गेल्या वर्षभरात कोविड १९ मुळे संपूर्ण जगातील नोकरी, व्यवसाय आणि उद्योग धंद्यांची वाताहात झालेली असताना काही तरुण मुली अशा आहेत ज्यांनी यात सुद्धा संधी पहिली आणि ती प्रत्यक्षात आणली आहे. केवळ १८ वर्षाची हर्षा रवीन्द्रन ही मुलगी StartMyName.com या वेबसाईट डिजाइन करणाऱ्या, ते मेंटेन करणाऱ्या कंपनीची मालकीण आहे. तिने ४ देशातील किमान ४०० ग्राहकांसाठी वेबसाईट बनवल्या आहेत. मुळची भारतीय पण संपूर्ण बालपण मलेशियात गेलेली हर्षा रवीन्द्रन ही मुलगी वयाच्या ११ व्या वर्षापासून विविध क्षेत्रात स्टार्ट अप सुरु केलेल्या लोकांची व्याख्याने ऐकत होती आणि आपण ही असंच काही तरी करायचं हे तिने ठामपणे ठरवून टाकलं होतं. त्याप्रमाणे तिने १७ व्या वर्षी आपली ही वेबसाईट सुरु केली आणि दिवस रात्र मेहनत करून तिने आपलं नाव कमावलं. अनुभवांचं गाठोडं तिच्याकडे होतंच त्यामुळे अनेक स्तरातून तिला व्याख्यानांची मागणी येत होती. मग तिने टेड एक्स सारख्या कार्यक्रमातून प्रेरणादायक व्याख्याने द्यायला सुरुवात केली आणि आताच्या कोरोनाच्या महामारीमध्ये तरुणांमध्ये लोप पावलेला उत्साह पुन्हा परत आणण्यासाठी तिने अनेक लोकांच्या सांगण्यावरून The Makings of a Teenage Entrepreneur हे पुस्तक लिहिलं.
हर्षा रवीन्द्रन |
या पुस्तकात तिने आपले सर्व अनुभव लिहिले आहेत. त्यात टेड एक्सच्या कार्यक्रमात जेंव्हा तिला बोलावलं गेलं तेंव्हा तिची मनोवस्था काय होती, तिने ते व्याख्यान कसं दिलं, तिला पेनसिल्वेनियाच्या विद्यापीठात प्रवेश कसा मिळाला आणि ती आपल्या ४०० ग्राहकांपर्यंत कशी पोहोचली, त्यांची मानसिकता तिने कशी ओळखली, स्वत:ची टीम तिने कशी बनवली याची सर्व माहिती तिने दिली आहे.
मलेशियातील Ascendance या सामाजिक आणि तरुणांच्या चळवळीची हर्षा सहसंस्थापक आहे. ही संस्था विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न करते. यात हवामान बदल, शिक्षण, आरोग्य आणि गरिबी या समस्यांचा सामना कसा करायचा याविषयी मार्गदर्शन करते.
अशीच एक १९ वर्षीय मलेशियाची मुलगी आहे गॅबी टॅन. स्टॅंडफोर्ड विद्यापीठाची विद्यार्थिनी आणि एक पर्यावरणप्रेमी आणि प्रशिक्षक. पर्यावरणाविषयीच्या अनेक बाबतीत लोक अनभिज्ञ असतात त्यामुळे नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचतो. गॅबी Tideturners नावाच्या एका संस्थेसोबत काम करत होती जी पर्यावरणाविषयी लोकांना जागृत करते आणि पर्यावरणाच्या बचावात युवकांना जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करते. गॅबीचं हे काम अजूनही सुरु आहे.
गॅबी टॅन |
ट्रेसी राबी ही टांझानियातील केवळ ११ वर्षांची मुलगी Kids Finance With Tracy या आर्थिक आणि व्यावासायिक शिक्षण देणाऱ्या संस्थेची मालकीण आहे. ती आफ्रिकेतील आठ ते सतरा वयोगटातील मुलांना आपल्या स्वत:च्या पुस्तकातून मार्गदर्शन करते. एवढंच नाही तर ती टेड एक्सच्या कार्यक्रमात व्याख्याने देते आणि मुलांसाठी उन्हाळी शिबिरं भरवते आणि ऑनलाईन कन्टेन्ट सुद्धा तयार करते.
ट्रेसी राबी |
हर्षा आणि गॅबी ह्या मुली सध्या सर्वात कळीचा मुद्दा बनलेल्या पर्यावरण या विषयावर फार जोमाने काम करीत आहेत तर ट्रेसी ही पुढे येऊ घातलेल्या आर्थिक संकटासाठी आपल्या पिढीला तयार करीत आहे. ह्या छोट्या मूर्त्यांच्या मोठ्या कार्याला सलाम....
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.