छंद म्हणजे एखाद्या गोष्टीची आवड असणे. मला वाचायला आवडतं, लिहायला आवडतं. गाणी म्हणायला, नाचायला, वेगवेगळे पदार्थ बनवायला, गिटार वाजवायला आवडतं हे म्हणजे छंद. हाच छंद जेंव्हा वाढीस लागतो आणि त्याच्या पलीकडे आपल्या आयुष्यात बाकीच्या गोष्टी थिट्या वाटू लागतात तेंव्हा तो व्यासंग बनतो. जेंव्हा छंद व्यासंग बनतो तेंव्हा त्याला परीपुर्तीची एक निश्चित दिशा मिळते. त्याचं पर्यवसान यशात होण्यासाठी व्यासंगी माणूस जंग जंग पछाडतो. त्या क्षेत्रात त्याने नाव कमावलं तर इतरांसाठी तो एक आदर्श ठरतो आणि मागून येणाऱ्यांचा मार्गही प्रशस्त करतो.
आपल्या छंदामुळे आपल्याला कमाई करता येईल की नाही या विचाराने अनेक जण आपल्या छंदाचा व्यावहारिक किंवा व्यावासायिक विचार करीत नाहीत. कारण काहींनी आपली आयुष्ये या छंदांना देऊन सुद्धा
त्यांच्या हाती लोकप्रियतेपेक्षा अधिक काही पडलं नाही. बाल गन्धर्वांपासून ग्रेस पर्यंत सर्वच कलेच्या पुजाऱ्यांना अखेरचे दिवस हे हलाखीत काढावे लागले. त्यांच्याकडे बघूनच अनेक जण कलेचा धसकाच घेतात. आपली कला दाबून टाकतात आणि कधी तरी आपल्या नातेवाईक आणि मित्रांसमोर प्रदर्शित करण्यासाठी राखून ठेवतात. पण कला ही तलवारी सारखी असते. जर तिचा उपयोग केला नाही तर ती गंजते. एखाद्या गायकाने अनेक दिवस गाणं गायलंच नाही तर बऱ्याच दिवसांनी तो पहिल्यांदा गायला बसेल तेंव्हा त्याला हवे असणारे सूर निघणारच नाहीत. त्यामुळे कलेला नदीप्रमाणे सतत वाहतं ठेवलं पाहिजे नाहीतर तिचा नाला बनतो.
आजचे दिवस मात्र वेगळे आहेत. आज अनेकांनी उच्च विद्या घेतल्या नंतर आपल्या कलेकडे वळले आणि त्यांच्या उच्च विद्येने नाही तर त्यांच्या कलेने त्यांना नावारूपाला आणलं आहे. डॉ. निलेश साबळेच पहा, तो आयुर्वेदिक डॉक्टर आहे पण त्याने विनोदाची वाट चोखाळली आणि आज तो अखंड महाराष्ट्राला हसण्याचं टॉनिक देत आहे. पुण्यात इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर झालेला आणि पुढे अमेरिकेच्या सँटा क्लारा विद्यापीठातून इंजिनिअरिंग मॅनॅजमेण्टमध्ये मास्टर्स केलेल्या महेश काळेला त्याच्या या गुणवत्तेसाठी कोण ओळखतो? पण तेच “अरुणी किरणी धरणी गगन चमके, भ्रमीत भ्रमर करी गुंजन हलके” एवढं जरी म्हटलं तरी हाच तो “कट्यार काळजात घुसली”चा तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेला गायक म्हणत लोक त्याची वाहवा करतात. निलेश आणि महेश प्रमाणे कित्येक लोक आहेत ज्यांनी आपल्या व्यवसायात न रमता आपला आतला आवाज ऐकला आणि त्यांनी कलेच्या क्षेत्रात पाउल टाकलं आणि ते क्षेत्र यशस्वी रित्या पादाक्रांतही केलं. याला कारण होतं त्यांच्यातील व्यासंग. व्यासंग तुम्हाला स्थिर होऊ देत नाही. व्यासंग तुम्हाला एका यशाने समाधानी करत नाही. व्यासंग हा क्षितिजा सारखा असतो. तो फक्त वाढत जातो. समुद्रा प्रमाणे खळाळत राहतो.
व्यसन मात्र या दोघांपेक्षा निराळा. हा शब्द आपल्याला दारू, सिगारेट, गुटखा, पान, तंबाखू याच गोष्टींची आठवण करून देतो कारण आपल्या संपूर्ण समाजाने याचे परिणाम भोगलेले आहेत. व्यासंगाने माणूस जसा झपाटलेला असतो तसच व्यसनाने सुद्धा. त्यात फरक विवेकबुद्धीचा असतो एवढंच. व्यासंग स्वत:चा सर्वतोपरी फायदा करून देतो तर व्यसन दुसऱ्याचा फायदा आणि स्वत:चे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कौटुंबिक नुकसानच करत जातो. व्यासंगी माणूस आधी स्वत:चा आणि कुटुंबाचा विचार करतो. व्यसनी माणसाला स्वत:चा विचारच नाही तर शुद्ध सुद्धा नसते.
खरं तर आपलं शरीर हलकं होऊन शांत होण्यासाठी अल्कोहोलची गरज असते. तुम्ही काही औषधांच्या बाटलीवर कन्टेन्ट पहिले तर त्यावर अल्कोहोलचं प्रमाण दिलेलं असतं. अल्कोहोल हे एक प्रकारचं पेन किलर किंवा सिडेटिव्ह असतं. त्या औषधात ते तेवढ्याच प्रमाणात असतं जेवढ्याची आपल्याला गरज असते. अनेकदा आपण औषध घेतलं की गाढ झोप लागते ती ह्यातील अल्कोहोल मुळेच. एवढंच नाही तर आपण खातो त्या भातामध्ये सुद्धा अल्कोहोल असतं. तांदळाप्रमाणे प्रमाण कमी जास्त असेल. याचसाठी अनेक लोक दुपारचं जेवण झालं की एक वामकुक्षी घेतात. तर अनेक लोक दुपारी काम करायचं असेल तर भात खाणं टाळतात. भातात किंवा इतर पदार्थातून मिळतं तेवढं अल्कोहोल आपल्या शरीरासाठी पुरेसं असतं. विनाकारण त्याला बाहेरून आणखी देण्याची गरज नसते. जे लोक विकत घेऊन आणि घरादाराची रांगोळी करून असे ज्यादाचे डोस घेतात त्यांचं शारीरिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्थैर्य डगमगायला लागलंच म्हणून समजा. सध्याच्या जागतिक संकटाच्या काळात ज्यांना अर्थव्यवस्थेचा कणा म्हटलं गेलं आहे ते सर्व कणे असे लडबडायला लागले तर शासनाला चालेल का? आर्थिक पुंजी कोणत्या मार्गाने वाढवावी हे सुद्धा सरकारला कळू नये?
ऑक्सिजन ज्याप्रमाणे श्वासावाटे जाऊन मेंदूला रक्त पुरवठा करतो त्यामुळे आपली विचार करण्याची शक्ती चांगली राहते; तशी दारू पिणाऱ्या माणसाच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा पुरेसं न झाल्यामुळे त्याच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो. बाह्य अवयव म्हणजेच हात, पाय, तोंड, डोळे यांच्यावर त्यांचं नियंत्रण रहात नाही. सर्व शरीरावर नियंत्रण ठेवणाऱ्या थॅलॅमाईन म्हणजे बी1 या विटामिनची कमतरता निर्माण होते. ही अवस्था अधिक काळ राहिली तर त्यांना गंभीर आजार उद्भवू शकतात.
व्यसनी माणूस मग तो कितीही शिक्षित असू दे, त्याला योग्य काय अयोग्य काय याचं तारतम्य रहात नाही. गुटख्यासारखे बंदी असलेले पदार्थ सुद्धा तो अधिक पैशाना विकत घेतो. यामुळे काळाबाजार करणाऱ्यांचं फावतं. पोलीस जेंव्हा काळाबाजार करणाऱ्यांना पकडतात तेंव्हा त्यांनी हा काळाबाजार करणाऱ्या मूळ लोकांना सुद्धा तंबी दिली पाहिजे. विकत घेणारे असतात म्हणून विकणारे असतात. कारण व्यवसायाचा मुख्य उद्देश समाजाच्या गरजा पैसे घेऊन भागवणं हा आहे. विकणारा काय आणि विकत घेणारा काय. आपण बेकायदेशीर काम करीत आहोत याची जाणीव प्रत्येकाला असलीच पाहिजे.
थोडक्यात, छंद आणि व्यासंग असणारे लोक समजाला घडवतात तर व्यसन असणारे लोक आपल्या कुटुंबाला, समाजाला आपल्या देशाला हळू हळू बुडवत असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.