“दहा भाषणं जे काम करू शकत नाही ते काम एक गाणं करून जातं.” असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलले तेंव्हा ते नुसते प्रशस्ती दाखल बोलले नव्हते तर ते अनुभवाचे बोल होते. समाजोद्धाराच्या त्यांच्या कार्यात जलसाकारांनी जे योगदान दिलं ते शब्दातीत होतं. बाबासाहेबांचं कार्य आणि त्यांचा उद्देश समाजापर्यंत पोहोचवणं हे काही येरागबाळ्याचं काम नव्हतं. जो समाज युगान्युगे अस्पृश्यतेच्या चिरनिद्रेत पडून होता, आपण माणूस आहोत याची सुद्धा ज्याला जाण नव्हती, आपल्याला सुद्धा जगण्याचे म्हणून काही अधिकार असायला पाहिजेत याची तमा नव्हती, बंड करणं ज्याला माहीत नव्हतं किंबहुना बंड करणं म्हणजे देवदेवतांचा कोप ओढवून घेणं असल्या अधिकाधिक गर्तेत लोटून देणार्‍या समजुतीत पिढ्यांपिढ्या गटांगळ्या खाणार्‍या समाजाला त्या सर्वातून बाहेर काढण्यासाठी एकटे बाबासाहेब आपली सर्व शक्ती युक्ती पणाला लावत होते. अशा वेळी त्या लोकांना त्यांच्या भाषेत गाण्यातून समजावून सांगणारे जलसाकार जर निर्माण झाले नसते तर बाबासाहेबांचा उद्देश समाजात किती आतपर्यंत झिरपला असता हे सांगणं कठीण आहे. जलसाकारांचा हा वारसा पुढे अनेक कवींनी सुरू ठेवला. आणि नवभान आलेल्या समाजाला कवितेने सुद्धा अभिव्यक्तीची दारं सताड उघडी करून दिली. वामन होवाळ, दया पवार आणि नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर पोसलेली अभिरुचि अधिकाधिक संपन्न होत गेली. आणि आज फुले आंबेडकरी साहित्यात कवितांचं स्थान हे सर्वात अग्रणी ठरलं आहे.

अन्याय हा एकूणच मागासजातींसाठी नवा नाही. पण जेंव्हा तो होतो तेंव्हा अख्खं समाज जीवन ढवळून निघतं. जाणिवा जागृत असलेला प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने व्यक्त होतो. आणि इथेच कविता नावाची वीज अन्यायग्रस्त समाजाच्या हातात येते. अन्यायाच्या आगीने आधीच पोळलेले त्याचे हात ह्या वीजेने अधिक तेज:पुंज होतात. त्यातून साकारणारी कविता ही काठावरच्या समाजाला आरसा दाखवणारी असते. बाबासाहेबांच्या काळात ग्लानीतील समाजाला जागृत करण्यासाठी गाण्यांनी मदत केली पण आज धर्माची अफू खाऊन मदमस्त झालेल्या इतरेजनांची झापडं ओरबाडायचं काम आजची कविता करीत आहे.

आज व्यक्त होण्यासाठी माध्यमांची वानवा नाही आणि कोणाचा अंकुशही नाही. त्यामुळे आपली अभिव्यक्ती त्या त्या माध्यमांवर पोस्ट केली की अनेक कवींचं समाधान होत असतं. आज कविता संग्रह छापून तो वाचकांच्या हातात देताना फारसे कवी दिसत नाहीत. अशा कवीच्या कविता एकत्र करून, त्यांचं संकलन करण्याचा पहिला प्रयत्न आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. पवार यांनी १९८२ साली “उच्छवास युगंधराचे” या कविता संग्रहाने केला होता. त्यानंतर हा प्रयोग अनेकांनी केला. अगदी कवियित्रींच्या कवितांचे वेगळे कविता संग्रह सुद्धा वाचकांच्या बूकशेल्फ वर विराजमान झाले. यावेळी मात्र एक वेगळाच विक्रम आंबेडकरी कवितांच्या माध्यमातून झाला आहे. तब्बल पाच हजार कविताचं संकलन “समतेचे महाकाव्य” या ग्रंथ रूपाने प्रसिद्ध झालं आहे.

“समतेचे महाकाव्य” या कविता संग्रहाची संकल्पना राजेश खवले यांची. राजेश खवले हे गोंदिया जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी ही संकल्पना मांडली आणि त्यांना ज. वि. पवार, डॉ. भास्कर पाटील आणि प्रकाश अंधारे यांच्या भक्कम संपादनाची साथ मिळाली. प्रकाश अंधारे हे ह्या ग्रंथाचे संयोजक सुद्धा आहेत.

समतेचे महाकाव्य” हे दलित शोषित समाजाचं अंतरंग, दु:ख, वेदना आणि उन्नयन यांचा एक लेखाजोखा आहे. समाजाच्या परिवर्तनाचे असे अनेक दस्तावेज आपल्या ग्रंथालयांमध्ये आहेत. पण हा कविता संग्रह हा एक दोघा नाही तर पाच हजार लोकांच्या जगण्यातून लिहिलं गेलेलं महाकाव्य आहे. एक प्रगल्भ दस्तावेज आहे. शिवाय हा पहिलाच खंड आहे. महाकाव्याची ही संकल्पना अनेक नव्या कवींना सुद्धा प्रेरणा देईल, हे निश्चित.

या सगळ्या मागची प्रेरणा नेमकी कोणती, ते कसं साध्य झालं, एकूणच ही एवढी मोठी कामगिरी फत्ते कशी केली हे जाणून घेण्यासाठी Dr. ambedkar thoughts movement ह्या युट्यूब चॅनलवर मंगळवार दि. १३ ऑक्टोबर २०२० रोजी संध्याकाळी ७ वाजता राजेश खवले, डॉ. भास्कर पाटील आणि प्रकाश अंधारे यांच्या सोबत एक “परिचर्चा” थेट प्रसारित केली जाणार आहे. या मान्यवरांसोबत विठ्ठल वाघ आणि शिवा इंगोले हे कवी सुद्धा असणार आहेत ज्यांच्या कविता “समतेचे महाकाव्य” मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यांच्या सोबत मराठी साहित्यात समीक्षक म्हणून मानाचं स्थान असलेले डॉ. शशिकांत लोखंडे हे देखील या महाकाव्यातील कवितांविषयी आपलं मत मांडतील. या सर्व मान्यवरांसोबत ते असंख्य कवी आपल्यासोबत लाईवचॅट मध्ये असणार आहेत ज्यांनी हे महाकाव्य घडवायला मोलाचं योगदान केलं आहे. कार्यक्रमाचं सूत्र संचालन तेजविल पवार करणार आहेत.    

ह्या इतिहासाचे साक्षी होण्यासाठी https://youtu.be/1NcpHXIUkYw ह्या चॅनेलवर नक्की भेटा मंगळवार दि. १३ ऑक्टोबर २०२० रोजी संध्याकाळी ७ वाजता.   

-    विनिशा धामणकर