सत्यवान सावित्रीची कथेतील सावित्री म्हणजे मूर्तिमंत पावित्र्याचं प्रतिक, पतिव्रतेचं प्रतिक हे आपण जाणतोच.
ती अशा स्त्रीचं प्रतिनिधित्व करते ज्यांचं आपल्या पतीवर खूप प्रेम आहे, ज्या आपल्या पतीला नेहमी जपत असतात, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्य संपदेसाठी नेहमी उपास तापास करत असतात. महर्षी व्यासांच्या समुद्राप्रमाणे असणाऱ्या महाभारतातील ही कथा म्हणजे एक लहान बिंदू. स्त्रीची अशी अनेक रूपं अखंड महाभारतात आपल्याला दिसतात. पण “व्यासोच्छीष्टम जगत् सर्वम्” असं म्हटलं गेलेल्या या अजरामर कलाकृतीत सुद्धा स्त्रीचं एक रूप मात्र दिसत नाही. ते रूप आपल्याला दिसतं शेक्सपिअरच्या “हॅम्लेट”मध्ये. आपल्याच शारीर वासनांना बळी पडून आपल्याच पतीला मारणारी आणि त्याच्या तेराव्याच्याही आधी आपल्याच दिराशी पाट लावणारी एक कुलटा स्त्री या नाटकात दिसते ती हॅम्लेटच्या आईच्या रुपात. स्त्रीला आपण नेहमी मायेची, ममतेची मूर्ती म्हणतो, तशी हॅम्लेटची आई सुद्धा आपल्या मुलावर, हॅम्लेटवर नितांत माया करते. मग ही मायेची मूर्ती इतकी क्रूर का वागते? खरी स्त्री कोणती? खरं प्रेम कोणतं? हे प्रश्न कदाचित वि. स. खांडेकर यांनाही पडले असतील. म्हणूनच त्यांच्या “अमृतवेल” मधून ते या प्रश्नाचं उत्तर शोधतात आणि शेवटी हॅम्लेटच्या आईच्या कृत्यामागे काहीतरी असं कारण असेल ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल हा निष्कर्ष ते मांडतात तेव्हा आपल्या नजरेत, दृष्टीकोनात बदल होऊ लागलेले आपल्याला जाणवतात.
“अमृतवेल”ची नायिका नंदा हिचा भावी पती शेखर वैमानिक असतो आणि एका विमान अपघातात त्याचा मृत्यू होतो. नंदाचं आयुष्य उध्वस्त होतं. तिचे आईवडील एवढंच समाधान मानतात की शेखर गेला तेव्हा नंदाचं लग्न झालं नव्हतं. नाहीतर...? नाहीतर तेच जीवघेणं वैधव्य घेऊन तिला आयुष्य काढावं लागलं असतं. आईवडील नंदाला उभं राहण्यासाठी बळ देतात आणि इंग्रजी हा विषय घेऊन एम.ए. झालेली नंदा पीएच.डी.चा विचार करू लागते. ती तिच्या पीएच.डी.चा विषय ठरवते “स्त्रीचं खरं रूप कोणतं, सावित्री की हॅम्लेटची आई?” ह्या विषयावर अभ्यास सुरू करण्याआधी तिला तिचे मार्गदर्शक दासबाबू आणि वडील काही दिवस जरा जग पहा असा सल्ला देतात. त्याच वेळी तिची कॉलेज मधली मैत्रीण वसुंधरा गुप्ते जी लग्नानंतरची वसुंधरा जहागीरदार झाली आहे ती आपल्यासोबत विलासपूर इथे बोलावून घेते.
तिथे रहात असताना नंदाला जाणवतं की वसुंधरा आणि तिचा नवरा देवदत्त यांच्यात नातं चांगलं नाही. ते दोघेही वेगवेगळ्या वाड्यात राहतात आणि आठ वर्षांची मुलगी मधुरा वसू सोबत राहते पण ती आपल्या बाबांना राक्षस म्हणते. देवदत्ताच्या वाड्यात एक मोठी लायब्ररी असते, त्यात सर्व प्रकारची मराठी, इंग्रजी पुस्तकं असतात. देवदत्त तर एक हुशार आणि खूप वाचलेला, वाचणारा माणूस असतो, त्याच्या वाचनामुळे आलेल्या समजुतीतून तो एक प्रगल्भ माणूस दिसतो. तरीही वसू त्याच्याशी अशी का वागते? ती सावित्री आणि हॅम्लेटच्या आईविषयी त्याच्याशी गप्पा मारते. तेव्हा तो म्हणतो,
“नंदाताई, या जगावर सत्ता चालते ती अंध, असुरी वासनेची. डोळस दैवी भावनेची नाही. बाकीचे कवी “आई थोर तुझे उपकार” म्हणून गळा काढण्यात आनंद मानतात, पण जन्म देणारी आई मुलाचा जीव घेणारी वैरीण कशी होते, हे सांगण्याचं धैर्य ह्या “हॅम्लेट” लिहिणाऱ्या थोर शेक्सपिअरनंच दाखवून दिलं.”
देवदत्तच्या या बोलण्यावरून त्याला नेमकं काय सलतंय हे नंदाला कळत नाही. वसू सोबत बोलत असताना तिला कळतं की देवदत्त आणि त्याच्या आईमध्ये एकदा खूप भांडण झालं होतं आणि त्याने आईवर बंदूक रोखली होती. तेव्हापासून मधुराला फिट्स येतात आणि ती बाबांना राक्षस म्हणते. नंदा याविषयी जेव्हा देवदत्ताशी बोलते तेव्हा तो सांगतो की जसा हॅम्लेटला त्याच्या बापाचं भूत दिसतं तसंच त्याला त्याच्या वडिलांचं पत्र मिळालं. त्यात त्यांनी “तुझी आई एक कुलटा स्त्री आहे, मी तिला पर पुरुषासोबत पाहिलं आहे. मला जगण्यात रस नाही म्हणून मी आत्महत्या करीत आहे,” असं म्हटलं होतं. ह्या पत्रानंतर देवदत्ताचे आईसोबत आधीच बिघडलेले संबंध अधिक बिघडतात. वडिलांच्या मृत्यूचा जाब विचारायला तो जातो तेव्हा रागात तिच्यावर बंदूक रोखतो.
कथेला तिथे मोठं वळण मिळतं जेव्हा देवदत्ताला आईचं पत्र मिळतं. ते वाचून त्याचं डोकं चक्रावून जातं. कारण त्यात लिहिलेलं असतं “तुझे वडील जिवंत आहेत.” आईने यासोबत जे काही पत्रात लिहिलं असतं ते स्त्रीच्या क्रौर्यामागची खरी, खूप सोसलेली, नवऱ्यासाठी संसारासाठी सर्व काही करणारी स्त्री उलगडून दाखवणारं सत्य असतं. त्या पत्रामुळेच हॅम्लेटच्या आईच्या क्रौर्यामागे अशीच काहीतरी कथा असेल याची खात्री नंदाला पटते. देवदत्त आपल्या वडिलांना भेटायला आईने सांगितलेल्या पत्त्यावर जायला निघतो तर नंदा आपली पीएच.डी. करायला सिद्ध होते. त्या पत्रात देवदत्तच्या आईने असं काय सांगितलेलं असतं की ती कुलटा न राहता एक सुजाण स्त्री वाटू लागते? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला “अमृतवेल” एकदा तरी वाचलंच पाहिजे.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.