धक्कादायक ! अंगावरून सरर्कन काटाच गेला!! जागतिक महिला दिनाचे जगभरात काय काय कार्यक्रम झाले याचा धांडोळा घेत असताना थॉम्सन रावटर्सच्या साईट वर मिळालेली माहिती वाचून डोकं चक्रावून गेलं. सर्वात स्वतंत्र मानली गेलेली लॅटिन अमेरिकन स्त्री देखील प्रचंड दमनाची शिकार होतेय? इतकी की दिवसाला सरासरी १२ स्त्रिया मारल्या जात आहेत? लॅटिन अमेरिकेतील आणि कॅरेबियन देशांमध्ये प्रत्येक ३ स्त्रियांमागे एका स्त्रीचं शारीरिक आणि / किंवा लैंगिक शोषण होत आहे? जगातील हा सर्वात मोठा आकडा तर आहेच शिवाय यातील 98% हत्यांची कुठे नोंदच नाहीये. पण गेल्या एक वर्षापासून याला तोंड फुटू लागलं आहे. आपल्यावर होत असलेल्या ह्या अत्याचारांविरोधात तिथल्या महिला गेल्या एक वर्षापासून एकत्र येऊन न्याय मागू लागल्या आहेत. पारवा ८ मार्च २०२० रोजी सर्व जग जेंव्हा मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरं करत होतं तेंव्हा चिली, अर्जेंटिना, ब्राझील आणि मेक्सिको मधल्या स्त्रिया ह्या घरगुती हिंसाचार किंवा अन्य कारणाने होणार्‍या भयावह अशा स्त्री हत्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या.
चिलीयन नेटवर्क अगेन्स्ट वायलेन्स अगेन्स्ट विमेन या संस्थेच्या म्हणण्यानुसार २०१८ मध्ये चिलीमध्ये दर दिवशी लैंगिक अत्याचारच्या ४२ घटनांची नोंद झाली. तर २०१९ मध्ये ४६ महिलांची त्या केवळ स्त्री असल्यामुळे हत्या करण्यात आली. चिलीमध्ये सामाजिक असमानतेच्या विरोधात आंदोलनाला ऑक्टोबर महिन्यात तोंड फुटलं आणि ते डिसेंबर पर्यन्त सुरू होतं. या आंदोलनात आपला आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी लास टेसिस या स्त्रीवादी नाट्यकर्मीच्या संघटनेचे सदस्य “अन वायलेडर एन तू कॅमिनो टू (तुझ्या मार्गात एक बलात्कारी आहे) ह्या लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत सरकारचा पूर्वग्रह आणि एककल्लीपणा कसा मारक आहे हे सांगणारं गाणं सादर करायचे आणि सर्वांना त्यावर ठेका धरायला लावत होते.  हे गाणं खूप लोकप्रिय तर ठरलंच शिवाय प्रचंड वायरल झालेल्या ह्या गाण्याने मेक्सिको, कोलंबिया, स्पेन आणि फ्रांसमध्ये ही आपला जलवा दाखवला आणि त्यांचे विडिओ देखील वायरल झाले. डिसेंबरमध्ये हजारो महिलांनी चिलीची राजधानी सॅंटदिएगोच्या राष्ट्रीय स्टेडीयममध्ये हे गाणं सादर केलं.



ह्या प्रचंड आंदोलनाला ह्याच आठवड्यात यशही मिळालं. स्त्रीहत्येसाठी असलेली १५ वर्षं कैदेची शिक्षा आता आजन्म कारावास अशी करण्यात आली आणि राष्ट्रपति सेबेस्टियन पीनेरा यांच्या स्वाक्षरीने त्यावर शिक्कामोर्तब झालं.
इतिहास घडतो तो ही एकटा दुकटा घडत नाही. चिलीच्या नव्या संविधान निर्मितीसाठी स्त्री आणि पुरुष कायदेतज्ज्ञांची संख्या ही सम प्रमाणात असेल असा ऐतिहासिक ठराव ही पारित करण्यात आला.
ला कासा डेल एङ्क्युंट्रो (La Casa del Encuentro) ह्या स्वयंसेबी संघटनेच्या मते, अर्जेंटिनामध्ये प्रत्येक ३२ तासाला एका महिलेची हत्या होतेय. अर्जेंटिनामध्ये पितृसत्ताक समाज व्यवस्थेच्या विरोधात कलाकार, पत्रकार, विद्यार्थी यांची नि उना मेनोस (Ni una menos) अर्थात नॉट वन वुमन लेस ही एक संघटना उभी राहिली. ही संघटना नेहमीच स्त्रीहत्यांच्या विरोधात आवाज उठवत आली आहे. या शिवाय ती लैंगिक अत्याचार, लिंगाधारीत वेतन निश्चिती, गर्भपात विषयक कायदे, सेक्स वर्कर्स, तृतीय पंथीयांचे हक्क या विषयांवर देखील भाष्य करत आली आहे. २०१४ मध्ये १४ वर्षीय चियारा पेस या मुलीवर तिच्या प्रियकरानेच बलात्कार करून तिची हत्या करून  तिचे प्रेत स्वत::च्या घराच्या जमिनीत पुरून ठेवलं होतं. हे जेंव्हा उघडकीस आलं आणि तिच्या शवाची उत्तरीय चिकित्सा करण्यात आली तेंव्हा ती गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं. तिला प्रचंड मारहाण करण्यात आली होती शिवाय काही औषधं देऊन तिचा गर्भपात ही घडवून आणण्याचा प्रयत्न झाला होता. यात केवळ तिचा मित्रच मारेकरी नव्हता तर त्याची आई आणि सावत्रबाप ही सहभागी होते. अशा प्रवृत्तींना आळ घालण्यासाठी नि उना मेनोस संघटनेने #NiUnaMenos ही हॅशटॅग चळवळ प्रसार माध्यमांवर चालवली आणि त्याला उरूगवे, चिली सारख्या देशातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला.  २०१६ मध्ये अर्जेंटिना मध्ये ल्युसिया पेरेज ह्या १६ वर्षीय मुलीवर बलात्कार करून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. ह्या हत्येच्या विरोधात अर्जेंटिनातील महिलांनी १९ ऑक्टोबर २०१६ रोजी कामबंद आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर ब्राजीलच्या रिओ डी जनेरोमध्ये देखील अशीच आंदोलने झाली.  या संस्थेच्या हॅशटॅगने अर्जेंटिनामध्ये मोठी क्रांति घडवून आणली.
अर्जेंटिनामध्ये केवळ बलात्कारातून राहिलेला गर्भ किंवा मातेची तब्बेत ठीक नसल्यास गर्भपात करण्याची परवानगी आहे. परंतु सरसकट गर्भपात कायदेशीर करण्यासाठी नि उना मेनोस संघटना प्रयत्न करीत आहे.
ब्राझील स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जगातील सर्वात भयानक देश आहे. प्रत्येक तासाला शेकडो स्त्रियांना इथे आपल्या ओळखीतील पुरुषाच्या अत्याचाराला सामोरं जावं लागतं. इथल्या संघर्षाला २०१८ च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीपासून सुरुवात झाली होती. राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत जैर बोल्सनरो उतरला होता जो स्त्रियांविषयी अपशब्द बोलण्यासाठी कुप्रसिद्ध आहे, जो बलात्कारासारख्या अपराधाला गंभीर अपराध मानत नाही. त्याच्या विरोधात तेथील स्त्रियांनी #नॉट हिम नावाची हॅशटॅग चळवळ सुरू केली. पण त्याचा फारसा फायदा झाला नाही, त्याला अनेक कारणं असू शकतील. गेल्या वर्षी म्हणजेच १ जानेवारी २०१९ला राष्ट्राध्यक्ष पदी बसल्यावर ९ शहरातील हजारो स्त्रियांनी जागतिक महिला दिनी त्याच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता.



२०१९ मध्ये मेक्सिकोमध्ये स्त्रीहत्यांमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली. आणि ७५% स्त्रियांना वाटतं की त्या त्यांच्या शहरात सुरक्षित नाहीत. पोलिसांकडूनच २ महिलांवर बलात्कार करण्यात आला. ७ वर्षाच्या मुलीचं अपहरण आणि हत्या करण्यात आली. अशावेळी कायदा आणि सुरक्षा खरंच अस्तित्वात आहे का असा प्रश्न निर्माण होतो.
प्रेम आणि कुटुंबासाठी पुरुषाशी जुळवून घेणारी स्त्री केवळ भारतातच नाही तर जगभरात कुठेच सुरक्षित नाही. कुठे प्रत्यक्ष तर कुठे अप्रत्यक्ष हिंसेला तिला तोंड द्यावं लागतंच आहे. सर्वच पुरुष स्त्रियांवर अन्याय करतात असं नाही पण हा आकडा शून्यावर यायला हवा. केवळ स्त्रियांनी आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून चालणार नाही. तर पुरुषांनी देखील ह्या बदलासाठी सरसावलं पाहिजे. त्याची सुरुवात घरापासून केली पाहिजेच. पण घरापासून म्हणजे आपल्या मुली पासूनच नाही तर त्यांच्या पत्नीपासून केली पाहिजे. पुरुष मुलीसाठी हळवा असतो पण पत्नीसाठी मात्र तो तितकासा संवेदनशील नसतो. हा दुजाभाव नसावा. घरातील,कुटुंबातील सर्वच स्त्रियांना ते आदर देतील आणि बरोबरीचा अधिकार मान्य करतील तेंव्हाच अन्याय दूर होतील.