शाळेत आमच्या वर्गात एक गुणवंत नावाचा मुलगा होता, प्रचंड मस्तीखोर.
बाईसुद्धा त्याला विशिष्ट हेल काढून “गुणवंऽऽऽत, अरे आईवडिलांनी एवढं सुंदर नाव ठेवलंय, त्या नावासारखं वाग जरा,” असा टोला हाणायच्या. आज त्याची आठवण आली त्याला कारण ठरली ती आपल्या आसपासची हॉटेल्स आणि बंगल्यांची नावं. हॉटेल्सची नावं म्हणजे द विलेज, द धाबा, सागर किनारा, बंजारा. तर बंगल्यांची नावं आहेत पर्णकुटी, हिरवाई, वनराई इत्यादी. ही नावं म्हणे तुम्हाला गावाचा “फील” देतात. ही नावं मला गुणवंतासारखी भासतात! अशी हॉटेल्स आणि बंगले, इमारती आतून पाहिल्या तर त्या खरंच हिरव्या, करड्या, तांबूस अशा निसर्गाचा “फील” देणाऱ्या रंगात रंगवलेल्या असतात. मुळात त्या हिरवाईचं जतन करणाऱ्या शेतकरी किंवा गावकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊनच बांधलेल्या असतात. म्हणजे मुळचे रंग जाऊन तिथे हे दिखाऊ रंग आलेले असतात इतकंच. पण शहरातल्या लोकांना ओढ असते गावाची, हिरव्या गार निसर्गाची. अशा हौशींसाठी नैसर्गिक नाही तर एसीच्या गारव्याच्या सान्निध्यात असा “फील” देण्यासाठी अशी हॉटेल्स उभी केली जातात.
आपलं सगळं काही आता “फील” करण्यावर येऊन ठेपलं आहे. ओरिजिनल काहीही नाही. सगळं काही डुप्लिकेट. वरपांगी. सुपरफ़िशिअल. किंबहुना ओरिजिनल काय होतं हे सुद्धा आपल्याला माहित नाही. हे आत्ता नाही जेंव्हा आपण आभासी जगात वावरत आहोत तर हे फार फार आधीपासून सुरु झालं आहे.
“आमच्या वेळी असं काही नव्हतं” हे वाक्य बहुधा सर्वच पिढ्यांना मागच्या पिढीच्या लोकांकडून ऐकावं लागतं. ह्या “आमच्या वेळी असं नव्हतं”चे दोन अर्थ निघतात. एक म्हणजे आजचं जग कालच्यापेक्षा फारच प्रगत झालं आहे, जवळ आलं आहे आणि चुटकीसरशी कामं होतात. तर दुसरा अर्थ आहे माणूस माणसाला, प्रेमाला, आपलेपणाला, सौहार्दालाच नाही तर सहज मिळणाऱ्या अन्नाला आणि खळखळून हसण्याला पारखा झाला आहे. ही दरी पिढ्या पिढ्यांनी वाढत गेली आणि आज माणूस अशा अवस्थेवर पोहोचला आहे की आता फक्त “माणूसपणाचे” मेसेजेस रोज गुड मॉर्निंग आणि गुड नाईट करताना वाचत असतो. आणि तेच मेसेजेस कधी एखाद्याला धीर देण्यासाठी तर कधी कोणाला डिवचण्यासाठी फॉरवर्ड करत असतो. अशी नाती सगळी बोटाच्या टोकावर वर येऊन ठेपली आहेत. माध्यमांमुळे संपर्क वाढला. पण ज्याला टाळायचं त्याला सहज टाळण्यासाठीसुद्धा हीच माध्यमं क्लृप्त्या काढत असतात. उदा. एखादा माणूस आपल्या सहकाऱ्यांचा त्रास नको म्हणून ‘लास्ट सीन’ आणि ‘ब्ल्यूटीक’ सारखे ऑप्शन्स “डिसॅबल” करून ठेवतो. मग त्याच्या आईला, बायकोला आणि प्रेयसीला सुद्धा तो “दिसेबल” होईपर्यंत चैन पडत नाही. हेच बाप, भाऊ, नवरा, प्रियकर यांच्या बाबतीतही घडतं जेव्हा एखादी स्त्री असंच वागते. याला काय डोंबलं जग जवळ आलंय म्हणायचं! हे आभासी जग तुम्हाला तुम्ही या जगाचा एक हिस्सा आहात एवढाच काय तो “फील” देतं. खरा आनंद तुम्ही “दिसेबल” होता तेंव्हाच मिळतो.
ह्या आभासी जगात रमण्याच्या आपल्या “गुणांचा” सगळ्यात जास्त फायदा होतो तो व्यावसायिकांना. तुम्ही पेपरमध्ये येणाऱ्या घरांच्या जाहिराती वाचा. निसर्गाच्या सान्निध्यात, समुद्राच्या जवळ किंवा अमुक नदीच्या जवळ असं हे टुमदार घर फुल्ली फर्निश्ड आहे, घरात एसी इनबिल्ट आहे, इंटरकॉमची व्यवस्था आहे, स्विमिंग पूल, बॅडमिंटन कोर्ट, पाणी चोवीस तास अशा एक ना अनेक सुविधा आहेत अशी ती जाहिरात असते. जणू काही तिथल्या माणसाला कसली ददातच उरणार नाही. आपल्या पैकी अनेक लोक अशा घरात रहात असाल. मी ही एकेकाळी तसं स्वप्न पाहिलं. सोयी सुविधा असलेल्या परिसरात घर असावं, दमून भागून घरी आलो की थकवा घालवणारी बाल्कनी असावी अशी इच्छा असणं वाईट नाही. पण आपण त्या निसर्गावर किती अन्याय करतो आपल्या या “गुणांनी” याचा थोडासा विचार केला तर एसी इमारतीच्या आवारात विदेशी झाडांची लागवड कल्पकतेने करून रचून केलेल्या गार्डनपेक्षा गावातल्या खऱ्याखुऱ्या लाल काळ्या मातीची सय आल्याखेरीज राहणार नाही. सर्वच नाहीत पण अनेक जाहिरातीतील घरं ही त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या पिकाखालच्या जमिनी कधी बळजबरीने तरी कधी नोकरी आणि पैशाचं अमिष दाखवून विकायला लावून त्यावर बांधलेली असतात. आपल्याला कल्पनाही करता येणार नाही की जमीन विकताना त्यांची काय अवस्था झाली असेल. आपल्याही मूळ गावी आपली घरं असतील. तिथे जर एखादा एन्रोन, लवासा किंवा समृद्धी महामार्ग सारखा प्रकल्प आला तर आपला निर्णय काय असेल याचा एकदा विचार आपण केला पाहिजे.
अजून आपल्याकडे ओरिजिनल किंवा ज्याला इंग्रजीत इंडीजिनस म्हणतो ते देशीपण टिकून आहे. अजून आपण पूर्णपणे हायब्रीड झालो नाहीत तोवर ह्या आपल्या मुळांकडे वळूया. निसर्गाने दिलेल्या संसाधनांचा यथोचित वापर करूया. प्रत्येक हाताला काम मिळू द्या, प्रत्येकाला सन्मानाने जगता येईल असं वातावरण तयार करूया. जातीपाती इतर प्राण्यात नाहीत. आपल्यात तरी त्या कशाला हव्यात? प्लास्टिक, फुकटचा चकचकाट, दारू, तंबाखू, गुटखा, महागड्या गाड्या आणि अमाप पैसा ह्या गोष्टी मुलभूत गरजांमध्ये कशाला यायला हव्यात? ह्या सर्व मानवनिर्मित गोष्टींना “डिसॅबल” करूया आणि माणूसपण “दिसेबल” करूया.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.