नागराज मंजुळे दिग्दर्शित बहुप्रतिक्षित झुंडहा चित्रपट मार्च रोजी प्रदर्शित झाला

सैराट नंतर नागराजचा हा चित्रपट हिंदीत असून त्यात अमिताभ बच्चन यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. या तपशिलांनी उत्सुकतेत भर घातली होती. चित्रपटाच्या चित्रिकरणात सुरूवातीला निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी नंतरचा कोरोना यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले. मध्यंतरी तो ओटीटी वर प्रदर्शित होईल अशा वावड्याही उठल्या होत्या, पण शेवटी तो मोठ्या पडद्यावरच प्रदर्शित झाला.

प्रदर्शनपूर्व प्रसिध्दीचा भाग म्हणून या चित्रपटाचे प्रोमो युट्युबसह सोशल मीडिया वर  एकामागोमाग एक झळकू लागले आणि वातावरणात सैराटपण जाणवू लागले. या प्रसिध्दी मोहिमेतीलच एका प्रोमोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा माहौल त्यात अमिताभ बच्चन बाबासाहेबांच्या प्रतिमेला नमस्कार करतो असे काही सेकंदाचे दृश्य होते. तो प्रोमो व्हायरल झाला मात्र आणि आंबेडकरी समाजातून मोहोळ उठावे अशा अभूतपूर्व प्रतिसादांचा पाऊस पडला. नागराज मंजुळेने विश्वविक्रम केलाय अशा यापेक्षा भारावलेल्या बेभान प्रतिक्रियांची वावटळ समाजमाध्यमात फिरू लागली. अगदी आजही फिरतेय.

त्यात चित्रपट नागपूरात चित्रित झालेला. बच्चन, किशोर कदम, छाया कदम यांसारखे काही कलाकार वगळता इतर सारे कलाकार मुख्यत: नागपूरचे, त्यामुळे या उत्साहाला आणखी वेग मिळाला.

हे सर्व पाहता, वाचता असं वाटायला लागलं की आंबेडकरी समाज आजही, धर्मांतरानंतर ५० वर्षानंतरही अजून प्रतिकातच अडकलाय? एक दोन अडीच तासाचा सिनेमा, त्याची पाच मिनिटाची जाहिरात. त्या जाहिरातीत बच्चन, बाबासाहेबांच्या प्रतिमेला  नमस्कार करतो यावरून चित्रपट पाहण्याआधीच जल्लोष करत नागराजला क्रांतिकारक बिरूद चिकटवून हा समाज हर्षोल्हासित झाला! का? कशासाठी?

ते काय अमिताभ बच्चन यांनी स्वतंत्रपणे डॉ. बाबासाहेबांना केलेले वंदन नव्हते. कथेच्या ओघात आलेल्या गाण्यातील काही सेकंदाचे ते दृश्य! पण संपूर्ण समाजच जणू काहीतरी अभूतपूर्व घडलं असं समजून सोशल मीडिया वर या घटनेवर जे भाष्य करतोय ते पाहून फारच गंमत वाटली.

२०१४ पासून नागपूरातूनच हिंदूराष्ट्राची आक्रमक मुहूर्तमेढ संपूर्ण भारतभर संविधानाला सोयिस्करपणे बाजूला करून बहुसंख्यांकांचे अल्पसंख्यांकाशी जो विद्वेषपूर्ण व्यवहार चालू आहे, ज्या पध्दतीची अलिखित हुकूमशाही चालू आहे, त्याविरोधात ब्र ही उच्चारणारा, राजकीयदॄष्ट्या नेस्तनाबूत झालेला, साहित्य, सांस्कृतिक आघाडीवरही निद्रिस्त पडलेला हा समाज या एका नमस्काराने हुरळून जातो? या समाजाला एवढेच दर्शन आभाळाएवढे वाटते?

याचा अर्थ डॉ. बाबासाहेबांनी ज्या विचारांच्या पायावर सामाजिक क्रांतीची मशागत केली विचारांनीच सनातन वृत्तीला पराभूत केले, संविधानाने चातुर्वर्ण्य संपवून टाकले, विज्ञाननिष्ठ बुध्दधम्माचा मार्ग दाखविला ते सगळं मातीमोलच झालं म्हणायचं. या चिमूटभर प्रसंगाने हुरळून जायचं तर मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरानंतर स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात मा. रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश ही सुध्दा क्रांती वा विक्रमच मानायला हवा! आंबेडकरी समाज मग भाजपाच्या या प्रतिकात्मकतेलाही क्रांती वा विश्वविक्रम समजणार? गांधी जसे प्रतिकांतून अडकवून टाकलेत तसेच आम्ही बाबासाहेबांचे करणार आहोत का? परवा केजरीवालांनी जाहीर  केलंय. पंजाबच्या मंत्रालयात फक्त भगतसिंह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच प्रतिमा लावल्या जातील. मग आता पंजाब आंबेडकरवाद्यांचे नवे तीर्थस्थळ होणार केजरीवाल थोर क्रांतिकारक?

नागराज मंजूळे हा संवेदनशील दिग्दर्शक आहे चित्रमाध्यमावर त्याची जबरदस्त पकड आहे. पहिल्या लघुपटापासून ते आताच्या झुंड सहित नाळ, पावसाचा निबंध, ॅमेझॉन प्राईमवरील  अनपॉझ्ड मधील वैकुंठहा लघुपट या सगळ्यातूनच तो कायम अभावग्रस्तांचं जगणं मांडत असताना, त्यांच्या हक्कांविषयीही भाष्य करतो. विद्रोही साहित्याने जसं जगणं आणि लिवणं यातलं अंतर मिटवलंय तसंच नागराजने ते चित्रपट माध्यमात मिटवलंय. त्यामुळे त्याच्या कलाकृतीत फुले आंबेडकरी प्रेरणा वा त्यांची प्रतिके ही या ना त्या प्रकारे येतातच. झुंड मधील बच्चन नमस्कारापेक्षा फॅन्ड्रीतील जब्याला शाळेतील पोरांपोरीसमोर डुक्कर पकाडावा लागणं त्याचवेळी मागे शाळेच्या भिंतीवर सावित्रीबाई, महात्मा फुले बाबासाहेब यांच्या ठळक प्रतिमा असणे जब्याने दगड भिरकावणे यातील दृश्य ताकद विचार अधिक सशक्त होता.

महामानव महानायकएका फ्रेममध्ये या शब्दच्छलाला किती महत्व द्यायचे? समजा या चित्रपटात आंबेडकर जयंतीचे दृश्यच नसते तर हाच आंबेडकरी समाज नागराज त्या स्लम पोरांचे कौतुक करताना थकला नसता?

"आपलं" काही आहे का? आपल्यापैकी का नागराज? बारसे आपल्यापैकीच का? हे प्रश्न त्याची होकारार्थी उत्तरे यानंतरच आमचा प्रतिसाद बदलणार का? आमची प्रतिकात्मकता एवढी टोकाची असते की नागराजच्या मुलाखतीतील बापाशी भांडून घरात बाबासाहेबांचा फोटो लावला या वाक्यापाशीच अडकलो. नागराज स्वत: फोटो लावून हजारो कोस इतका दूर गेला की आज देशविदेशात त्याचा चित्रपट गौरवला जातोय. कारण तो फोटोत अडकला नाही. त्याच्या दृष्टीने त्याच्या त्या वेळच्या मनातील विद्रोहाची गरज होती. वडाराच्या घरात महारांचा नेता हा शूद्रांमधला अंतर्गत संघर्ष कमी करण्याची कृती होती.

आता जर तुम्ही नागराजच्या घरात, ऑफिसात बाबासाहेबांचा फोटो शोधत रहाल नाही सापडला तर नावं ठेवाल?

झुंड पेक्षाही जास्त व्यावसायिक यश मिळालेला जयभीमनावाचा दाक्षिणात्य चित्रपट आपण पाहिलाच ना. आजवर सिनेमाचं शिर्षक जयभीम हिंदी सोडा, मराठीतही नव्हतं. पण त्या चित्रपटात, एकदाही कुणी कुणाला जयभीम म्हणत नाही. ज्या वकिलावर हा चित्रपट बेतलाय तो कम्युनिस्ट आहे पण तो जयभीम हे प्रेरणास्त्रोत मानतो. आम्ही झुंड एवढे हुरळून नाही गेलो जयभीम पाहून. का? कुणी जयभीम बोलत नाही म्हणून की तो वकील कम्युनिस्ट म्हणून की अत्याचारित लोक भटके होते म्हणून?

आज घडीला महाराष्ट्र वगळता उत्तर दक्षिण भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नवे आयकॉन तयार झालेय. बाबासाहेब तिथे महारांची वतनी जमीन नाही, तर संविधान कर्ता शूद्रांचा असा नेता ज्याने गांधी, कॉंग्रेस, सर्वांना नमवले, जो मार्टिन ल्यूथर किंग वा मंडेलांच्याही पुढच्या पायरीवर उभा आहे.

आता कलाकृतीतून त्यांचे विचार, दर्शन हे होतच रहाणार. त्यामुळे आंबेडकरी समाजाने महाराष्ट्रातल्या आपण बाबासाहेबांना जयंती नी डिसेंबरच्या पलिकडे, साहित्याचा एका दशकाचा अपवाद वगळता काय न्याय दिला? त्यांची प्रतिमा आणि प्रतिभा इतर सांकृतिक माध्यमात किती विस्तारली? याचा सखोल विचार करावा बाबासाहेबांना प्रतिमेतून, प्रतिकातून बाहेर काढून त्यांना सर्व माध्यमातून, सर्वदूर, सर्वांत न्यावे.

 

संजय

पवार