सध्या महाराष्ट्रात जितकी अयोध्येची चर्चा होतेय, त्याच्या एक शतांशही प्रत्यक्ष उत्तर प्रदेशातही होत नसेल. 

कारण उत्तर प्रदेशचं राजकारण, समाजकारण हे सर्व आता काशी मथुरेवर केंद्रित झालंय. नाही म्हणायला राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करत कुणा एका भाजप खासदारानं वातावरण तापवायचा प्रयत्न केला. पण त्याला पक्ष किंवा मुख्यमंत्री योगींनी अजिबात हवा दिली नाही.

राज ठाकरेंचा अंदाज नसल्याने या महाशयांनी पाच लाख माणसं जमविण्याचा कधीही हजर होणाऱ्या संत महंतांचे मेळे घेऊन स्वत:ला बातमीत ठेवले खरे पण तोवर राज ठाकरेंनीच अयोध्या दौरा स्थगित किंवा प्रलंबित ठेवल्याचे जाहिर करून खासदारांना वाराणसीचा घाट दाखवला! उत्तर प्रदेशासह सर्व देशासाठीच मंदिर निर्माणाधीन झाल्यापासून अयोध्या हा विषय संपलाय. आता अयोध्या चर्चेत येईल ते थेट मंदिर निर्माणानंतरच!

पण महाराष्ट्रात राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या सभेत आपण अयोध्येला जाणार असं घोषित केलं आणि महाराष्ट्रात अयोध्या फिव्हर आला. राज ठाकरें पाठोपाठ आदित्य ठाकरेंनीही अयोध्या वारीची तारीख जाहिर केली राज्यसभेच्या निवडणुकीचं कारण देत पुढची तारीख जाहिर केलीय!

आता इतर पक्षातले लोकही अयोध्यावारी करायला गेले तर नवल नको वाटायला.आता हे अयोध्या प्रेम का बरे ऊतू जातेय? कारण लवकरच बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत! ९५ च्या युती शासनाच्या एसआरए योजनेमुळे आधीच लक्षणीय मुंबई निवासी झालेल्या युपी बिहारींची संख्या या योजनेच्या घोषणेनंतर दिवसेंदिवस वाढतच गेली! मुंबई सारख्या रोजगार निर्मितीक्षम स्वप्ननगरीत मोफत घर मिळणार हे कळताच लोंढे वाढले जन्माने कर्माने असलेला मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला. आज परिस्थिती अशी आहे की गोरेगावसह पुढच्या सर्व पश्चिम उपनगरात तर कुर्लासह पार ठाणे पालघरपर्यंत परप्रांतियांची लोकसंख्या इतकी वाढलीय की आता महापालिका निवडणुकीत युपी, बिहारींसह पूर्वीचे गुजराथी, मारवाडी हे गेम चेंजर बनू शकतात!

मागच्याच निवडणुकीत याच जोरावर भाजपने सेनेचे प्राण कंठाशी आणले होते. आता तर मोदी पर्व - दोन चालू आहे सेनेने राज्यातील भाजपचं सरकार गनिमी काव्याने घालवत स्वत: दोन्ही कॉंग्रेसच्या मदतीने थेट मुख्यमंत्रीपदासह आणखी एक मंत्रीपद मातोश्रीकडे घेतलं. आता भाजप सूडाने पेटलेला आहे. त्यामुळे दोन ठाकरेंच्या सभा, उत्तर सभा यांतली मजा बघत भाजपाने फडणवीसांच्या नेतृत्वाखाली थेट हिंदी भाषिक संमेलन मुंबईतच घेत महापालिका प्रचाराची दिशा ठरवत गेमचेंजरनाच गोंजारले. त्यात रामासह, हनुमान चालिसा आळवत मतपेट्यांचे गणित मांडायला सुरूवात केली.

राज ठाकरेंचे ताजे हिंदुत्व हे मराठी मतदारांना भावेल अशा पध्दतीने भाजपने शिवसेना उध्दव ठाकरेंना खिंडीत गाठायला सुरूवात केली. भाजपा - मनसे युतीची एक पुडी सोडली लगेच ती माघारीही घेतली. पण राज ठाकरेंशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष युती आपल्या हिंदी भाषिक मतदारांना पसंत नाही पडली तर? या शंकेतून भाजपनेच राज ठाकरेंना अयोध्येचा रस्ता दाखवला नाही ना? का स्वत: राज ठाकरेंनाच आपल्या नव्या हिंदू राजकारणासाठी अयोध्येचा शिक्का जरूरी वाटला?

भाजपाची ही हिंदी भाषिक रणनीति हाणून पाडण्यासाठी उध्दव ठाकरेंनी आपला प्रत्येक मुंबई पालिका निवडणुकी आधीचा हातचा ठेवलेला "मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट शिजलाय" हा हुकमी एक्का बाहेर काढला.

एकदा हा मुद्दा आला की संयुक्त महाराष्ट्र, १०५ हुतात्मे आले, गुजरा गुजराती भाषिकांची २०१४ नंतर दिवसेंदिवस वाढत चाललेली मुजोरी हे ही आता हळूहळू पेटत जाणार. पण त्याच वेळी हिंदू म्हणून अयोध्या गाठत गेमचेंजरनाही गोंजारण्याचे प्रमाण वाढणार! एकुणात मुंबईच्या लढाईसाठी अयोध्येत देव पाण्यात ठेवून सेना भाजप निकराने लढणार दोन्ही कॉंग्रेस जीतनेवाले का भी भला और हारनेवाले का भी भला असं म्हणत, तुम्ही मुंबईसाठी भांडा, आम्ही मुंबईसह महाराष्ट्रावर राज्य करतो, असं म्हणून गालात हसत राहणार!

आता यात खुद्द राज ठाकरेंनीच एक वेगळं वळण २२ मेच्या पुण्यातल्या सभेतून दिलंय. ते म्हणाले, खासदार ब्रीजभूषण हे प्यादं आहे. त्यांच्या माध्यमातून मला मनसैनिकांना, माझ्या समर्थक हिंदूंना सापळ्यात अडकवायचा हा डाव होता. आंदोलकांवर खटले भरून, अटका करून नंतर निवडणुकांच्या तोंडावर हे खटल्यांचं लचांड मागे लावायचं. मी या सापळ्यात मनसैनिकांना अडकवू इच्छित नाही. त्यांना खटल्यामागून खटल्यात खितपत पडू द्यायचं नव्हतं म्हणून हा दौरा तूर्त रद्द!

या धोरणात्मक कारणासोबत त्यांच्यावर होऊ घातलेली शस्त्रक्रिया, त्यासाठी द्यावा लागणारा आधीचा नंतरचा वेळ हे ही एक कारण आहे. रविवारच्या सभेत त्यांच्या तब्येतीचा परिणाम थोडाफार त्यांच्या देहबोलीवर जाणवत होता.

आता राज ठाकरेंनी ज्या सापळ्याचा उल्लेख केला तो सापळा कोण लावू शकतो? .प्र.मध्ये राज्य भाजपचे. ब्रीजभूषण भाजपचे खासदार, मुख्यमंत्रीपदी योगींची ही दुसरी टर्म. काशी मथुरेच्या निमित्ताने पुन्हा मंदिर आंदोलन सदृश्य स्थिती तापवली जातेय.

अशा वेळी सापळा कोण लावणार? राज ठाकरेंनी आज खुलासा केला की राम दर्शन हा मुख्य हेतू होताच पण तत्कालिन मुख्यमंत्री मुलायमसिंहांनी कारसेवकांना गोळ्या घालून त्यांची प्रेते शरयू नदीत फेकली त्या स्थळाला भेट देऊन श्रध्दांजली वाहायची होती! हा विचार तर भाजपसह विहिंपसह देशभरातील कुणाही राममंदिर समर्थकांनी केला नाही. अगदी उध्दव ठाकरे सहपरिवार जाऊन आले तेंव्हाही त्यांनी केला नाही, ना योगी, ना मोदींनी सत्तेवर येताच वा भूमिपूजनाआधी केला! मराठी मुलांच्या नोकऱ्यांसाठी त्यावेळी कल्याणसह इतर रेल्वे स्थानकात जे आंदोलन झालं त्यात युपीच्या एकाने आईवरून शिवी दिली वातावरण पेटलं. पण त्यानंतर ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना त्यांनी धोरण बदललं स्थानिकांना नोकऱ्या मिळू लागल्या त्यात मराठी तरूणांनाही मिळाल्या.



एकंदरीत आपल्या तूर्त स्थगित दौऱ्यामागची कारण मीमांसा सांगताना राज ठाकरेंना खूप वळसे घ्यावे लागले. त्यांच्या प्रतिपादनात एकच एक सुसूत्रता नव्हती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंदोलन केल्यावर अटक होणे, खटले चालणे हे नेते कार्यकर्ते गृहीतच धरतात! त्यात तुम्ही जर इतर प्रांतात जाऊन काही करणार असाल तर तेथील सरकार कसे वागेल हे सांगता येत नाही. दिल्ली वेशीवरले अलिकडचे किसान आंदोलन, त्याआधीचे शाहिनबाग आंदोलन, त्याही आधीचे अण्णांचे आंदोलन या सर्व आंदोलनात देशभरातून लोक सहभागी झाले. अगदी राज ठाकरेंनी उल्लेख केला त्या कारसेवेत तर देशभरातले कारसेवक होते जे गोळ्या खाऊन शरयू नदीत फेकले गेले.

एका खासदाराच्या धमकीवरून राज ठाकरेंसारख्या लढवय्या नेत्याने खरं तर आव्हान द्यायला हवं होतं. जर मशिदीच्या भोंग्याबाबत ते जर जाहीर सभेत च्यायला एकदा काय ते होऊनच जाऊद्याची आवेशपूर्ण भाषा करू शकले तर इथे कोण कुठला खासदार, तुम्ही येऊनच दाखवा म्हणतो आणि तुम्ही अटक खटले टाळायची, कार्यकर्त्यांच्या काळजीची भाषा करता? मग औरंगाबादेत होऊनच जाऊद्या म्हणताना नव्हता हा विचार? का तिथे समोर मुसलमान होता म्हणून ही वीरश्री आता हिंदू बाहुबली आला तर सापळा, अटक, खटले नी दहा गोष्टी आठवल्या?

या सगळ्या प्रकारात राज ठाकरे स्वत: म्हणतात की जनतेचे प्रश्न लांबच राहतात. मग ते स्वत: अयोध्येला जाण्याऐवजी पेट्रोल डीझेलचा व्हॅट, वीजेचा खंडित पुरवठा, महागाई यावर आंदोलन का करत नाहीत? अजान बंद झाल्याने नेमका कोणता सामाजिक प्रश्न सुटला?

एकंदरीतच या सर्वपक्षीय धर्मांध चढाओढीत जनतेने आता काय तो बोध घ्यावा. विशेषत: बेरोजगार तरूण तरूणी, वस्ती पातळीवर गाव खेड्यात राहणारा वर्ग, नोटबंदी, जीएसटी, कोरोनापूर्व कोरोनात्तोर आर्थिक संकटात सापडलेल्या मोठ्या बिनचेहऱ्याच्या समूहाने आता वेगळा विचार करायला हवा. कारण नवआर्थिक धोरणाने नवहिंदुत्वाने प्रेरित, लाभार्थी असा एक वर्ग तुपकट चेहऱ्याने पंचवार्षिक योजनेने घडवलेला हा देश, संविधानाने एकत्र ठेवलेला देश एक जातीय एक धर्मिय हुकूमशाही आणू पहातोय. सध्याचे वातावरण त्याची पूर्वतयारी आहे.

 

अयोध्या, .प्र.,मुंबई, महाराष्ट्र हे केवळ निमित्त!

 

संजय

पवार