आफ्रिकन बायोलॉजीक्स अँड वॅक्सीन्स आणि बायोवॅकला मिळणार संधी


आफ्रिकेत आजवर १८,०६,००० कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ५९,२५८ लोकांचा मृत्यू झाला आहे.आता तिथे कोरोना संकटाची तिसरी लाट येऊ घातली आहे. आजवर दक्षिण आफ्रिकेत साधारण ४० टक्के लसीकरण झालं आहे. अशात कोरोनाचा प्रभाव कमी करण्यसाठी बाहेरून आणलेल्या लशी रुग्णांना दिल्या जात आहेत. विकसनशील देशांना टेक्नोलॉजी ट्रान्स्फर अंतर्गत लस निर्मितीत स्वायत्तता देण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या उपक्रमात दक्षिण आफ्रिकेला ही संधी मिळाली आहे. यात आफ्रिकेच्या केपटाऊन मधील आफ्रिजन बायोलॉजीक्स अँड वॅक्सीन्स ह्या कंपनीला कोरोना वरील लस निर्मितीची संधी मिळणार आहे. त्यांना ही लस बायोवॅक ह्या सरकारी बायो फार्मास्युटीकल कंपनी सोबत तयार करायची आहे. यामध्ये आधीच उपलब्ध झालेल्या आणि यशस्वी चाचण्या झालेल्या लशींच्या टेक्नोलॉजी ट्रान्स्फर करून त्यांची निर्मिती उपरोक्त कंपन्यांना मिळणार आहे.  ह्या कंपन्या फायझर आणि मोडर्ना सारख्या एमआरएनए सीरमची निर्मिती करतील. ह्या दोन्ही कंपन्या मिळून दक्षिण आफ्रिकेतील इतर फार्माकंपन्या, वैद्यकीय महाविद्यालये आणि आफ्रिका सेन्टर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेन्शन या संस्थांमधील तज्ञांना प्रशिक्षित करतील.



दक्षिण आफ्रिकेत १७ फेब्रुवारी २०२१ रोजी लसीकरणाला सुरुवात झाली. यात जॉन्सन अँड जॉन्सन, फायझरबायो एन टेक आणि ऑक्सफर्ड-अस्ट्राझेनेका या लशी दिल्या जात होत्या. पण नवीन बीटा वॅरीयंटशी झगडण्यात अपयशी ठरत आहे असं तिथल्या आरोग्य विभागाचं म्हणणं आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेत अँड जॉन्सन, फायझरबायो एन टेक आणि ऑक्सफर्ड-अस्ट्राझेनेका या लशीसोबत स्पुटनिक वी, मॉडर्ना, सायनोफार्म, कोरोनावॅक, कोवॅक्सीन, कोवीवॅक, नोव्हावॅक्स, इम्युनिटी बायो या कंपन्यांच्या लशींच्या ट्रायल सुरु आहेत. यात काहींची बीटा वॅरीयंटशी लढण्याची क्षमता कमी आहे तर काहींची परिणामकारकता पहिल्या वॅरीयंटच्या मानाने फारच कमी आहे. काहींची क्षमता चांगली आहे पण त्याचा पुरवठा पुरेसा नाही



आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेच्याकोवॅक्सउपक्रमाच्या अंतर्गत दक्षिण आफ्रिकेतील लोकांना भारत बायोटेकची कोवॅक्सीन दिली जात होती. पण आता भारतातच कोवॅक्सीनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाल्यावर ह्या लशीची निर्यात थांबवली गेली. या सगळ्या प्रकारामुळे गरजू देशांनाच लस निर्मितीसाठी परवानगी देण्याशिवाय काही गत्यंतर उरलं नाही. याच उपक्रमात केप टाऊन स्थित आफ्रिजन बायोलॉजीक्स अँड वॅक्सीन्स आणि बायोवॅकला लस निर्मितीची संधी दिली जाणार आहे. “हे एक ऐतिहासिक पाऊल आहे,” या शब्दात दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामाफोसा यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.