हा लेख खरंच लिहावा की नाही या द्वंद्वात मी सापडलेय. कारण मंदिर हा आजकाल अगदी संवेदशील विषय झाला आहे आणि माझ्या मनात चाललेल्या द्वंद्वाचा विषय मंदिरच आहे. नाही, पूर्वी मंदिर होतं आणि मग इस्लामी आक्रमकांनी ते उद्ध्वस्त करून त्या जागी मस्जिद कशी बांधली या भोवतीचं हे द्वंद्व नाही. देवरुखच्या मार्लेश्वराच्या दर्शनाला मी गेले आणि ह्या द्वंद्वात सापडले. कारण इथे मला जी समस्या जाणवली ती आणखी कोणाला जाणवली असेल का, त्यांनी त्याविषयी कुठेतरी काहीतरी लिहिलं असेल का हे शोधण्यासाठी मी थोडं इंटरनेट वर सर्च करून पाहिलं तर मला मार्लेश्वराचं महत्त्व, महात्म्य, मार्लेश्वरला पोहोचायचं कसं आणि तिथल्या देवस्थानाचीच माहिती मिळाली; पण मला जाणवलेल्या समस्येची तक्रार मात्र कोणीच केल्याचं दिसलं नाही. त्यामुळे देवास्थानासारख्या संवेदनशील बाबतीत मी काही तक्रार-वजा नाही तर गुणिले करून लिहू की नको या द्वंद्वात मी सापडले होते. शेवटी लिहायला घेतलं आणि आता सरळ तक्रारीलाच हात घालते.

मार्लेश्वर हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील, संगमेश्वर तालुक्यातील देवरुख जवळच्या मारळ गावातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं शंकराच्या स्वयंभू पिंडीचं स्थान. याच्याविषयी कोणा श्रद्धाळूस माहिती हवी असल्यास याच्या आख्यायिका, कथा, महात्म्य शेकड्याने इंटरनेटवर उपलब्ध आहेत. माझी तक्रार आहे ती इथल्या भक्तांच्या गैरसोयीची. या ठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी आणि इथून परतीचा प्रवास करणाऱ्या लोकांसाठी एक एसटी सोडली तर शासकीय स्तरावर कोणतीच व्यवस्था नाही ही माझी तक्रार आहे. ही समस्या भारतातल्या गावोगावी डोंगर दऱ्यात असणाऱ्या सर्वच स्वयंभू देवदेवतांच्या मंदिरांच्या बाबतीत असेल. अशा स्वयंभू मंदिरांमध्ये लोकांची श्रद्धा खूप असते. त्यामुळे कितीही उंच  चढायचं असलं तरी लोक सर्व प्रकारच्या गैरसोयींचा मुकाबला करत येतात. कारण मुळात शरीराला त्रास देऊन केलेल्या यात्रेचं मोठं फळ तो देव देतो अशी श्रद्धा असतेच. त्या श्रद्धेचा पूर्ण आदर राखून मला म्हणायचं आहे की त्या त्या विभागाचे नगरसेवक, आमदार, खासदार आपापल्या निधीतून भक्तांना तो डोंगर चढून जाण्यासाठी पायऱ्या बांधतात. मार्लेश्वरालाही ५५० पायऱ्या बांधलेल्या आहेत. पायऱ्यांवर खाण्यापिण्याची व्यवस्थाही आहे. मग ह्याच पैशातून डोंगर उतरून परतीचा प्रवासासाठी बसची उन्हातान्हात तासनतास वाट पाहणाऱ्या भक्तांसाठी बैठक व्यवस्था करू शकत नाहीत? थोडं स्पष्ट करून सांगते.

आम्ही मार्लेश्वरला जाण्यासाठी देवरुखवरून सकाळी दहा वाजता बस पकडली. बसमध्ये चढताना कोणतीही रांग नाही की काही नाही. गावातले लोक अजूनही मेंढरं भरावीत तशी बसमध्ये मुलाबाळांना आणि म्हाताऱ्या कोताऱ्यांना कोंबून कोंबून चढतात. देवरुख ते मार्लेश्वर हा दोन तासांचा प्रवास उभ्याने करायला लागू नये म्हणून जागा पटकावणं हा उद्देश या मागे असतो. सोमवार आणि कोणत्याही शंकराच्या सणाच्या दिवशी इथे प्रचंड गर्दी उसळते. अशा दिवशी तरी प्रशासनाने अधिक गाड्या सोडल्या पाहिजेत. किमान लोकांची गर्दी पाहून तरीज्यादा गाडी येणार आहे. तुम्ही घाई करू नका,’ हे आपल्या सरकारी भोंग्यांवरून सांगितलं पाहिजे आणि गाड्या सोडल्याही पाहिजेत. शाळा, कॉलेजातील मुलांची स्वयंसेवक म्हणून मदत घेऊन रांगा लावून बसमध्ये चढण्याची शिस्त लोकांमध्ये बाणवली पाहिजे. मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याशी परतण्याच्या बसच्या वेळी सुद्धा ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण ह्या शिस्तीचा पूर्ण बट्याबोळ झालेला प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दिसतो.

मी मार्लेश्वरला गेले होते तेव्हा एसटीत कोंबून भरलेल्या भक्तांना दुपारी बारा वाजता मारळ गावात मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याशी उतरवण्यात आलं आणि परत जाण्यासाठी बस दुपारी दोन येईल म्हणून ड्रायव्हरने सांगितलं. त्यामुळे आम्ही वेळेचा हिशोब मांडत कडक उन्हात त्या ५५० पायऱ्या चढून गेलो. एका बाईने काही तरी नवस केला होता. ती प्रत्येक पायरीवर कापराची एक एक वडी ठेवून ती मेणबत्तीने पेटवून अनवाणीच वर चढत होती. तिच्या नवऱ्याच्या हातात कापराचं पाकीट होतं. तो तिला एक एक वडी काढून देत होता. एवढ्या उन्हात अनवाणी आणि प्रत्येक पायरीवर वाकून वाकून तिची अवस्था काय झाली असेल हे तो मार्लेश्वरच जाणे. अशा श्रद्धांच्या ठिकाणी आपण काही बोलूही शकत नाही. असो.


आम्ही चढून गेलो, मार्लेश्वर आणि अवाढव्य सह्याद्रीचं दर्शन घेऊन दीडच्या सुमारास पायऱ्या उतरायला सुरुवात केली आणि बरोबर दोनला दहा मिनिटं असताना खाली आलो. बस येईल म्हणून सरबत पिण्यात किंवा काही खाण्यात वेळ घालवला नाही. आमच्यामागे आमच्या बसमधून आलेले सर्व लोक आले. बस आता येईल मग येईल म्हणत तक्रारी करत उभे होते. कोणी मुलाबाळांना थोपटत त्या रणरणत्या उन्हात मातीतच फतकल मांडून बसले. आम्ही प्रयत्न करून लोकांना रांग लावून उभं राहण्यास सांगितलं. म्हणजे सर्वांना चढायला मिळेल. गाडी कोणत्याही क्षणी येईल म्हणून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या खाण्यापिण्याच्या स्टॉल्सकडे कोणी जात नव्हतं. तसेच उभे होते, जणू काही मंदिरात आल्याची कोणीतरी त्यांना शिक्षा केली होती. आणि दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर बस आली. अर्थात रांगेचं भान कोणालाही राहिलं नाही. उतरणाऱ्यांना उतरूही देता आपण घुसण्याचा प्रयत्न सर्वच करू लागले, आमच्या अरे थांबा, चा आवाज विरून जात होतं. शेवटी उतरणाऱ्या भक्तांनी सुनावलं म्हणून त्यांना उतरण्यासाठी जागा दिली, ते उतरले आणि मग झुंबड उडायची ती उडालीच,   

बसमध्ये बसलो तेव्हा कळलं की बस डेपोतून पुढच्या भक्तांना घेऊन निघाली तेव्हा बसमध्ये कोणीतरी चोरी केली होती. म्हणून ड्रायव्हर आणि कंडक्टरला पोलीस स्टेशनला जावं लागलं होतं. त्या बसमध्ये असा प्रकार घडला होता मग अशा वेळी दुसरे ड्रायव्हर आणि कंडक्टर देऊन बस पुढे पाठवण्याची अक्कल एसटी प्रशासनाला नव्हती काय? येणाऱ्या भक्तांनाही उशीर, त्रास, दगदग झाली आणि जाणाऱ्यांनाही. यांच्यात एवढं कम्युनिकेशन नसावं? मोबाईल काय फक्त नेटफ्लिक्स बघायला घेतलेत का? हो गावात हे सर्व पहातात पण त्या मोबाईलचा योग्य वापर कसा केला पाहिजे, कोणाला संपर्क केला पाहिजे, झरझर ऑर्डर्स दिल्या पाहिजेत, लोकांचा त्रास कमी कसा होईल ते पाहिलं पाहिजे हे त्यांच्या गावीच नसतं . जणू काही देवदर्शनाला आलेल्या लोकांना देवाच्या भरवशावर सोडून प्रशासन मोकळं होतं. ही घटना मी स्वत: अनुभवली म्हणून मला कळली नाहीतर अशा घटना वारंवार घडत असणारच आणि देवाचं दर्शन झालं ना, म्हणूनआनंद पोटात माझ्या माईनाम्हणणारे भक्तगण यावर काहीच बोलत नसणार. कधी नव्हे ते मी देवदर्शनाला गेले पण भक्ती रुजावी असा अनुभव मला मिळाला नाही. बऱ्याच दिवसांनी झालेलं अफाट सह्यादीचं दर्शन आणि डोंगरातील खोबणीत शंकराच्या पिंडीचं गूढ एवढंच घेऊन मी परतले.   



लहान चुकीची गोष्ट वारंवार घडली की त्याचा डायनासोर होतो. शासन प्रशासनाने यावर काहीतरी मार्ग काढायला हवा. मला एक प्रश्न पडतो, एअरपोर्टवर लोकांना आणण्या नेण्यासाठी सर्व लोक आणि यंत्रणा सज्ज असतात. मग एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी यातली एक टक्का व्यवस्था सुद्धा का नसते? की गरीबाचं सर्वच दुर्लक्ष करायचं असतं. राजकारण्यांनो, ते देऊळ कोणी पाडले आणि त्यावर कोणी बांधले असले राजकारण करण्यापेक्षा आहेत त्या देवळांची आणि भक्तांची बडदास्त ठेवा जरा. शेवटी तेच मतदान करणार आहेत तुम्हाला. काय? काही अशा ठेवावी का आम्ही?