जिथे ही प्रथा आजही सुरू आहे त्या इथियोपियात
मुलींना आणि पर्यायाने समाजाला फार गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. ही प्रथा बंद करण्याचे
प्रयत्न फार मोठ्या प्रमाणावर होत होते पण यात कोरोना विषाणूमुळे बाधा आणली आहे.
अनेक
दशकांपासून सुरू असलेली बाल विवाहाच्या प्रथेचं उन्मूलन काही सामाजिक संस्था आणि स्थानिक
प्रशासनाच्या मदतीने सुरू होतं. मुलींना शाळेत पाठवल्यामुळे या बाल विवाहांना आळा बसला
होता. कुठे अशा प्रकारे लग्न होत असतील तर शाळा सामाजिक संस्थांना याची सूचना देत होत्या
आणि मग ते विवाह रोखले जाऊ शकत होते. पण गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना विषाणूने
पसरवलेल्या महामारीमुळे शाळा बंद आहेत आणि अशा वेळी बाल विवाहाचं प्रमाण वाढण्याची
शक्यता वर्तवली जात आहे.
इथियोपियातील
आम्हारा या क्षेत्रात बाल विवाहाचं प्रमाण जास्त आहे असं आकडेवारी सांगते. इथे १५ वर्षे
वयाखालील १४ टक्के तर १८ व्या वर्षी ४० टक्के मुलींना “इन्फॉर्मल यूनियन” म्हणवल्या
जाणार्या ह्या लग्नात बंदिस्त केलं जातं. या मुलींची लग्नं त्यांच्या पेक्षा वयाने
मोठे असलेल्या पुरुषांशीच नाही तर १८ वर्षाखालील मुलांशीही लावून दिलं जातं. म्हणजेच
मुलींसह मुलांचं आरोग्य देखील धोक्यात आहे.
लॉकडाउनमुळे
गेल्या मार्चपासून म्हणजेच गेल्या दोन महिन्यांपासून शाळा बंद आहेत आणि या एवढ्या कालावधीत
तब्बल ५०० लग्नं सामाजिक संस्थांच्या मध्यस्थीने रोखण्यात आली आहेत. याशिवाय स्थानिक
प्रशासनाने ५४० लग्नं थांबवली आहेत.
इथियोपियामध्ये
२ कोटी ६० लाख एकूण मुलं आहे त्यात १ कोटी ५० लाख या केवळ बालवधू आहेत. ह्या प्रथेचा
नायनाट करण्यात UNICEF आणि इतर
सामाजिक संस्थांना यश येत होतं. जिथे प्रत्येक १० मुलींमागे ६ मुलींना जबरदस्तीने बोहल्यावर
चढवलं जात होतं तिथे हा आकडा आता १० मुलींमागे ४ मुली एवढा खाली आला होता. पण आता मुली
पुर्णपणे पालकांच्या हातात गेल्यामुळे आणि सामाजिक संस्थांचा हस्तक्षेप कमी झाल्यामुळे
अधिक मुली या लग्नाच्या क्रूर बेडीत अडकण्याची शक्यता आहे.
याशिवाय
COVID 19 मुळे निर्माण झालेली कौटुंबिक मिळकतीतील
पोकळी ही मुलींना विकून भरून काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो असं युनायटेड नेशन्सचं म्हणणं
आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार २०३० पर्यन्त १ कोटी ३० लाख बाल विवाह होऊ शकतात.
“गर्ल्स
नोट ब्राइड्स” या सामाजिक संस्थेच्या म्हणण्यानुसार हे बालविवाह मुलींचे शिक्षण, रोजगाराच्या संधी, आरोग्य
यापासून त्यांना वंचित ठेवतात शिवाय शोषण, लैंगिक हिंसा, घरगुती अत्याचार आणि गर्भवस्थेतील किंवा बाळंतपणतील मृत्यू यांना त्या बळी
पडतात.
नवे सरकारी
आकडे सांगतात की १५ वर्षाखालील मुलींचे विवाह करून दिले जात आहेत याला कारण इथली ग्रामीण
मान्यता लैंगिक विशुद्धतेला खूप महत्व देते हे देखील आहे. इथल्या मान्यतेनुसार स्त्रीचं
कर्तव्य हे पत्नी आणि आई एवढंच मर्यादित आहे. ह्या मानसिकतेतून त्यांना बाहेर काढण्यसाठी
सामाजिक कार्यक्रम, जनजागृती आणि
कायदे यांच्या माध्यमातून वयस्कर, वृद्ध आणि धार्मिक नेते यांचं
प्रबोधन करण्याचे प्रयत्न होत होते आणि त्याचे चांगले परिणामही दिसू लागले होते. पण
कोरोनाच्या संकटाने हाता तोंडाशी आलेला हा बदल पुन्हा एकदा ह्या समाजाला दशकभरा पूर्वीच्या
परिस्थितीत घेऊन जातोय की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.
- विनिशा धामणकर
- विनिशा धामणकर
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.