मला एकच सांगायचं आहे. थोडं कडवट वाटेल पण उपयोगी पडेल. माझ्या मानसोपचार तज्ञ डॉ. संहिता जामसांडेकर सावंत यांनी मला केलेल्या मार्गदर्शनानुसार काही निवडक गोष्टी मी स्वानुभवाने सांगतेय.

आज सुशांत सिंग राजपूतने नैराश्यातून केलेल्या आत्महत्येनंतर प्रत्येक जण बोला, शेअर करा, दु:ख वेदना आतल्या आत दाबू नका. काही असल्यास मला सांगा असं आवर्जून सांगत आहेत. त्यांचे खूप खूप आभार. पण खरं सांगा एखाद्याला आपल्या मनातलं सर्व बोलून टाकण्याची ज्यावेळी गरज असते, कोणी तरी ऐकणारं असावं, कोणाची तरी सोबत असावी असं वाटतं तेंव्हा खरंच आपण तिथे असतो का? 90 टक्के वेळा नाही. कारण असतं आपले व्याप. तुम्ही दु:खी असाल तर कोणालाही न सांगता तुम्ही यातून बाहेर पडू शकता. कोणी सोबत नसलं तरी काही गोष्टी सदैव तुमच्या सोबत असतात. त्या आहेत,
1. तुम्ही स्वतः - तुम्ही जर एखाद्या समस्येला कुरवाळत बसलात तर ती समस्या तुम्हाला सोडून कशी जाईल? आधी ती स्वत: पासून दूर करा. तरच तुम्ही तिच्या कडे तटस्थपणे पाहू शकाल. आणि तुम्हाला समजेल की ती समस्या तुमच्या आयुष्यापेक्षा मोठी नाही. आता तिला तुम्ही स्वतः पासून दूर कसे कराल? सोप्पंय.
2. Distraction - मन दुसरीकडे वळवणे -
आपलं शरीर जसं एक स्वयंपूर्ण हॉस्पिटल असतं तसंच मन ही एक प्रयोगशाळा असते. इथे अनंत प्रकारचे हॉर्मोन्स आपले प्रताप दाखवत असतात. तुम्ही खुश असता तेंव्हा गुड हॉर्मोन्स आणि दु:खी असता तेंव्हा बॅड हॉर्मोन्स स्त्रवित होऊन रक्तात मिसळतात. जर बॅड होमिन्स रक्तात मिसळले तर त्याचा परिणाम शरीरावर होतो जो वाढत रोज दु:खी राहिल्याने वाढत जातो. त्यामुळे कितीही दु:खी असलात तरी स्वतःला जबरदस्तीने का होईना पण खुश ठेवा. युट्युब वर एखादा कॉमेडी प्रोग्रॅम पहा. सोशल मीडिया वरील पोस्ट वाचू नका. हलती बोलती माणसं असणारे विनोदी नाटक, सिनेमा, स्कीट्स (चला हवा येऊ द्या, व्यक्ती आणि वल्ली, लहान मुलांचे विडिओ जसे Kids Fighting with Dad,  Big Shot By Steve Horway, मुलांसाठी बनवलेले गोष्टींचे व्हिडीओज, इत्यादी) पहा. ह्या गोष्टी तुम्हाला आनंद देतील.
यातून बरं वाटलं की 'मेलुहा' सारखी हलकी फुलकी पुस्तकं वाचा. यावेळी वैचारिक, ऐतिहासिक किंवा अभ्यासाची पुस्तकं वाचू नयेत. पण प्रत्येकाची आवड वेगळी असते त्यामुळे तुम्हाला अशा वैचारिक पुस्तकाने बरं वाटणार असेल तर ते वाचा. 'मेलुहा' मध्ये अगदी प्राचीन काळातील मनोरम चित्र उभं केलं आहे. त्यामुळे ते वाचताना तुमच्या मनात ते चित्र आकार घेऊ लागतं. साहजिकच तुमचं मन वेगळ्या गोष्टीत गुंतून जातं. म्हणून मी इथे मेलुहाचा उल्लेख केला.

3. खाण्यापिण्याच्या वेळा पाळा. हे शरीरासाठीच नाही तर मनासाठी सुद्धा फार आवश्यक आहे. आपल्या शरीरावर आपल्या मनाचा ताबा असतो. तुम्ही सकाळी लवकर उठता तो असतो निर्धार - मनाचा निर्धार. अशाच सर्व वेळा पाळणं म्हणजे मनाला शिस्त लावणं. शिस्त लागलेलं मन प्रत्येक कृती विचारपूर्वक करतं. अपवाद आहेत. पण आपण इथे सर्व सामान्यपणे होणाऱ्या गोष्टी बोलत आहोत.

4 - Writing Down - मनात जे काही असेल ते लिहा. वरील उपाय करण्या आधी आणि केल्यानंतर सुद्धा लिहा. यात माझं काय चुकलं, कोणाचं चुकलं, कोण बरोबर होतं, माझी किंवा इतर कोणाची चूक एवढी मोठी होती का की तिला माफ करता येणार नाही? मी काय करायला हवं? हे सर्व लिहा.

5 - लिहिताना सर्वात महत्वाचा मुद्दा. तुमच्या मित्र मैत्रिणी, भाऊ बहीण, नातेवाईक यांच्यावर असा प्रसंग आला तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल. ते लिहा. आणि मग तोच सल्ला स्वतःला द्या. स्वतःच स्वतःचे मित्र आणि गाईड व्हा. नैराश्यावर गोळ्या घेण्यापेक्षा हे कधीही उत्तम.

बुद्धाने म्हटलंय ना 'अत्त दीप भव'. जगात तुमच्यासाठी कोणीही रिकामं बसलेलं नाही. सोबत मिळाली तर उत्तम पण जर नाही मिळाली तर तुम्ही स्वतःचे सोबती व्हा. मग अशा एखाद्या व्यक्तीचे सोबती व्हा ज्यांना तुमची गरज आहे. तुमच्यासारखे अनेक लोक आहेत, त्याचे अश्रू पुसा. पण हे तेंव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही ह्या जगात सर्व आव्हानांना सामोरं जात जिवंत रहाल.

जगताना अनेक समस्या, अडचणी आल्या म्हणून जगणं हि शिक्षा म्हणूनही जगू नका आणि भिक्षा म्हणूनही जगू नका. तर नव जीवनाची दीक्षा म्हणून जगा...

चला, एक दीर्घ श्वास घ्या आणि मनाच्या प्रयोगशाळेची कवाडं उघडा.... जगा आणि इतरांना जगायला लावा...