साडी म्हणजे बायकांचा जीव की प्राण असं आजच्या आधुनिक काळातही म्हटलं जातं याला कारण साडीचा सुटसुटीतपणा आणि आकर्षक पेहराव असणं हे आहे

बाई कोणत्याही वयाची आणि समाजातील कोणत्याही थरातील असू दे, तिने स्वस्तातली साडी नेसलेली असू दे की महागातली, ती साडी त्या बाईला हालचालीतील सहजता आणि मोहकपणा नक्कीच देते. संपूर्ण भारतातील बायकांनी हा अनमोल वारसा जपला आहे. यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय स्त्रीला चित्रित करायचं असेल तर ती साडीमध्ये दाखवली जाते. आपल्या आजवरच्या राजकरणात असलेल्या स्त्रियांनी भारतीय स्त्रीचं हे वैशिष्ट्य सहजपणे जपलं आहे.

कर्तृत्ववान स्त्रियांची आवड साडीच 




देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री दिवंगत सुषमा स्वराज आणि आताच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारामन या कर्तृत्ववान स्त्रियांनी फक्त देशातच नाही तर परदेशातील घडामोडींदरम्यान देखील साडी नेसूनच तेथील लोकांना सामोर्या गेल्या. याशिवाय देशातील इतर महिला मुख्यमंत्री आणि मंत्री, मग त्या कोणत्याही प्रांतातील असोत त्या नेहमी साडीतच लोकांना सामोरं जातात. देशातील आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्र स्त्रियांच्या राहणीमानाच्या दृष्टीने देखील झपाट्याने बदलत असताना या क्षेत्रातील अग्रणी सुधा मूर्ती या देखील नेहमी साडीच नेसतात.

पेहराव ही आपली ओळख बनते

साडी हा सर्वच भारतीय स्त्रियांचा मूळ पेहराव नसला तरी त्यात भारतीय पारंपरिक आणि आधुनिक पेहराव यांचा मिलाप दिसतो. भारतात दर राज्यात पेहराव बदलतो. प्रांत आणि धर्माप्रमाणे देखील पेहराव बदलतात. खरं तर या पोषाखावरून आजही जात, भाषा, प्रांत अगदी सामाजिक आणि आर्थिक स्तर हे ओळखले जातात.

बदलते पेहराव  

·       भारतात मोहोंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीच्या प्रागैतिहासिक काळात लोक टकळीच्या सहाय्याने सूत कातीत आणि त्याचं वस्त्र विणीत. आर्य भारतात आल्यावर त्यांनी स्थांनिकांकडून काही वेशभूषा-प्रकार घेतले. आर्य सूत कातून त्यापासून वस्त्र विणायचे. ऊनी कपड्यांपासून आणि वनस्पतीच्या धाग्यांपासून बनवलेली वस्त्रं वापरत.

·       बौद्ध काळात भिक्षु-भिक्षुणींची वस्त्रं एकसारखीच पिवळी असत. कमरेभोवती गुंडाळण्यात येणारी संघाटीअंगाखांद्यावरचं अंतरवासकआणि वरून घेतलेली चादर म्हणजे उत्तरासंगहा त्यांचा पेहराव असे. नागरजनही हेच पेहराव करत फक्त त्यांचा हा पेहराव रंगीबेरंगी असे. मौर्य, शृंग आणि सातव्या शतकात स्त्रिया टाचेपर्यंत साडी, कमरेला गोंडेदार मेखला आणि दुपट्टा घेत. गुप्त काळातील स्त्रिया साडी, चादर, यांचा वापर करीत. विविधरंगी भरतकाम केलेले चोळी आणि ओढणी नेसत.

·       सातव्या शतकानंतर राजस्थान आणि उत्तर प्रदेश इत्यादी प्रदेशांतील स्त्रिया लुंगीप्रमाणे साडी नेसत. या साड्या भपकेदार नक्षीच्या आणि रुंद काठपदराच्या असत. श्रीमंत आणि उच्चकुलीन स्त्रिया पायाला अगदी तंग बसेल अशी तुमान घालून त्यावरून मलमलीचा टाचेपर्यंत लोंबणारा घोळदार झगा (जुगली) घालीत आणि सुंदर ओढणी घेत.

·       एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात पारंपरिक भारतीय वेशभूषा हीच कमीअधिक फरकाने आपापली प्रादेशिक वैशिष्ट्यं राखून रूढ झाल्याचं दिसून येतं. विशेषतः इंग्रजांच्या संपर्कामुळे सुशिक्षित भारतीय समाजात पाश्चिमात्य पेहेरावाचं अनुकरण होऊ लागलं.

·       या काळात महाराष्ट्रीय महिला नऊवारी लुगडे नेसत त्यावर कोपरापर्यंत बाह्या असलेल्या आणि मध्यावर गाठ मारलेली खणाची चोळी घालीत. नेहमीच्या वापरात लाल किंवा हिरव्या रंगाचे रुंद काठ असलेली धारवाडी, माहेश्वरी, इरकली नागपुरी लुगडी विशेष प्रचारात होती.

·       ब्रिटिश काळात लहान मुली चुणीच्या झालरच्या पफ्च्या उडत्या बाह्यांचे, तऱ्हेतऱ्हेच्या कॉलरचे नाना नमुन्यांचे फ्रॉक घालू लागल्या, तर जरा मोठ्या मुली विविध प्रकारची परकर-पोलकी वापरू लागल्या.



·       महाराष्ट्रीय महिलांची काष्टी घालून (सकच्छ) नऊवारी साडी नेसण्याची पद्धत आजही रूढ आहे. त्यात सर्वांग कलात्मक पद्धतीने झाकले जाऊन शालीनता भारदस्तपणा दिसतो. शरीराच्या हालचालीस सुटसुटीत अशी ही पद्धत आहे. काष्टा नेसलेली साड्या नेसून झाशीच्या राणीसह अनेक राण्यांनी घोड्यावर टांग मारून युद्धं केली आहेत. आजही शेतात काम करताना काष्टा घालून केलं जातं यामुळे काम करताना कोणतीही अडचण येत नाही.

ब्रिटिश अंमल संपता संपता स्त्रिया तीच साडी काष्टा घालता सरळ नेसू लागल्या. यामुळे त्यांना ऑफिसात काम करणं सोईचं झालं. अशी साडी सर्व देशभरात प्रसिद्ध झाली. आज स्कर्ट, मीडिज आणि पंजाबी ड्रेसमधले विविध प्रकार हे घराबाहेर पडून नोकरी व्यवसाय करणार्या स्त्रियांचे पेहराव झाले आहेत. पण ते अजून मेट्रोपॉलिटन शहरांखेरीज इतर जास्त प्रमाणात दिसत नाहीत. मात्र आजही साडीच भारतीय स्त्रीचं प्रतिनिधित्व करीत आहे. अगदी दागिन्यांच्या दुकानात, विमानतळ सेवा आणि एअर होस्टेस अशा ठिकाणी स्त्रियांचे पेहराव प्रामुख्याने साडीच असते. त्यामुळे क्षेत्र कोणतेही असो, त्या सर्व ठिकाणी साडीच आघाडीवर असल्याचे दिसते.