4 Oct 2020 3:36 PM
अन्याय मग तो कोणावरही असो, महिलांवर
असो किंवा दलित बांधवावर असो, त्याच्या निराकारणास धावून जाणाऱ्या पुष्पाताई भावे यांच्या
रुपाने एका रणरागिनीचाच अंत झाला नसून एक लढाऊ पर्वाचा शेवट झाला आहे. क्रांतिबा
जोतिबा फुले यांची बदनामी करताना ‘हे कसले फुले, ही तर दुर्गंधी‘ असा टाहो
फोडणाऱ्या प्रस्तापितांच्या विरोधात त्या रणमैदानात उतरल्या होत्या. भारिपच्या
वतीने छेडलेल्या या सर्वपक्षीय आणि सर्वस्तरीय लढ्यात त्या आमच्या बरोबर अग्रभागी
होत्या. दलित पँथरच्या काळात पोलिस अधिकाऱ्यांना फैलावर घेणाऱ्या मृणालताई गोरे
यांचा तो उच्चस्वर होता. एका खून प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात त्यांनी दिलेला
लढा मुंबईकर विसरले नाहीत. त्यांची माझी प्रथम भेट झाली ती मुंबई मराठी साहित्य
संघात पाश्चात्य नाटककार या व्याख्यान मालेत झाले.
मध्यंतरी ‘मुंबई मिरर’ या इंग्रजी वर्तमानपत्रात मुंबईतल्या पाच कार्यकर्त्यांच्या मुलाखाती प्रसिद्ध झाल्या होत्या. मुंबईतील लढाऊ महिलांची प्रतिनिधी म्हणून त्यांची तर मुंबईतील दलितांचा कायापालट या विषयावर माझी मुलाखत प्रसिद्ध झाली होती. पुष्पाताईंबरोबर हा माझा ही सन्मान होता. त्यांचे उभे आयुष्य लढा प्रज्वलीत करण्यात गेले. तो लढा मुंबईतील गिरीणी कामागारांचा असो किंवा गोवा मुक्ती आंदोलनाचा असो. त्या सतत अग्रभागी असायच्या. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्यांना प्रस्तपितांनी विरोध केला त्या नयनतारा सहगल यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला होता. या कार्यक्रमास पुष्पाताई व्हिलचेअरने स्टेजवर उपस्थितीत होत्या. या अवस्थेत त्यांना पाहिल्यावर अनेकांच्या हृद्यात चर्र झाले होते. त्यांचे पाय थकले होते पण इर्शा थकली नव्हती. त्यांच्या निधनाने पुरोगामी चळवळींची हानी झाली आहे. माझी त्यांना भावपूर्ण आदरांजली... ज. वि. पवार
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.