मुंबई, दि. १९ नोव्हेंबर : वार्ताहर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीस ७५ वर्षे पूर्ण होत असताना, आंबेडकरी विचारांच्या महिलांसाठी एक विशेष व्यासपीठ निर्माण करणारी ‘आंबेडकरी स्त्री संघटने’ने राज्यपातळीवर पहिली मोठी ‘संविधान महोत्सव जागृती परिषद’ आयोजित केली आहे. 

ही परिषद मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईतील दादरस्थित आंबेडकर भवन येथे होणार आहे. या उपक्रमातून आंबेडकरी महिलांच्या स्वतंत्र समस्या आणि गरजा मांडताना, बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर तत्वज्ञानाच्या आधारे त्यांच्यातील आत्मसन्मानाची जाणीव जागवली जाणार आहे.

गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या या संघटनेने मुंबईत १५ हून अधिक कार्यक्रम राबवले आहेत. विविध सामाजिक-राजकीय संघटनांमध्ये सक्रिय असलेल्या आंबेडकरी महिलांना एकत्र बांधण्यासाठी हा सामायिक व्यासपीठ तयार केले गेले आहे. संघटनेच्या सुकाणू कमिटीने प्रकाशित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘जातीव्यवस्था आणि पुरुषप्रधान व्यवस्थेच्या दोन पेचात सापडलेल्या आंबेडकरी महिलांच्या स्वतंत्र प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही हे काम हाती घेतले आहे. आपल्या बंधूंसोबत काम करतानाही 'स्त्री' म्हणून आपल्या गरजा मांडणे आवश्यक आहे." या निवेदनातून स्पष्ट केले आहे की, “संघटनेचा उद्देश महिलांचा सहभाग कायम ठेवताना त्यांना 'व्यक्ती' म्हणून ओळख मिळवून देणे हा आहे.”

परिषदेच्या उद्घाटक म्हणून आंबेडकरी विचारांचे अभिनेते मिलिंद शिंदे उपस्थित राहणार असून, प्रमुख वक्ते म्हणून लेखक, विचारवंत प्रा. राम पुनियानी आणि अध्यक्षपद लेखिका, कवियत्री डॉ. प्रज्ञा दया पवार भूषविणार आहेत. संविधानाच्या ७५ वर्षांच्या वाटचालीवर चर्चा, जागृती सत्रे आणि महिलांच्या भूमिकेवर केंद्रित चर्चासत्रे या परिषदेचा भाग असतील. या उपक्रमातून राज्यभरातील आंबेडकरी महिलांना एकत्र येण्याची संधी मिळेल, ज्यामुळे पुढील काळात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम राबवता येतील.

संघटनेच्या संस्थापक प्रा. आशालता कांबळे म्हणाल्या, “आंबेडकरी चळवळीत महिलांचा सहभाग मोठा आहे, पण त्यांच्या स्वतंत्र आवाज दाबला जातो. ही परिषद त्यांना सक्षम करण्यासाठी एक पाऊल आहे. आपल्या बंधूंना सोबत घेऊन आम्ही हे यशस्वी करू.” संघटनेच्या सुकाणू समितीत नंदा कांबळे, पुष्पा धाकतोडे, शिरीन लोखंडे, डॉ. श्यामल गरुड, छाया खोब्रागडे, प्रा. डॉ. निशा शेंडे, शारदा नवले, छाया कोरेगावकर, माधुरी शिंदे, मयुरा सावी, सुरेखा पैठणे आणि वैभवी अडसूळ यांचा समावेश आहे.

या परिषदेसाठी उत्साही प्रतिसाद मिळत असून, आंबेडकरी विचारांच्या मैत्रिणींनी आणि मित्रांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. आशालता कांबळे ९९३०३७३०५३ आणि नंदाताई कांबळे ९८२०८०१८४५ यांच्याशी संपर्क साधावा. ही परिषद केवळ जागृतीच नव्हे, तर आंबेडकरी महिलांच्या सक्षमीकरणाची नवी सुरुवात ठरेल, अशी अपेक्षा आहे.