निबरांच्या राज्यात निर्भीडपणे राहून सुद्धा

स्वत:चा नेटकेपणा शाबूत ठेवणारी तू ....

निष्कपट, निश्चयी आणि निष्पाप

निर्जल नेत्रात नद्या साठवणारी तू ...

निर्ढावलेले नशेखोर तुझी पायरी चढतात

निचरा करतात भावनांचा तुझ्याच

निश्चेष्ट बाहुपाशात

तरीही....

निगरगट्ट, निलाजरी, निंदनीयही तूच ठरतेस

निष्कलंक ठरवणाऱ्यांच्या नैतिकतेच्या व्याख्येत

निदान आता तरी नाद सोड हा

आपल्याच अस्तित्वाला

निर्माल्य करण्याचा....

निरस आयुष्याला पुन्हा निर्मळ कर सखे....

निळ्या नभी घे भरारी नव आकांक्षेने

निवडुंगही बहरतो थोड्या निश्चयाने

निरामय आयुष्याची ओढ कायम ठेव

आणि....

नितळ रहा, झरझर वाहणाऱ्या निर्झरासारखी....

-         अंजेला पवार