जरी संकटाची काळरात होती

तरी भीमराया तुझी साथ होती.

तुझी तेवण्याची सुरूवात होती,

प्रकाशात माझी पिढी न्हात होती

वामनदादा कर्डक यांचे हे शब्द नुसते शब्द नाहीत तर ते एक असे वास्तव आहे ज्याकडे बघून सर्व विश्व अचंबित होतं. चैत्यभूमीच्या विशाल प्रांगणात दरवर्षी जमणारा लाखोंचा जत्था काही मागण्यासाठी नाही तर केवळ एका व्यक्तीपायी ऋण व्यक्त करण्यासाठी येतो. ती व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. यावर्षी कोविड-१९ च्या कारणाने शासन, नेते आणि सर्व संघटनांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व अनुयायांनी आपल्या घरातूनच महामानवाला मानवंदना दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन ही खुली किताब आहे. पण त्यांचं कार्य हे इतकं विपुल, सर्वस्पर्शी, सर्वव्यापक असून सुद्धा अनेकांना त्याविषयी माहिती नाही ही फार मोठी खेदाची बाब आहे. बाबासाहेबांना एका जातीपुरतं मर्यादित ठेवण्यात आलं, त्यांना दलितांचे कैवारी, भाग्यविधाते, उद्धारकर्ते अशा अनेक विशेषणांनी बांधून ठेवलं गेलं. दलितांवर तर त्यांचे अनंत उपकार आहेतच. म्हणूनच तर एका अरबी समुद्रासमोर त्याला लाजवील असा आंबेडकरी अनुयायांचा जनसागर दरवर्षी उसळतो. अर्थात याला नावं ठेवणारा वर्ग सुद्धा आहे. अशी हेटाळणी करणाऱ्यांना माहित सुद्धा नसतं की एवढा मोठा जनसमुदाय हा कसला नवस करण्यासाठी नाही तर फक्त बाबासाहेबांच्या पायी नतमस्तक होण्यासाठी आणि वैचारिक अधिष्टान पक्क करणारी पुस्तकं घेण्यासाठी येत असतो. त्यांना संशोधनातून सिद्ध झालेली एक गोष्ट माहित नसेल की मराठी साहित्य संमेलनापेक्षा जास्त पुस्तकांची विक्री चैत्यभूमीवर एका दिवसात होते. गावोगावाहून जे लोक मुंबईत येतात त्यांनी वर्षभरात इथे तिथे वाचलेल्या लेखांमध्ये संदर्भ म्हणून दिलेल्या पुस्तकांची यादी केलेई असते. ती यादी घेऊन ते चैत्यभूमी वरून काही अंतरावर असलेल्या शिवाजी पार्कात लागलेल्या पुस्तकांच्या मेळाव्यात येतात आणि पुस्तके घेतात. राजा ढाले आणि . वि. पवार यांनी डिसेंबर १९७३ रोजी आपली स्वत:ची दोन/ दोन पुस्तकं आणि नामदेव ढासळ आणि इतर मित्रांची काही पुस्तकं घेऊन दादर चौपाटीवर पथारी मांडून ती पुस्तकं विकायला सुरुवात केली होती. त्या एका सुरुवातीच्या थेंबाचा आज सागर बनला आहे आणि याची दखल संपूर्ण जगात घेतली जाते. पण मुंबईतील लोकांना मात्र या सगळ्यामध्ये फक्तअस्वच्छता दिसते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पददलितांचे जसे नेते होते तसेच ते भारताचे राष्ट्रनिर्माते होते. त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे भारताचे संविधान. त्यांना संविधानाचे शिल्पकार म्हणण्याला सुद्धा अनेकांचा विरोध असतो आणि त्यासाठी कारणं दिली जातात ती म्हणजे संविधानाची वाच्यता १९२० पासूनच सुरु झाली होती आणि मसुदा समितीत इतर सहा लोक होते, मग बाबासाहेब एकटेच संविधानाचे शिल्पकार कसे? ह्या गोष्ठी अगदी रास्त आहेत. पण १९२० पासून म्हणजे ती कशाची सुरुवात होती. त्याला कोणकोणती वळणं आली, कोणाकोणाची काय काय मतं मतांतरे होती याविषयी बोलणाऱ्याना माहित असतं का? संविधान समितीची, मसुदा समितीची स्थापना कशी झाली? कोण होते बाकीचे सहा सन्मानीय सदस्य? मग ते कुठे गेले? याची उत्तरे आपण शोधण्याचा प्रयत्न करतो का? नाही. इथे जागेअभावी मी नावं आणि कारणं देत नाही. ही सर्व माहिती, श्याम बेनेगलांनी केलेलीसंविधानमालिका, चित्रपट, पुस्तकं यात उपलब्ध आहे. या सर्वांचं अवलोकन वाचकांनी करावं. बाबासाहेब ही एक व्यसन लावणारी व्यक्ती कशी आहे ते त्यांचे कार्य, लिखाण, वर्तमानपत्र, भाषणं ही नुसती नजरे खालून घातली तरी त्याची कल्पना सुजाणांना येईल. आपल्या घरात धार्मिक ग्रंथ असतात, पण आपल्याला भारताचे नागरिक म्हणून कोणते अधिकार आहेत हे सांगणारे संविधान असते का? नसेल तर ते आता तरी विकत घ्या.   

बाबासाहेबांना राष्ट्रनिर्माते म्हटलं जातं कारण त्यांच्याThe Problem of the Rupee: Its Origin and Its Solutionह्या पुस्तकाच्या आधाराने रिजर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.ते कामगार मंत्री असताना दोन महत्त्वाच्या संस्था उभारल्या, एक केंदीय जलमार्ग, सिंचन आणि जलवाहतूक आयोग, तर दुसरं केंद्रीय उर्जा मंडळ. भारतातील नद्यांमधून होणाऱ्या जलवाहतूकीचे ते प्रवर्तक होते.  याशिवाय दामोदर आणि हिराकुंड धरण हे बाबासाहेबांच्या दूरदृष्टी आणि कल्पकतेतून साकारले आहेत.

बाबासाहेबांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला तो हिंदू स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांवर अंकुश ठेवू शकेल असं हिंदू कोड बिल संमत झालं नाही म्हणून, पण त्याच सर्व गोष्टीं कमी अधिक फरकाने कालौघात संमत झाल्या आणि स्त्रियांना त्यांचे फायदे मिळाले. काही गोष्टीना बाबासाहेबांनी संविधानातच नमूद करून ठेवले आहे. उदाहरणार्थ संविधानाचे कलम ४२ वाचा. “कामाच्या ठिकाणी रास्त आणि मानवी परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य यांची तरतूद.” स्त्रियांना मिळणारी प्रसूतीची भरपगारी रजा ही ह्या कलमामुळे आहे. कामाचे तास हा नियम सुद्धा कामगार मंत्री असताना बाबासाहेबांनी सुरु केला आहे. यापेक्षा अधिक बाबासाहेबांना देशाचे नेते म्हणवून घेण्यासाठी आणखी काय हवं?

आपल्या संविधानाचा शिल्पकार हा कोलंबिया विद्यापीठातील २००४ साली मागील १०० वर्षातील एकमेव विद्वान विद्यार्थी म्हणून गणला जातो. नंतर त्यांच्या पुतळ्याची स्थापना होते आणि त्याच्या स्वत:च्या देशातील वर्तमानपत्रे बोटभर बातमी द्यायला सुद्धा कचरतात. आता तरी या महामानवाला दुर्लक्षित ठेवू नका. त्यांच्या माहितीची पडताळणी करायला तुम्हाला ग्रंथालयात जाण्याची गरज नाही. मोबाईलच्या एका क्लिकच्या पलीकडे तो ज्ञानाचा समुद्र आहे. ज्यांच्या पायाशी शेकडो महाकाव्ये गळून पडावीत असे हे व्यक्तिमत्त्व आपल्या आयुष्याला सुद्धा पैलू पाडेल. आज त्यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना त्रिवार अभिवादन.