकतात की. पण मॅडमना श्रीमंतांच्या मुलांना लागलेल्या व्यसनाचं दुःख अधिक म्हणून त्यांनी अमेरिकेतील आकडेवारी सांगत इथल्या ई सिगरेट्स बॅन केल्या. आम्हाला आणि आमच्या पुढील पिढीला ई सिगरेट हा काय प्रकार आहे हे कळण्या आधीच मॅडमनी त्याला बाहेरचा रास्ता दाखवला हे बरं केलं आणि याबद्दल त्यांचे आभार, पण आता त्यांनी दारू, विडी, सिगरेट आणि गुटखा व्यवसायात काम करणारे कामगार आणि त्याचे सेवन करणारे यांच्या तब्बेतीचीही काळजी लवकरात लवकर वहावी आणि महसूलासाठी असलेले बाकीचे पर्याय अधिक सक्षम करून गोरगरीबापासून धन दांडग्यांपर्यंत सर्वच लोकांचे आरोग्य पणाला लावून मिळवलेला महसूल त्यागावा ही विनंती.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.