दिवाळीच्या मेजवानीत यंदा ब्लूपॅडच्या दिवाळी अंकाची खरपूस भर पडली आहे. छोटा आणि सुटसुटीत तरीही वाचकांना चौफेर अनुभूती देणारा हा अंक म्हणजे ब्लूपॅडचे पहिले पुष्प आहे यावर विश्वास बसत नाही. कलाकृती तर उत्तम आहेच पण लेखांची निवड सुद्धा चपखल आहे. वैचारिक आणि काल सुसंगत लेख, कविता आणि पुस्तक परीक्षण यांची सरमिसळ म्हणजे खमंग चिवडाच. नागेश शेवाळकर, ऋतुजा, अनिल कुलकर्णी, प्रशांत सुसर, नेहा घरत, डॉ. अमित लाड, कार्तिक देव यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या लेखांचे सुंदर रंगीबेरंगी ठिपके वाचानंदाची अप्रतिम रांगोळी साकारत जातात. तर नेहा घरत, निलेश मनपाठक, डॉ. अमित लाड, आनंदकुमार देशपांडे आणि संजय गुरव यांच्या कविता म्हणजे जणू बेसनाचे लाडू खाताना मध्येच लागून तो गोडवा मेंदूपर्यंत पोहोचवणारे मनुकेच. त्यावर दिव्यांची रोषणाई म्हणजे योगेश्वरी मुक्ता यांनी लिहिलेली पुस्तक परीक्षणं. स्त्रियांची अवहेलना होत असताना सुद्धा त्यांनी त्यावर केलेली मात आणि आपल्यासह आपल्या कुटुंबाला सुद्धा आत्मनिर्भर बनवणाऱ्या कष्टकरी आणि लढाऊ स्त्रियांच्या चित्तरकथा सांगणाऱ्या शोभना कारंथ यांच्या “उमलत्या कळ्या” आणि समाजातील वैफल्यग्रस्तांच्या जिण्याने कळवळून उठलेल्या आणि त्यांच्या उन्नयनासाठी आपले आयुष्य पणाला लावलेल्या, प्रसंगी शासनाशी दोन हात करणाऱ्या सहा मातब्बर कार्यकर्त्यांची अनिल अवचटांनी स्वत: घेतलेल्या मुलाखतीतून साकारलेल्या “कार्यरत”, या दोन पुस्तकांचे अत्यंत उत्कृष्ट परीक्षण योगेश्वरी यांनी केले आहे. ह्या सर्व लेख आणि कवितांकडे पाहिलं की लक्षात येतं की विविध वयातील लेखक कवींनी हे साहित्य लिहिलं असल्यामुळे ते सर्व वयोगटातील वाचकांसाठी पर्वणीच घेऊन आले आहेत. साहित्याची उत्कृष्ट निवड करणाऱ्या संपादकांची रसिकता सुद्धा यात फुलबाजासारखी फुलून येते.


अंकाच्या यशाचे पडद्यामागचे कलाकार म्हणजे त्याचे आर्टिस्ट. विलोभनीय रंग संगती, साध्या पण चपखल डिझाईन्स यामुळे अंक खूप चांगल्या पद्धतीने नटला आहे. चित्र निवडीचे विशेष कौतुक करायला हवे. मग ते नेहा घरत यांच्या “निसर्गा, तू अद्भुत आहेस” या कवितेत हिरवी शाल पांघरलेल्या पहाडांच्यावर पसरलेल्या निळ्या आभाळाचं चित्र असू दे, प्रशांत सुसर यांच्या “मायेची गोधडी” लेखाचं नात आणि आजीचं लोभस नातं दाखवणारं चित्र असू दे की डॉ. अमित लाड यांच्या “शून्यातून... ‘पूज्य’ जीवनाकडे” या लेखाचे खळखळून हसणाऱ्या निरागस मुलाचे चित्र असू दे, ही आणि बाकी सर्व चित्रं त्या त्या लेख आणि कवितांना पूरकच वाटतात.


ब्लूपॅडचा हा पहिला प्रयत्न त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला असला तरी अशा अंक निर्मितीत मुरलेले लोक सुद्धा काही न काही चुका करत असतात. तशाच काही उणीवा या अंकात सुद्धा आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्लूपॅडने अंकाला एक नाव देणं आवश्यक होतं. दुसरं अनुक्रमणिकेत लेखक कवींची नवे  यायला हवी होती. कदाचित ब्लूपॅडची ही स्वत:ची शैली सुद्धा असू शकेल. पण अनुक्रमणिकेत नाव पाहण्याची प्रत्येक लेखकाला आणि वाचकाला सुद्धा सवय असते, म्हणून हा मुद्दा मांडला. तिसरी आणि शेवटची गोष्ट आहे शेवटच्या पानाची. हा अंक पुस्तक परीक्षणावर संपतो. असं न होता एक मलपृष्ठ असायला हवं होतं. त्यामुळे अंकाला पूर्णत्व आलं असतं. एखादं चित्र मलपृष्ठावर टाकून शेवट करता आला असता. या सुचवलेल्या गोष्टी अगदीच लहान आहेत आणि आपला हा अंक यापुढे अधिक उत्कृष्ट व्हावा यासाठी ह्या उणीवा सांगितल्या आहेत.   


ह्या दिवाळीत आलेला हा अंक नक्कीच कोरोना काळात मनावरची काजळी पुसण्यासाठी आपल्याला मदत करेल ही सदिच्छा. पुन्हा एकदा सर्वाना दिवाळीच्या कोटी कोटी शुभेच्छा.

हा दिवाळी अंक खालील लिंक वर उपलब्ध आहे.

https://bluepad-docs.s3.ap-south-1.amazonaws.com/Diwali+Magazine.pdf


- विनिशा धामणकर