दिवाळी तोंडावर आली आहे. कोरोनाच्या सावटामुळे यावर्षीची दिवाळी फार उत्सवाची असणार नाही हे खरं आहे. 

गेले आठ महीने जे नियम पाळत आपण आयुष्य जगत आहोत तेच नियम आणखी काही दिवस पाळून आपल्याला आपल्यासह संपूर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. लोक स्वत:हून काही पुढाकार घेतील याची अजिबात शाश्वती नसल्यामुळे आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी फटाक्यांवर निर्बंध आणले आहेत. हाच एक वर्षाचा शेवटचा सण उरला आहे आणि आता सुद्धा जर फटाक्यांची विक्री झाली नाही तर फटाक्यांच्या छोट्या व्यापार्‍यांचं नुकसान होईल अशी कारणं दाखवत काही लोकांनी या निर्बंधांना आक्षेप घेतला आहे. हे खरं आहे की ह्या व्यापार्‍यांचं नुकसान होईल पण एखाद्या वस्तूची विक्री ही व्यापार्‍यांपुरतीच मर्यादित असते असं म्हणणं म्हणजे एका वर्गाने दुसर्‍या वर्गावर सतत कुरघोडी करण्यासारखं आहे. आणि तो दुसरा वर्ग आहे हे फटाके बनवणार्‍यांचा. या लोकांकडे जीविकेचं दुसरं कोणतंही साधन नाहीये. मात्र त्यांचा विचार केला जात नाहीये. आपल्याकडे तर निर्मिकाची उपेक्षा करण्याचा अलिखित नियमच आहे. हे ही त्यातलंच. देवाधर्माच्या नावाने सणोत्सव साजरा करणाऱ्यांना या उत्सवांमध्ये वापरलेल्या वस्तूंच्या निर्मिकांवर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती असली तरी त्यांच्या वेदनांची जाणीव नसते. मग पूजाअर्चनेच्या परंपराही सुरु राहतात आणि पीडितांच्या जखमाही भळभळत राहतात, अव्याहतपणे! फटाक्यांच्या व्यवसायात आपले हात आणि आयुष्य पोळून घेऊन ते वाजवणार्‍यांच्या आयुष्यात उन्माद निर्माण करणार्‍या त्या निर्मिकांची अवस्था पहिलीत तर तुम्हाला फटाके वाजवू नका हे सांगण्याची सुद्धा वेळ येणार नाही.

कोट्यवधीचा महसूल मिळवून देणाऱ्या फटाक्यांच्या उद्योगाला भारतात फार महत्त्व आहे. तेवढंच महत्त्व आहे संपूर्ण देशाला ९० टक्के फटाक्यांचा पुरवठा करणाऱ्या सिवाकासी या तमिळनाडूतील लहानशा शहराला.


फटाक्यांच्या उद्योगाला आवश्यक असलेल्या एकंदर ९००० फॅक्टरीज सिवाकासिला आहेत. यात फटाके तयार करून त्यांचे पोस्टर्स, कवर, डिजाईन करणाऱ्या प्रिंटींग प्रेस, कलर आर्टीस्ट, कॅलेंडर्स या सगळ्यांची कार्यालये आहेत. इथूनच जगातील ८० टक्के माचीसच्या काड्या बनवल्या जातात. याशिवाय प्रिंटींगसाठी आवश्यक असणारे रासायनिक रंगही सिवाकासी येथे बनतात. सिवाकासी हे जर्मनीतील गुटेनबर्गनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचं शहर आहे जिथे सर्वात अधिक ऑफसेट मशीन्स आहेत. देशातील सर्वात जास्त डी.टी.पी ऑपरेटर्स सिवाकासीत आहेत म्हणून तामिळनाडू हे देशातील सर्वात अधिक संगणक वापरणारे राज्य ठरलं आहे. एकट्या दिवाळीत सिवाकासीचा व्यवसाय होतो अंदाजे १००० कोटी! सिवाकासी जवळ असलेल्या थिरूथंगल या गावात पिवळ्या ग्रानाईटचे साठे आहेत. देशातील सर्वात जास्त कर भरणाऱ्या शहरांपैकी एक सिवाकासी हे शहर आहे. शिवाय इथे १०० टक्के रोजगारी आहे. या सर्व उत्तमोत्तम आकडेवारी मागे आहे माणसाच्या जीवनाला कलंक लावणारे भयाण वास्तव !

 १९६० पासून सुरु झालेल्या या लहानशा उद्योगात ८० च्या दशकापर्यंत बालमजदुरी सुरु होती. नंतर ती कायद्यान्वये बंद झाली असा दिखावा निर्माण करण्यात आला. कारण आता तीच मुलं घरी बसून कोणतंही शिक्षण न घेता फटक्याची कामे करत असतात. वरील उद्योग आपण पहिले तर सर्वच्या सर्व उद्योग हे ज्वलनशील पदार्थांशी संबंधित आहेत. वर्षाला किमान ५० आगी लागण्याचे प्रकार इथे घडत असतात. एका वेळच्या आगीत ३० ते ४० लोक मृत्यूमुखी पडतात तर शंभरेक तरी आयुष्यभरासाठी पंगू, अंध होतात.



१८८४ चा एक्स्प्लोजिव अॅक्ट इथे लागू आहे. या कायद्यात प्रत्येक फटाक्यांच्या आणि माचीसच्या फॅक्टरीत रासायनिक मिश्रण मोजून मापून घेण्यासाठी लॅब असणे अनिवार्य आहे. पण ही लॅब इथल्या मुजोरांना परवडतनसल्यामुळे ३०-४० रुपयांच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांच्या जीवाशी बिनधास्त खेळले जाते. मात्र या कायद्यातील पळवाटा शोधून काढणाऱ्यांना कायद्यान्वये काही रसायनांना आपल्या देशात मान्यता नसल्यामुळे अ-रासायनिक फटाके चीनी फटाक्यां पुढे आपले फटाके मिळमिळीत वाटतात. यामुळे अर्थातच त्यांना मागणी कमी असते आणि चीनी फटाके ४० टक्के मार्केट काबीज करतात. यासाठी बाजारात टिकून राहण्यासाठी अवैध पद्धतीने रसायनांचा उपयोग करून फटाके तयार केले जातात आणि पुन्हा एकदा खेळ सुरू होतो गोरगरिबांच्या जीवाशी. माणसाच्या सुरक्षिततेसाठी असणार्‍या कायद्यांचं पालन न करणार्‍यांवर मनुष्यावधाचे गुन्हे का लागू नयेत?



एवढ्या प्रचंड प्रमाणात होणाऱ्या या व्यवसायाला टाळं लागावं अशी आमची मागणी खचितच नाही. हा व्यवसाय कायद्याप्रमाणे आणि सर्व कामगारांची सुरक्षितता लक्षात घेऊन केला गेला तरच हा व्यवसाय तगू शकेल. अन्यथा पुढील पिढी या कामाकडे ढुंकूनही पाहणार नाही. तशी संधी खरं तर आपल्याला कोरोनाने दिली आहे. आपण फटाके वाजवले नाही तर या जीवघेण्या व्यवसायाला आळा बसेल. पण त्यासाठी तिथल्या कामगारांचं पुनर्वसन झालं पाहिजे.