भारतात कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 

पण आज पहिल्यांदाच बाधित अक्टिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त झाली आहे. आजच्या घडीला बाधित रुग्णांची संख्या २ लाख ७६ हजारपर्यंत पोहोचली आहे आणि मागच्या २४ तासात ९,९८५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत देशात एकूण १ लाख ३५ हजार २०६ रुग्ण करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर १ लाख ३३ हजार रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण ७,७४५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासात २७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रात अजूनही कम्युनिटी ट्रान्समिशन सुरु झालेलं नाही. महाराष्ट्राची एकूण रुग्णासंख्या ९० हजारपर्यंत पोहोचली आहे.

मे महिन्यातील शेवटच्या नऊ दिवसांच्या तुलनेत जूनमध्ये मृत्यूचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे. जून महिन्यात मुंबईत करोनामुळे आतापर्यंत ४८१ मृत्यू झाले आहेत. एक जून रोजी ४० त्यानंतर पुढचे तीन दिवस ४९ मृत्यू झाले. पाच जूनला ५४ तर सहा जूनला ५८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. तर ९ जूनला करोनामुळे ५८ जणांचा मृत्यू झाला.