‘पांघरुण’ या चित्रपटाची जाहिरात टीवी वर पहिल्यांदा पाहिली तेव्हाच हा चित्रपट पाहण्याची इच्छा झाली होती.
कारण होती त्याची टॅग लाईन 'दशकातून एकदाच होते अशी कलाकृती.” अशा दशकातून एकदाच होणाऱ्या कलाकृतीला नाही कसं म्हणायचं! मग त्याचे दिग्दर्शक महेश मांजरेकर आहेत म्हटल्यावर जरा शंका आली. पहायचा का? खरंच काही चांगलं असेल का? यावर मन दोलायमान झालं होतं. ‘पुष्पा’ सुद्धा अशाच दोलायमान अवस्थेत पहायचा राहिला होता. एक तर मुळचा दक्षिणेतला सिनेमा, अनाकलनीय मारधाड तर असणारच. पण यातच रक्तचंदनाचा व्यापार पाहायला मिळेल. काही अप्रिय गोष्टींमुळे काही खरोखर आवशयक माहिती सुटता कामा नये हा पूर्वीपासूनच होरा असल्यामुळे आणि ‘पुष्पाची’ आता थिएटर मधून गच्छंतीची वेळ जवळ आली होती म्हणून तो पाहून घेतला. कसा वाटला? हा प्रश्न असेलच. तर ठीक वाटला. ‘दक्षिणे’चाच वाटला. रक्तचंदनाच्या तस्करीची आवश्यक माहिती मिळाली. पण तो वाल्या कोळ्याच्या पत्नीला वाल्या कोळ्याने विचारलेला आदिम प्रश्न मला पडला. पुष्पाची आई आणि त्याची प्रेयसी त्याच्या पापात वाटेकरी होणार का? चित्रपटात तरी याचं उत्तर ‘होणार’ असंच मिळत होतं. असू दे. ज्याचा त्याचा विठोबा आणि ज्याची त्याची विठाई. गाणी चांगली असली तरी ती मोबाईलवर अनेकदा ऐकल्या आणि पाहिल्यामुळे मोठ्या स्क्रीन वर पहिली एवढंच. गेल्या दहा वर्षा पूर्वी पर्यंत एखाद्या सिनेमाच्या गाण्यावरून चित्रपटाची क्रेझ निर्माण व्हायची पण आता हौशी इंस्टावाल्यांनी त्या गाण्यांच्या उत्सुकतेतील हवा काढून टाकली आहे. असो.
तर माझा विषय हा त्यातील स्त्रियांचा आहे. पुष्पातील मुख्य स्त्री व्यक्तिरेखा आहेत मोजून तीन. एक पुष्पाची आई, दुसरी प्रेयसी श्रीवल्ली आणि तिसरी आहे दक्षा जी एका रक्तचंदन माफियाची बायको आहे. आणि ह्या तिघीही ह्या मोठ्या सिंडीकेटला एक प्रकारे पाठींबा देतात. दक्षाचं ठीक आहे, ती आहेच एका खलनायक असलेल्या माणसाची बायको. सतत पानाचा तोबरा तोंडात भरून असलेली. पण पुष्पाची आई तर गरीब घरातली, श्रीवल्ली सुद्धा गरीबाची मुलगी. ह्या दोघी एकदाही पुष्पाला त्याच्या कामावरून हटकत नाहीत. जणू काही तो एक फार मोठं लोकांच्या भल्याचं काम करत आहे असं त्या वावरत असतात. याशिवाय या दोघी स्त्रीचं तेच ते दुय्यम रूप दाखवत असतात. दुय्यम म्हणजे स्त्री ही फक्त सेक्ससाठी वापरली जाते अशाच संपूर्ण चित्रपटात दिसतात. आधी तर पुष्पाच्या वडिलांनी दुसरं लग्न करून पुष्पाच्या आईच्या पोटी हे फळ दिलेलं असतं त्यामुळे पुष्पाला त्याच्या पित्याच्या पहिल्या पत्नीचा मुलगा नजरेसमोर धरत नाही. त्याला लहानपणी शिकू देत नाही. परिणामी पुष्पा अडाणी राहतो. पुष्पाला त्याची लायकी दाखवण्यासाठी तो अनौरस असल्याचा शिक्का त्याला सबंध चित्रपटात मारला जातो आणि त्यावेळी रडण्यासाठी ‘आई’ नावाची व्यक्तिरेखा असतेच.
श्रीवल्लीचं प्रकरण तर वेगळंच. “ही श्रीवल्ली डोक्यावर पडली होती काय रे झंप्या?” असा प्रश्न मलाच विचारून मी थिएटरमधल्या खुर्चीच्या हाताचं कवर नखाने जोरात खरवडलं होतं. ती हजार रुपयांच्या बदल्यात पुष्पाला स्माईल काय देते आणि मग पाच हजार रुपयांच्या बदल्यात किस द्यायला काय तयार होते! कमालच आहे! हां, आता नंतर ती ह्याचं स्पष्टीकरण देते. म्हणजे ती पुष्पाला सांगते की, “तू जंगली आहेस म्हणून तुझ्या प्रेमाच्या पद्धती पण जंगलीच असणार म्हणून मी तयार झाले.” अगे माजे आयशी! पण तू तर जंगली नाहीस ना! अक्कल काय गवत चरायला गेली होती काय? नंतर गाडीत बसून पुष्पाने खांद्यावर टाकलेला हात काढायला सांगते. हा सीन आवश्यक होता का? हल्ली दिग्दर्शक छुप्या छुप्या पद्धतीने, सेन्सॉर होऊ नये अशा पद्धतीने असेच सीन टाकतात जे तुम्हाला परिवारासोबत बघता येत नाहीत. मनोरंजनाचा व्यवसाय “सेक्स और क्राईमही बिकता है” या धर्तीवरच चालला आहे. ‘पुष्पा’ ही त्याला अपवाद नाही.
मग पुढच्याच आठवड्यात “पांघरूण” आला. तेव्हा दोलायमान स्थितीला स्थिर केलं आणि आपण चित्रपट पहात नाही तोवर त्यावर टीका करता येत नाही असाही होरा असल्यामुळे थिएटर गाठलं. इथेही प्रश्न असेल “कसा वाटला?” उत्तर - “पुष्पा बरा होता.” ज्या गोष्टीमुळे मी दोलायमान झाले होते तेच पाहायला मिळालं. ते म्हणजे म्हणायचं, “स्त्रीच्या शरीराच्या गरजांचा विचार कधी केला जाणार?” आणि दाखवायचा सेक्सच्या फोडणीसह उलटंच आणि त्याला उदात्ततेचा रंग वगैरे द्यायचं. त्यांनी दशकातून अशी कलाकृती होते असं म्हटलं होतं त्याची प्रचीती आली कारण बरोबर १० वर्षांपूर्वी असाच चित्रपट घेऊन मांजरेकर आले होते. तो होता “काकस्पर्श”.
तेच वैधव्य आलेल्या स्त्रीचं आयुष्य, तिच तिच्यात निर्माण झालेली शरीर सुखाची लालसा आणि शेवट ती लालसा कधीच पूर्ण न होता मिटूनच गेलेली. यासाठी तसेच ब्राम्हण कुटुंब, तसाच कोकणातील चौसोपी वाडा, तोच ब्रिटीश आणि पोर्तुगीज राजवटीतला काळ, तशीच लाल सोवळ्यातली आणि विधवेचे ‘ते एकाकी’ जिणे जगलेली एक काकू आणि तसाच सर्व गुण संपन्न पण आपल्या घरातील स्त्रीचं मन न समजणारा पुरुष. दोन्ही चित्रपट एकाच धाटणीच्या कादंबऱ्यांवर आधारित. फक्त त्यांचे लेखक वेगळे. ‘काकस्पर्श’च्या लेखिका उषा दातार तर ‘पांघरूण’ बा.भ.बोरकरांची कथा. या दोन्ही कथांमध्ये आणि पर्यायाने चित्रपटांमध्ये स्त्रियांच्या शारीर इच्छा पूर्ण होत नाहीतच. उलट त्यांचं दमनच होतं. पण १९४७ च्या आधीचा कालखंड दाखवणाऱ्या या कथा आत्ता जेव्हा स्त्रियांच्या आणि पुरुषांच्याही सेक्स विषयीच्या संकल्पनाही बदलत चालल्या आहेत आणि स्त्रियांना वेगळ्याच प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे, त्या काळात आणण्याचं कारण काय? केशवपन बंद होऊन तपं उलटली तरी आपण तेच दाखवणार असू तर मग बोलणंचं खुंटलं!
मराठी साहित्यात चित्रपट होईल अशी विपुल संपदा आहे. अगदी श्यामची आई पासून वारणेचा वाघ, वैजयंता, फकीरा, जैत रं जैत, बनगरवाडी ते अगदी अलीकडचे जोगवा, नटरंग, दुनियादारी, शाळा अशा कित्येक साहित्य कृतींवर चित्रपट आले आणि लोकप्रिय होऊन पारितोषिकंही मिळवली. तरीही महेश मांजरेकरांना एकाच पद्धतीच्या कथा साहित्याच्या समुद्रात सापडतात? “पांघरूण”च्या आधी त्यांनी दिग्दर्शित केलेला जयंत पवारांच्या कथेवर आधारित “वरण भात लोंच्या, कोन नाय कोनच्या” हा सुद्धा जयंत पवारांच्याच ‘अधांतर’ या नाटकावर आधारित ‘लालबाग परळ’ ह्या २०१० साली आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल वाटावा असाच. त्यांनी ‘अंतिम’ केला तो तर मराठीतल्या ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी अवतार! मग महेश मांजरेकर नेमकं काय देतात? आता पुढील दहा वर्षात काहीतरी वेगळे विषय घेतील पण २०३२ साली बहुधा एखाद्या ब्राम्हणीचे हाल दाखवणारी कथा ते आणतील असं भाकीत आत्ताच वर्तवायला काहीच हरकत नाही.
तर असे हे दोन्ही ‘प’ पुरुषातला सांगणारे पिक्चर. प्रेक्षकांनी कात केव्हाच टाकली आहे. दक्षिणात्य सिनेमांचं मी काही बोलू शकत नाही पण मराठी चित्रपटांनी देखील उगीच भरजरी वस्त्राचा आवसोडून दिला आहे. सामन्यांची गोधडी चित्रपटाच्या महावस्त्राच्या जागी दिसतेय. मांजरेकरांनी सुद्धा आता मफलर बदलावा. कथा जुनी असली तरी त्यात काहीतरी बोध असावा, किमान चांगला अनुभव प्रेक्षकांना मिळेल असा त्याचा आशय असावा. हीच माफक अपेक्षा.
2 Comments
लेख चांगलाय.पण स्त्रियांमधली बदलती स्थित्यंतरे ही आपण स्विकारायला हवी.नाहीतर आपणही एक नवं कोड आॅफ कंडक्ट आणत राहू.
ReplyDeleteअगदी बरोबर. धन्यवाद सर.
ReplyDeletePost a Comment
Please do not add any spam link in the comment box.