तामिळनाडूतील अण्णा द्रमुक पक्षाच्या ए. प्रभू या दलित आमदारानं ब्राम्हण मुलीशी विवाह केल्याने मंदिराचे पुजारी असलेल्या मुलीच्या वडिलांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीच्या लग्नाला विरोध असल्याने वधूपिता ए. प्रभू यांच्या घरी गेले जिथे विवाह सोहळा संपन्न होत होता. तिथेच त्यांनी स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रेयत्न केला. लोकांनी त्यांना वाचवून रुग्णालयात भारती केले.

आमदार ए. प्रभू (३६) आणि त्यांची वधू सौन्दर्या (१९) यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यामुळे मुलीच्या वडिलांच्या विरोधाला न जुमानता हा विवाह सोहळा ए. प्रभू यांच्या निवासस्थानी पार पडला. या कारणामुळे मुलीच्या वडिलांनी मुलीला फूस लावून हे लग्न केलं असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रभू हे त्यांच्याच घरी लहानाचे मोठे झाले. पुजारी आणि त्यांचे कुटुंबिय त्यांना मुलाप्रमाणे जपत होते. मात्र त्यानेच त्यांचा विश्वासघात करून चार वर्षापूर्वी म्हणजेच मुलगी अल्पवयीन असताना तिला फूस लावली होती. शिवाय त्यांच्या वयात १७ वर्षांचे अंतर आहे यामुळे त्यांना हा विवाह मान्य नव्हता. मात्र ए. प्रभू यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या प्रेम प्रकरणाला केवळ चार महीने झाले आहेत आणि त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी वधूच्या कुटुंबियांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश न आल्यामुळे वधूने आपले पित्याचे घर सोडले आणि ती ए. प्रभू यांच्या घरी गेल्या काही दिवसांपासून राहत होती. ५ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांचा विवाह होत असल्याची कुणकुण पूजर्‍यास लागली आणि त्यांनी प्रभू यांच्या घरासमोर येऊन स्वत:च्या अंगावर  पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना या पासून रोखलं.  

आपल्या तक्रारीत वधू पित्याने मुलीचे अपहरण झाल्याचे म्हटले आहे. या आरोपांना उत्तर देताना आमदार ए. प्रभू यांनी आपली पत्नी सौंदर्यासोबत एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यात मुलीने आपले अपहरण केले नसल्याचे म्हटले आहे. तसेच तिने वडिलांचे सर्व आरोप फेटाळून लावत आपण कुटुंबियांकडे लग्नासाठी परवानगी मागितली होती मात्र त्यांनी नकार दिल्याने आपण घर सोडल्याचं तिनं म्हटलं आहे.